आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "सबका साथ सबका विकास - लोकांच्या आकांक्षांची परिपूर्ती" या संकल्पनेअंतर्गत आरोग्य क्षेत्रातील उपक्रमाविषयी अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला केले संबोधित
योग आणि आयुर्वेद एकात्मिक आणि समग्र कल्याणाकडे जगाला वळवत आहेत: पंतप्रधान
निदान पद्धती आणि सार्वजनिक आरोग्याला चालना देण्यासाठी एक लाख कुशल सहयोगी आरोग्यसेवा व्यावसायिक तयार करण्याचे सरकारचे उद्दिष्ट: जे पी नड्डा
Posted On:
09 MAR 2026 9:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2026
"भारत आज प्रतिबंधात्मक आणि समग्र आरोग्यासाठी एका विशाल दृष्टिकोनावर काम करत आहे. अलिकडच्या काळात देशातील आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत झाल्या आहेत, जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये शेकडो नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली गेली आहेत." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज "सबका साथ सबका विकास - लोकांच्या आकांक्षांची परिपूर्ती" या संकल्पनेवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये भाषण करताना हे उद्गार काढले, ज्यात विकसित भारत @2047 च्या दृष्टिकोनाचा भाग म्हणून भारताची आरोग्य सेवा व्यवस्था मजबूत करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकण्यात आला.

समग्र आरोग्यसेवेच्या भावनेतून भारत निरामयता, लवकर निदान आणि सुलभ उपचारांवर सातत्याने अधिक लक्ष केंद्रित करत आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.
आरोग्यसेवेतील डिजिटल परिवर्तनाचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी, विशेषतः दुर्गम आणि वंचित भागात, आरोग्यसेवेची उपलब्धता सुधारण्यातील टेलिमेडिसिनच्या विस्तारित भूमिकेची नोंद केली. टेलिमेडिसिन सेवांमधील प्रगतीची दखल घेत त्यांनी जागरूकता आणखी वाढवण्याची आणि वापरकर्ता अनुभव सुलभ करण्याची गरज असल्याचे सांगितले जेणेकरून अधिकाधिक नागरिकांना डिजिटल आरोग्य प्लॅटफॉर्मचा लाभ घेता येईल.

नागरिकांच्या आकांक्षांची परिपूर्ती करणे हे केंद्रीय अर्थसंकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. अर्थसंकल्पानंतरच्या वेबिनारमधील चर्चेमुळे अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक मजबूत पथदर्थक तयार करण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी बोलताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा म्हणाले की 2026-27 चा केंद्रीय अर्थसंकल्प आरोग्य सेवा बळकट करण्यावर तसेच देशभरात दर्जेदार सेवांचा विस्तार करण्यावर सरकारचे सतत लक्ष केंद्रित करत असल्याचे प्रतिबिंबित करतो.

नड्डा यांनी सहयोगी आरोग्य शिक्षण आणि प्रशिक्षण यात वाढ करून सहयोगी आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यवसाय आयोग कायदा, 2021 तसेच राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यवसाय आयोगाच्या स्थापनेमुळे सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यवसायांसाठी एक मजबूत नियामक चौकट उपलब्ध झाली आहे. या पायावर उभारणी करून निदान पद्धती, पुनर्वसन आणि सार्वजनिक आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी प्राधान्य विषयांमध्ये एक लाख व्यावसायिकांचे कुशल सहयोगी आरोग्यसेवा कर्मचारी विकसित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2237248)
अभ्यागत कक्ष : 14