पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 13-14 मार्च रोजी आसामला भेट देणार
पंतप्रधानांच्या हस्ते 47,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार
पंतप्रधान ईशान्य भारतातील पहिल्या प्रवेश नियंत्रित हरित क्षेत्र चौपदरी हाय स्पीड शिलाँग-सिलचर कॉरिडॉरचे भूमीपूजन करणार
रस्ते पायाभूत सुविधा क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी आसाम माला 3.0 उपक्रमाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन होणार
पंतप्रधानांच्या हस्ते चहाच्या मळ्यातील कामगारांना जमीन पट्ट्यांचे वाटप होणार, चहाच्या मळ्यांशी संबंधित समुदायाला जमिनीचे हक्क मिळवून देणारा ऐतिहासिक टप्पा
ऊर्जा पायाभूत सुविधा बळकटी देण्याच्या उद्देशाने कोपिली जलविद्युत प्रकल्प, नुमालीगड-सिलिगुडी पाईपलाईन क्षमता विस्तार आणि ईशान्य गॅस ग्रीडच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान करणार राष्ट्रार्पण
कामाख्या रेल्वे स्थानक ते कामाख्या मंदिराला जोडणाऱ्या रोपवे प्रकल्पाची पंतप्रधानांच्या हस्ते होणार पायाभरणी
पंतप्रधान देशभरातील 9.3 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान योजनेच्या 22 व्या हप्ताचे करणार वितरण
Posted On:
12 MAR 2026 8:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 13-14 मार्च 2026 रोजी आसामच्या दौर्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान कोक्राझार, गुवाहाटी आणि सिलचर इथे 47,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण, पायाभरणी, भूमीपूजन आणि लोकार्पण करतील.
13 मार्च रोजी दुपारी 1:30 च्या सुमारास पंतप्रधान कोक्राझार इथे 4,570 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे भूमीपूजन, पायाभरणी आणि लोकार्पण करतील. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता गुवाहाटी इथे पंतप्रधान सुमारे 19,680 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील.
14 मार्च रोजी सकाळी 10:45 च्या सुमारास पंतप्रधान सिलचर इथे सुमारे 23,550 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमीपूजन आणि राष्ट्रार्पण करतील.
पंतप्रधानांचा कोक्राझार दौरा
पंतप्रधान 3,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या आसाम माला 3.0 या रस्ते पायाभूत सुविधा क्षेत्राअंतर्गतच्या महत्त्वाच्या उपक्रमाचे भूमीपूजन करतील. या योजनेअंतर्गत आंतरराज्य संपर्क जोडणी सुधारण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्ग तसेच ग्रामीण रस्त्यांमधील जोडणी मजबूत करण्यासाठी संपूर्ण आसाममध्ये 900 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत.
बोडोलँड टेरिटोरियल कौन्सिल (BTC) क्षेत्रातील सुमारे 1,100 कोटी रुपयांची गुंतवणुक असलेल्या सहा रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमीपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. याअंतर्गत चार उड्डाणपूल आणि दोन पुलांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे कोक्राझार जिल्ह्यातील वाहतूक कोंडी कमी होईल आणि संपर्क जोडणी, पर्यटन, कृषी, आरोग्य सेवा आणि ग्रामीण दळणवळणात सुधारणा घडून येईल.
कोक्राझार जिल्ह्यातील बाशबारी इथल्या रेल्वेच्या पिरियॉडिक ओव्हरहॉलिंग (POH) कार्यशाळा प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यशाळेमुळे रेल्वेच्या देखभाल वियषक पायाभूत सुविधांना बळकटी मिळेल, कार्यान्वयीन कार्यक्षमतेचा विस्तार होईल तसेच या प्रदेशात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
आसाम आणि ईशान्येकडील प्रदेशात संचारसेवा सुधारण्याच्या उद्देशाने सुरू होणाऱ्या तीन नवीन रेल्वे सेवांना पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. यामध्ये ईशान्य आणि दक्षिण भारतादरम्यान थेट रेल्वे संचारसंपर्क प्रदान करणारी कामाख्या-चरलापल्ली अमृत भारत एक्सप्रेस; आसाम आणि पश्चिम बंगालमधील संचारसंपर्क वाढवणारी गुवाहाटी-न्यू जलपाईगुडी एक्सप्रेस; तसेच आसाम आणि त्रिपुरामधील संचारसंपर्क सुधारणारी आणि प्रवासी, व्यापारी आणि पर्यटकांसाठी आंतरराज्यीय प्रवास सुलभ करणारी नारंगी-आगरतळा एक्सप्रेस यांचा समावेश आहे.
पंतप्रधान गुवाहाटी येथे
पंतप्रधान चहा बागायत कामगारांना जमिनीच्या पट्ट्यांचे वाटप करतील, हा चहा बागायत कामगारांना घरांसाठी जमिनीचे हक्क प्रदान करण्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक टप्पा आहे. सुरक्षित जमिनीच्या मालकीमुळे गृहनिर्माण सुरक्षा सुधारेल,संस्थात्मक कर्ज आणि कल्याणकारी योजनांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचता येईल आणि दीर्घकालीन सामाजिक आणि आर्थिक गतिशीलता वाढेल अशी अपेक्षा आहे.
पंतप्रधान देशभरातील 9.3 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीएम-किसान योजनेचा 22 वा हप्ता देखील जारी करतील, ज्याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये मिळतात.
पंतप्रधान दिमा हासाओ आणि पश्चिम कार्बी आंगलाँग जिल्ह्यात स्थित कोपिली जलविद्युत प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. ₹2,300 कोटींहून अधिक निधी खर्चून बांधण्यात आलेला हा प्रकल्प स्वच्छ ऊर्जा निर्मितीमध्ये वाढ करेल, प्रदेशातील ग्रिड स्थिरता सुधारेल आणि घरे, शेतकरी तसेच उद्योगांना विश्वासार्ह वीजपुरवठा सुनिश्चित करेल.
पंतप्रधान ऑइल इंडिया लिमिटेडच्या नुमालीगढ-सिलिगुडी प्राॅडक्ट पाईपलाईन (एनएसपीएल) च्या क्षमतावाढ प्रकल्पाचे राष्ट्रार्पण करतील. या प्रकल्पामुळे अतिरिक्त पेट्रोलियम उत्पादनांचे निर्वासन शक्य होऊन नुमालीगढ रिफायनरीचा विस्तार 3 एमएमटीपीए वरून 9 एमएमटीपीए पर्यंत होईल.
पंतप्रधान ईशान्य गॅस ग्रिडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन देखील करतील, जो गुवाहाटीला नुमालीगढ, गोहपूर आणि इटानगरशी जोडणारा एक प्रमुख पाइपलाइन प्रकल्प आहे आणि त्याची शाखा रेषा दिमापूरपर्यंत विस्तारित आहे. पंतप्रधान हैलाकांडी जिल्ह्यातील पंचग्राम येथे नुमालीगढ रिफायनरी लिमिटेड (एनआरएल) रेल-फेड पीओएल टर्मिनलची पायाभरणी देखील करतील. हे प्रकल्प ईशान्येकडील ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्षणीयरीत्या बळकटी देतील आणि राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षा वाढवतील.
पंतप्रधानांच्या हस्ते प्रमुख रेल्वे विद्युतीकरण प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले जातील, ज्यामध्ये सुमारे ₹420 कोटी खर्चून बांधलेला रंगिया-मुरकोंगसेलेक रेल्वे मार्ग विद्युतीकरण (558 किमी) आणि सुमारे ₹1,180 कोटी खर्चून बांधलेला चपारमुख-दिब्रुगढ रेल्वे मार्ग विद्युतीकरण (571 किमी), सुमारे ₹650 कोटी खर्चून बांधलेला बदरपूर-सिलचर आणि बदरपूर-चुराईबारी रेल्वे मार्ग यांचा समावेश आहे. हे प्रकल्प ब्रह्मपुत्र आणि बराक खोऱ्यातील संचारसंपर्क सुधारताना जलद, ऊर्जा-कार्यक्षम आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत रेल्वे परिचालन सक्षम करतील.
पंतप्रधान ₹3,600 कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या फुरकाटिंग-तिनसुकिया रेल्वे मार्ग दुहेरीकरण प्रकल्पाची (194 किमी) पायाभरणी देखील करतील, ज्यामुळे मार्गाची क्षमता वाढेल आणि अतिरिक्त प्रवासी तसेच मालवाहतूक गाड्यांचे परिचालन शक्य होईल.
जलमार्ग क्षेत्रात, पंतप्रधान बिस्वनाथ जिल्ह्यातील विश्वनाथ घाट आणि जोरहाट जिल्ह्यातील नेमाती येथे क्रूझ टर्मिनलची पायाभरणी करतील. पंतप्रधान दिब्रुगड मधील बोगीबील येथे प्रादेशिक उत्कृष्टता केंद्राचे भूमिपूजन देखील करतील, हे केंद्र ईशान्य प्रदेशासाठी प्रमुख सागरी प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र म्हणून काम करेल. पंतप्रधान पांडू जेट्टी ते राष्ट्रीय महामार्ग- 27 यांना जोडणाऱ्या रस्ते प्रकल्पाचेही उद्घाटन करतील.
ते कामाख्या रेल्वे स्थानक ते कामाख्या मंदिराला जोडणाऱ्या रोपवे प्रकल्पाची पायाभरणी करतील. प्रगत मोनोकेबल डिटॅचेबल गोंडोला तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेल अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या या रोपवेमध्ये दररोज सुमारे 17,000 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असेल. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि यात्रेकरूंना आरामदायी, पर्यावरणपूरक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होईल, तसेच शहरातील रस्त्यांवरील कोंडी कमी होईल.
पंतप्रधान गुवाहाटी येथे पीएम एकता मॉलचे उद्घाटनही करतील. आसाम आणि ईशान्य प्रदेशासाठी एक प्रमुख व्यावसायिक आणि पर्यटन केंद्र म्हणून या मॉलची उभारणी करण्यात आली असून, या ठिकाणी आसाम आणि इतर राज्यांच्या एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) वस्तू, जीआय-टॅग उत्पादने, हस्तकला आणि हातमाग वस्तूंचे कायमस्वरूपी स्टॉल्स आहेत. या सुविधेमध्ये आघाडीच्या भारतीय ब्रँडचे शोरूम, फूड कोर्ट, आधुनिक सुविधा, पार्किंग आणि डिजिटल किओस्क यांचा समावेश असेल, जे स्थानिक कारागिरांना व्यासपीठ उपलब्ध करून देईल, तसेच प्रादेशिक संस्कृती आणि उद्योगांना प्रोत्साहन देईल.
पंतप्रधानांची सिलचर येथे भेट
पंतप्रधान शिलाँग-सिलचर कॉरिडॉर, या ईशान्य भारतातील पहिला प्रवेश-नियंत्रित ग्रीनफील्ड चौपदरी हाय-स्पीड कॉरिडॉरचे भूमिपूजन करतील. सुमारे 22,860 कोटी रुपये गुंतवणुकीसह बांधला जात असलेला हा 166 किमी लांबीचा कॉरिडॉर, मेघालय आणि आसाम दरम्यानच्या कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा करेल. या प्रकल्पामुळे गुवाहाटी आणि सिलचर दरम्यानचे अंतर कमी होईल आणि प्रवासाचा वेळ 8.5 तासांवरून अंदाजे 5 तासांवर येईल. यामुळे या प्रदेशातील आर्थिक विकासाला आणि सीमापार व्यापाराला चालना मिळेल.
पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग -306 वरील कॅपिटल पॉईंट जवळील ट्रंक रोड ते सिलचरमधील रंगिरखारी पॉईंट दरम्यानच्या (टप्पा-I) उन्नत कॉरिडॉरचे भूमिपूजन करतील. या प्रकल्पामुळे सिलचरमधील सर्वात वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या मार्गावरची कोंडी कमी होईल, मिझोराम, त्रिपुरा आणि मणिपूर या शेजारील राज्यांशी संपर्क सुधारेल आणि बराक खोऱ्याच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल.
याशिवाय, पंतप्रधान करीमगंज जिल्ह्यातील पाथरकंडी येथे नवीन कृषी महाविद्यालयाची पायाभरणी करतील. ही संस्था आसाममधील कृषी शिक्षण आणि संशोधनाची परिसंस्था मजबूत करेल आणि बराक खोरे आणि शेजारच्या प्रदेशातील विद्यार्थ्यांना घराजवळ उच्च दर्जाचे कृषी शिक्षण उपलब्ध करून देईल.
निलीमा चितळे/शैलेश पाटील/तुषार पवार/नंदिनी मथुरे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2239277)
अभ्यागत कक्ष : 12