राष्ट्रपती कार्यालय
फिनलँडच्या राष्ट्रपतींनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट
प्रविष्टि तिथि:
05 MAR 2026 8:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2026
फिनलँड प्रजासत्ताकचे महामहीम राष्ट्रपती डॉ.अलेक्झांडर स्टब यांनी आज दि. 5 मार्च 2026 रोजी राष्ट्रपती भवन इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती स्टब यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत केले. या वर्षीच्या रायसीना संवासासाठी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. समकालीन जागतिक परिस्थितीवर त्यांचे विचार सर्व सहभागींसाठी निश्चितपणे अत्यंत मोलाचे ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत फिनलँडकडे एक मौल्यवान आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहतो, दोन्ही देशांमधील संबंध हे परस्पर विश्वास आणि सामायिक लोकशाही परंपरांवर आधारलेले आहेत, असे राष्ट्रपती म्हणाल्या. अलीकडच्या वर्षांत भारत आणि फिनलँडमधील संबंध हे नवोन्मेष, स्वच्छ तंत्रज्ञान, शिक्षण आणि आर्थिक सहकार्य या मुख्य स्तंभांवर आधारलेल्या एका बहुआयामी भागीदारीपर्यंत पोहचले असल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. अलीकडेच घोषित झालेला भारत आणि युरोपीय महासंघामधील मुक्त व्यापार करार दोन्ही देशांच्या व्यापार आणि गुंतवणूक विषयक संबंधांना नवीन गती देईल, असा विश्वासही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.
क्वांटम तंत्रज्ञानापासून ते 6G पर्यंतच्या अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानामध्ये फिनलँड हा जागतिक पातळीवर आघाडीवर असलेला देश असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताच्या विकसित भारतच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासात फिनलँडमधील कंपन्या बजावत असलेल्या भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले. अनेक भारतीय कंपन्या फिनलँडमध्ये कार्यरत आहेत आणि हजारो भारतीय, विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञ, फिनलँडच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देत आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले. या वातावरणामुळे या क्षेत्रांमधील दोन्ही देशांच्या दृढ परस्पर सहकार्यासाठी अफाट शक्यता निर्माण होत असल्याचेही त्या म्हणाल्या.

शाश्वत विकास आणि स्वच्छ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात फिनलँडने घेतलेल्या आघाडीचीही राष्ट्रपतींनी प्रशंसा केली. भारताने देखील आपली सौर आणि पवन ऊर्जा क्षमतेतील वाढ, हरित हायड्रोजनला दिलेली चालना, शाश्वत ऊर्जा कार्यक्षमतेत घडवून आणलेल्या सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी तसेच जागतिक जैव-इंधन आघाडी यांसारख्या मंचांची सुरुवात करून हवामान बदलासंदर्भातल्या निर्णायक कृतींच्या बाबतीत लक्षणीय प्रगती केली असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती स्टब यांना LiFE Mission बद्दलही माहिती दिली. हे अभियान नागरिकांना शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचे त्यांनी सांगितले. शाश्वत तंत्रज्ञानातील फिनलँडचे कौशल्य आणि भारताच्या हरित ऊर्जा क्षेत्रातील नवोन्मेषाचा मिलाफ साधत, समांतरपणेच समृद्धी आणि शाश्वततेचे उद्दिष्ट साध्य केले जाऊ शकते हे आपण जगाला दाखवून देऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2235754)
आगंतुक पटल : 95