खते विभाग
शेतकऱ्यांच्या हितासाठी भारत सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Posted On:
10 MAR 2026 8:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मार्च 2026
केंद्र सरकारने नैसर्गिक वायू (पुरवठा नियमन) आदेश, 2026 जारी करुन खत क्षेत्राचा, नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठीच्या प्राधान्य यादीत अधिकृत समावेश केला आहे. देशातील खत उत्पादनावर परिणाम होऊ नये, यासाठी, खत उत्पादन प्रकल्पांना नैसर्गिक वायू पुरवठ्याच्या 'प्राधान्य क्षेत्र-2' श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे.
या नवीन आदेशानुसार:
• खत कारखान्यांना गेल्या सहा महिन्यांतील सरासरी नैसर्गिक वायू वापराच्या किमान 70% इतका वायू पुरवठा केला जाणार.
• जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांपासून, विशेषतः मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या एलएनजी पुरवठ्याच्या समस्यांपासून खत उत्पादनाचे संरक्षण करणे, हा या निर्णयामागचा उद्देश आहे.
• या प्राधान्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळतील, ज्यामुळे जागतिक वायू संकट असूनही कृषी कामे सुरळीतपणे सुरू राहू शकतील.
खत उत्पादनासाठी नैसर्गिक वायूला प्राधान्य देऊन, भारत शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करणे ही सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक बाब असल्याचे सरकारने अधोरेखित केले आहे. तसेच, पश्चिम आशियातील राजकीय अस्थिरतेचा, भारतातील आगामी खरीप पेरणीच्या हंगामावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी सरकारने आधीच तयारी सुरू केली आहे.
उद्योग क्षेत्रातील नेते आणि पेट्रोलियम मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खत विभागात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन.
मंगळवारी या संदर्भात खत विभागात एक उच्चस्तरीय बैठक झाली. सर्व खत कंपन्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी बैठकीत भाग घेतला. आव्हाने आणि विभागाच्या तयारीचा तपशीलवार आढावा यावेळी अधिकाऱ्यांनी विभागाला सादर केला. खत कारखाने निरंतर चालू ठेवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले जात असल्याचे विभागाच्या वतीने सर्व कंपन्यांना सांगण्यात आले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीत उपस्थित होते.


सागरी वाहतूक आणि मालवाहू जहाजांच्या दळणवळणात अडथळे निर्माण झाले असले तरीही भारताकडे खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे आश्वासन, खत विभागाने शेतकऱ्यांना दिले आहे. शेतकरी आणि इतर हितसंबधीयांच्या मनात, कसलाही संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी विभागाने सध्याच्या साठ्याबाबत पुढील माहिती जाहीर केली आहे :
• खतांच्या कमी वापराच्या कालावधीत, आगाऊ साठवणुकीच्या द्रष्टया धोरणामुळे मोठ्या प्रमाणात बफर स्टॉक उपलब्ध आहे.
• खरीप हंगामापूर्वी, भारताचा एकूण खत साठा 180.12 लाख मेट्रिक टन (LMT) पर्यंत पोहोचला आहे.
• गेल्या वर्षीच्या याच कालावधीत (10 मार्च 2025) नोंदवलेल्या 131.79 मॅट्रिक टन खतांच्या तुलनेत ही वाढ 36.6% आहे.
• ही वाढ प्रामुख्याने मातीतील महत्त्वाच्या पोषक घटकांमध्ये, विशेषतः डीएपी (25.17 मॅट्रिक टन) आणि एनपीकेएस (56.30 मॅट्रिक टन) अभूतपूर्व वाढीमुळे झाली आहे.
राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2237893)
अभ्यागत कक्ष : 15