रेल्वे मंत्रालय
रेल्वे पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी उद्योग क्षमता, कौशल्य आणि तंत्रज्ञान स्वीकारणे महत्त्वाचे: अश्विनी वैष्णव
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक आणि मालवाहतूक क्षेत्रात आर्थिक वृद्धी कायम राखणे आणि मजबूत करणे' या विषयावरील अर्थसंकल्पावर आधारित ऑनलाइन वेबिनारला केले संबोधित
वादाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी 'समन्वयित क्षमता विस्तार', 'कठोर गुणवत्ता मानके' आणि 'कंत्राटी व्यवस्थेतील सुधारणा ही तीन प्रमुख लक्ष केंद्रित क्षेत्रे आहेत
रेल्वे प्रकल्पांमधील बहुआयामी गुंतागुंत अधोरेखित करत, केंद्रीय मंत्र्यांनी अंमलबजावणीमध्ये 'क्षेत्रनिहाय सखोल ज्ञान आणि अनुभव कौशल्य' आणि 'क्षेत्र-विशिष्ट अनुभवाचे' केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
03 MAR 2026 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2026
केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, आणि इलेक्ट्रॉनिक्स - माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज अर्थसंकल्पावर आधारित ऑनलाइन वेबिनार मालिकेतील दुसऱ्या सत्राला संबोधित केले. "आर्थिक वृद्धी कायम राखणे आणि अधिक मजबूत करणे: पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक आणि मालवाहतूक" ही या वेबिनारची मध्यवर्ती संकल्पना होती.
या वेबिनार दरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी या क्षेत्रासाठी तीन प्रमुख मुद्द्यांवर भर दिला: समन्वयित पद्धतीने क्षमता वाढविणे, दर्जा आणि पात्रता मानके मजबूत करणे, आणि वाद कमी करण्यासाठी तसेच प्रकल्पांची वेळेत पूर्तता सुनिश्चित करण्यासाठी दस्तऐवजीकरण आणि कंत्राटी चौकटीत सुधारणा करणे.
रेल्वे पायाभूत सुविधांचा समन्वयित विस्तार
भारताच्या रेल्वे जाळ्यात, गेल्या दशकात झालेल्या अभूतपूर्व वाढीचा, वैष्णव यांनी उल्लेख केला. गेल्या दहा वर्षांत सुमारे 35,000 किमी नवीन मार्ग जोडले गेले आहेत. हे जर्मनीच्या एकूण रेल्वे जाळ्यापेक्षाही जास्त आहेत. याशिवाय, जवळपास 99% रेल्वे जाळ्याचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.
इतक्या जलद गतीने विस्तार करणे हे एक मोठे आव्हान आहे; कारण सरकारी विस्तारासोबतच उद्योगांची क्षमता आणि साधनसंपत्ती देखील त्याच वेगाने वाढणे आवश्यक आहे, हे केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले. त्यांनी यावर भर दिला की, रेल्वेचा विकास ही मुळात उद्योग आणि सरकार यांच्यातील भागीदारी आहे. प्रकल्पांच्या प्रमाणात अचानक वाढ किंवा घट झाल्यामुळे प्रकल्पांशी निगडीत उद्योग क्षेत्राच्या तयारीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कौशल्य विकास, देखरेख, गुणवत्ता मानके आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार या बाबी पायाभूत सुविधांच्या विस्ताराशी सुसंगत असल्या पाहिजे. उद्योग क्षेत्रातील भागधारकांकडून मिळणाऱ्या सूचना भविष्यातील सुधारणांना आकार देण्यास मदत करतील.
हाय-स्पीड रेल्वे विकासाचा दृष्टिकोन आणि परिवर्तनकारक प्रकल्प
'मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर' हा याबाबत शिकण्यासारखा एक मोठा अनुभव ठरला आहे, असे हाय-स्पीड रेल्वेच्या विकासाबाबत बोलताना वैष्णव यांनी सांगितले. त्यांनी नमूद केले की, ताशी 160 किमी पेक्षा जास्त वेगाने रेल्वेगाडी चालवताना, रचना आणि कार्यवाही मधील जटीलता कित्येक पटीने वाढते.
आयआयटी, उद्योग भागीदार आणि रेल्वे अभियंते यांच्या सहकार्याने भारताने ही आव्हाने यशस्वीरित्या पेलली आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर केले की, याच यशाच्या आधारावर, माननीय पंतप्रधानांनी 4,000 किमी लांबीच्या सात नवीन हाय-स्पीड पॅसेंजर कॉरिडॉरना मंजुरी दिली आहे.
पायाभूत उद्दिष्टे साध्य करण्यासाठी रेल्वे, उद्योग, पुरवठा साखळी, उपकरण निर्माते, सेवा पुरवठादार, परिचालन आणि देखभाल चमू, सिग्नलिंग तज्ञ आणि रोलिंग स्टॉक निर्माते यांच्यात समन्वयाने प्रयत्न होणे आवश्यक आहे, यावर वैष्णव यांनी भर दिला. या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी आयोजित कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याचे, त्यांनी मोठ्या बांधकाम आणि रचनाकार कंपन्यांना निमंत्रण दिले.
दर्जा, पात्रता आणि निविदा नियमांचे सक्षमीकरण
पात्रता निकष कडक करण्याची आणि उप-कंत्राटांचा अती वापर कमी करण्याची तातडीची गरज, वैष्णव यांनी अधोरेखित केली. सरकारी निधीचा कार्यक्षम वापर होईल आणि कायदेशीर वाद कमी होतील या दृष्टीने सार्वजनिक प्रकल्पांनी, दर्जा आणि उत्तरदायित्वाच्या अधिक कडक मानकांचे पालन केले पाहिजे, असे ते म्हणाले.
उद्योग सहकार्य आणि भागधारकांचा सहभाग
या अर्थसंकल्पोत्तर वेबिनार दरम्यान महत्त्वपूर्ण सूचना मांडणाऱ्या, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक, विविध मंत्रालयांचे प्रतिनिधी आणि अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे, वैष्णव यांनी आभार मानले. या सूचना संपूर्ण क्षेत्रातील सुधारणांसाठी पाया ठरतील, असे ते म्हणाले.
मनोहर लाल खट्टर, सर्बानंद सोनोवाल, के. राम मोहन नायडू, या केंद्रीय मंत्र्यांसह, बंदरे-नौवहन आणि जलमार्ग, ऊर्जा आणि नागरी विमान वाहतूक या मंत्रालयांच्या सचिवांचेही, वैष्णव यांनी आभार मानले. महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि अर्थसंकल्पीय घोषणांशी सुसंगत नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ या शब्दांत, त्यांनी या वेबिनारचे वर्णन केले.
* * *
नेहा कुलकर्णी/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2235305)
आगंतुक पटल : 66