शिक्षण मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्ली येथे आयोजित स्टडी इन इंडिया एज्यु-डिप्लोमॅटिक कॉन्क्लेव 2026 मध्ये 50 हून अधिक देशांतील राजदूतांना संबोधित केले
Posted On:
02 MAR 2026 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मार्च 2026
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत सुषमा स्वराज भवन येथे आयोजित स्टडी इन इंडिया एज्यु-डिप्लोमॅटिक कॉन्क्लेव 2026 ला संबोधित केले, उच्च शिक्षणात आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी चर्चा करण्याच्या उद्देशाने केंद्रीय शैक्षणिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या , या कार्यक्रमाला 50 हून अधिक देशांमधील राजदूत, उच्चायुक्त, राजनैतिक मिशनचे प्रतिनिधी आणि मंत्रालयाचेअधिकारी यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाला संबोधित करताना धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 अंतर्गत भारताच्या शिक्षण व्यवस्थेतील परिवर्तन याविषयावर मार्गदर्शन केले, शिक्षणाला आंतरराष्ट्रीय स्वरुप प्राप्त करुन देण्यासह गुणवत्ता, नवोन्मेष आणि परवडण्याजोग्या शिक्षणावरील भारताचे प्राधान्य यांवर त्यांनी भर दिला.


देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी पर्यंत म्हणजेच 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे, असे प्रधान म्हणाले. जागतिक आर्थिक परिदृश्यात भारत एक उज्ज्वल स्थान असून शिकण्यासाठी, संशोधन करण्यासाठी, नवोन्मेष करण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी आपला देश प्रचंड संधी प्रदान करतो, असे या संदर्भात बोलताना प्रधान यांनी सांगितले.
अनिश्चितता आणि वेगाने बदलणाऱ्या जगात शिक्षण हा समाजाला जोडणारा एक सर्वात शाश्वत असा दुवा असून भारत भागीदार राष्ट्रांसोबत भक्कम ज्ञानभागीदारी करण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या वेगाने वाढणाऱ्या नवोन्मेष केंद्रित, बहुविद्याशाखीय आणि सुलभ शिक्षण प्रणालीशी सहयोग करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
स्टडी इन इंडिया एज्यु-डिप्लोमॅटिक कॉन्क्लेव 2026 मुळे शिक्षण क्षेत्रात राजनैतिक भागीदारी मजबूत करण्यासाठी एक समर्पित व्यासपीठ उपलब्ध झाले असून त्यामध्ये भागीदार देशांमधील विद्यार्थ्यांना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि अल्पकालावधीच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच संस्थात्मक भागीदारीकरता जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या विद्यापीठांना भारतात केंद्र सुरु करण्यासाठी आमंत्रित करणे यांचा समावेश होता.
सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2234586)
अभ्यागत कक्ष : 14