माहिती आणि प्रसारण मंत्रालय
उत्कृष्ट स्टुडिओ आणि आधुनिक क्लासरूमसह आयआयसीटी कार्यरत; 18 विविध अभ्यासक्रमांसाठी 136 विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणींसोबतच्या सहकार्यामुळे आयआयसीटीतील एव्हीजीसी-एक्सआर कौशल्य प्रशिक्षणास चालना; इनक्युबेशन उपक्रमांतर्गत 11 स्टार्टअप्सना पाठबळ
Posted On:
11 MAR 2026 6:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2026
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (आयआयसीटी), मुंबई हे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने महाराष्ट्र सरकार, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांच्या सहकार्याने अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेम्स, कॉमिक्स आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) क्षेत्रात नवोन्मेष आणि क्षमता बांधणीला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन केलेले राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र आहे. ही संस्था सध्या आयआयसीटी-राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) च्या कॅम्पसमधून काम करत आहे. मुंबईतील गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये कायमस्वरूपी कॅम्पस विकसित करण्याचे काम सुरू आहे. शैक्षणिक अध्ययन आणि उद्योग यांच्यातील सहकार्याला सहाय्य करण्यासाठी आता अत्याधुनिक सुविधा असलेले वर्ग, इमर्सिव्ह स्टुडिओ तसेच ध्वनी आणि संकलनासाठीच्या विशेष सुविधांसह संस्थेचे काम आता सुरू झाले आहे. आतापर्यंत, एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रातील विविध क्षेत्रात 18 वेगवेगळे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत, त्यासाठी 136 विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे. याव्यतिरिक्त, 15 सहभागींनी 'ट्रेन-द-ट्रेनर' उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रातील कौशल्ये आणि तंत्रज्ञान क्षमता बळकट करण्यासाठी आयआयसीटी ने जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणींसोबत भागीदारी केली आहे. या सहकार्यांचा आयआयसीटी मध्ये प्रवेश घेतलेल्या संपूर्ण भारतभरातील क्रिएटर्सना लाभ होईल. शिवाय, संस्थेच्या इनक्युबेशन उपक्रमांतर्गत देशाच्या विविध भागांमधील स्टार्टअप्सना सहाय्य करण्यात येत असून अशा 11 स्टार्टअप्सना पाठबळ पुरवण्यात येत आहे.
प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि धोरणात्मक मार्गदर्शन देण्यासाठी, आयआयसीटीने उद्योग तज्ञांचा समावेश असलेली सल्लागार मंडळांची, म्हणजे शैक्षणिक मंडळ, औद्योगिक विकास मंडळ, संशोधन आणि विकास मंडळ आणि कौशल्य मंडळ यांची स्थापना केली आहे .
माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
शैलेश पाटील/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2238448)
अभ्यागत कक्ष : 14