वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
मुक्त व्यापार करारांमुळे औषधनिर्माण, आरोग्य सेवा आणि वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रांमधील संधींची नवी दारे खुली होऊ लागली आहेत: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल
मुक्त व्यापार करार हे शेतकरी, सुक्ष्म - लघु आणि मध्यम उद्योग तसेच नवोन्मेष क्षेत्रांसाठी लाभदायक, जगाचे औषधालय म्हणून भारताची भूमिकाही होत आहे भक्कम : पीयूष गोयल
आरोग्य सेवा क्षेत्राला निर्यात आणि कौशल्य विकासाशी जोडणे हे मुख्य प्राधान्य : पीयूष गोयल
प्रविष्टि तिथि:
09 MAR 2026 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2026
नवी दिल्ली मध्ये आयोजित सबका साथ सबका विकास : लोकांच्या आकांक्षांची पूर्तता या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनार 2026 ला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज संबोधित केले. भारताने केलेल्या मुक्त व्यापार करारांमुळे औषधनिर्माण, आरोग्य सेवा आणि वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये नवीन संधीची दारे खुली होऊ लागल्याचे म्हटले आहे. यामुळे जागतिक व्यापार क्षेत्रात आपले स्थान भक्कम करणे देशाला शक्य होऊ लागल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या तीन ते साडेतीन वर्षांत एकूण 9 मुक्त व्यापार करारांवर स्वाक्षरी झाली, यांपैकी 5 करार गेल्या 12 महिन्यांत पूर्णत्वाला गेल्याचे ते म्हणाले. यामुळे जवळपास दोन तृतीयांश जागतिक व्यापार क्षेत्र भारतासाठी खुल झाले असल्याचे ते म्हणाले. या करारांच्या माध्यमातून इतर अनेक देशांच्या तुलनेत भारताला कमी शुल्कात आणि विस्तारित बाजारपेठेच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, आणि त्यासोबतच प्राधान्य क्रमाने बाजारपेठांमध्ये पाऊल ठेवता येऊ लागले असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे व्यापाराचा विस्तार करण्यासाठी नवे मार्गही खुले होत असल्याचे त्यांनी सांगितले. औषधनिर्माण आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील भारताच्या जागतिक व्यापाराची व्याप्ती आता पूर्वीपेक्षा खूप विस्तारली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
हे मुक्त व्यापार करार केवळ मोठ्या उद्योगांपुरतेच मर्यादित नसून ते शेतकरी, मच्छिमार, सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग, लघु उद्योग आणि व्यापाऱ्यांशी देखील जोडलेले असल्याचे गोयल यांनी सांगितले. हे करार औषधनिर्माण आणि वैद्यकीय उपकरणे तयार करणाऱ्या वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्राला लाभ देणारे करार असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारताने उत्पादन, नवोन्मेष, स्टार्टअप्स आणि रुग्णालयीन व्यवस्थेचे एकात्मिकरण घडवून आणणारी एक व्यापक आरोग्य सेवा परिसंस्था घडवणे गरजेचे असल्याचे मत गोयल यांनी व्यक्त केले. अशा एकात्मिक परिसंस्थेमुळे देशाला मुक्त व्यापार करारांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संधींचा पूर्ण उपयोग करून घेणे शक्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संपूर्ण प्रक्रियेत, विशेषतः गुणवत्तेत सुधारणा घडवून आणण्याच्या प्रक्रियेत सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांची भूमिका महत्त्वाची असणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
आज भारत जगातील अनेक प्रदेशांसोबतचा आपला व्यापार विषयक सहभाग विस्तारत असल्याचे गोयल यांनी नमूद केले.
आरोग्य सेवा क्षेत्राला निर्यातीशी अधिक सक्षमपणे जोडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आज भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर सेवा सुश्रृषा देणारे आणि परिचारिकांची मोठी मागणी आहे, त्यामुळे देशात कुशल व्यावसायिक तज्ञांना प्रशिक्षित करण्यावर भर दिला गेला पाहीजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कौशल्य विकासाला बळकटी देण्याच्या माध्यमातून भारत निर्यातीला पाठबळ देऊ शकणारे, परदेशातून पाठवलेल्या पैशांच्या प्रमाण वाढवणारे आणि भारतीय उत्पादने तसेच सेवांना जागतिक पातळीवर पोहचवणारे मनुष्यबळ उभे करू शकतो असे त्यांनी सांगितले.
आरोग्यसंपन्न भारत हाच विकसित भारताचा पाया असेल, असे ते म्हणाले. या क्षेत्रांमधील सामूहिक प्रयत्न भारताचे जागतिक नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान निर्माण होण्यात आणि विकसित भारताचा संकल्प साकार करण्यात मोठ्या मदतीचे ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2237263)
आगंतुक पटल : 76