युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी आशियायी क्रीडा स्पर्धा 2026 च्या तयारीचा आढावा घेतला, भारतीय खेळाडूंना पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले
Posted On:
05 MAR 2026 6:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2026
केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुख्यालयात 2026 च्या आशियायी क्रीडा स्पर्धासाठी भारताच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक झाली. या स्पर्धा जपानमधील आईची-नागोया येथे 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालयाचे आणि राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाचे (SAI) वरिष्ठ अधिकारी, तसेच इतर संबंधित हितधारकांनी देशाच्या तयारीबद्दल मंत्रिमहोदयांना पूर्ण माहिती दिली. या आशियायी क्रीडा स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी दाखवावी यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
बैठकीत बोलताना डॉ मनसुख मांडवीयांनी खेळाडूंचे कल्याण व त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी सरकारच्या वचनबद्धतेबद्दल ग्वाही दिली. “आमच्या खेळाडूंना आम्ही सर्वोच्च प्राथमिकता देतो. खेळाडूंचे लक्ष विचलित होऊ नये व आशियायी क्रीडास्पर्धांमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी करावी यासाठी प्रशिक्षण, क्रीडाविज्ञान ते वाहतूक/प्रवास, क्रीडासाहित्याचे किट , पौष्टिक खुराक, वैद्यकीय सेवा इत्यादी सर्व बाबतीत खेळाडूंना साहाय्य दिले जाईल. त्यांना कोणत्याही समस्येविना त्यांच्या क्रीडाप्रकारावर लक्ष केंद्रित करता यावे व त्यांनी देशासाठी भरपूर पदके कमवावीत, हेच आमचे उद्दिष्ट आहे.”
सर्व भागधारकांनी समन्वित प्रयत्न करण्याच्या गरजेवर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला. नियोजनबद्ध तयारी, मजबूत साहाय्य यंत्रणा आणि पूर्व नियोजन याच्या जोरावर 2026 च्या आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताला मोठे यश मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.
धोरणात्मक नियोजन, समर्पित प्रयत्न आणि सर्व भागधारकांमध्ये एकत्रित समन्वय साधून 2022 सालच्या हांग्झो आशियायी क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या ऐतिहासिक 106 पदकांच्या कामगिरीला मागे टाकण्याचे देशाचे उद्दिष्ट आहे. 2026 च्या खेळांमध्ये 700 हून अधिक भारतीय खेळाडू 40+ क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेतील अशी अपेक्षा आहे.
आशियायी क्रीडा स्पर्धांच्या निवासस्थानांच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास खेळाडूंना मदत करण्यासाठी, पटियाला आणि बेंगळुरू येथील SAI प्रादेशिक केंद्रांवर विशेष तात्पुरते कंटेनर युनिट्स स्थापित केले जातील. त्यामुळे क्रीडास्पर्धांमध्ये असलेल्या कंटेनर-शैलीतील निवास व्यवस्थेची सवय खेळाडूंना करून घेता येईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या उपाययोजनामुळे खेळाडूंना तिथल्या परिस्थितीशी लवकर जुळवून घेण्यास आणि स्पर्धेदरम्यान लक्ष केंद्रित होण्यास मदत होईल.
समितीची पुढील बैठक 20 मार्च रोजी होणार आहे. तेव्हा भारत या आशियायी क्रीडा स्पर्धेच्या तयारीच्या निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असेल. भारतीय संघाचा आकार, लॉजिस्टिक्स, प्रवास व्यवस्था आणि इतर सर्व सज्जता यावर त्या बैठकीत अंतिम चर्चा केली जाईल.


शैलेश पाटील/उमा रायकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2235672)
अभ्यागत कक्ष : 50