श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डॉ.मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली इपीएफच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची 239 वी बैठक संपन्न


आर्थिक वर्ष 2025-26 साठी इपीएफ सहभागींना 8.25 टक्के व्याजदराची केंद्रीय मंडळाची शिफारस

Posted On: 02 MAR 2026 5:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2026


केंद्रीय श्रम व रोजगार आणि युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (इपीएफ) केंद्रीय विश्वस्त मंडळाची (सीबीटी) 239 वी बैठक झाली.

सविस्तर चर्चेनंतर सीबीटीने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी वार्षिक 8.25 टक्के दराने व्याजाची रक्कम इपीएफच्या खातेदारांच्या खात्यात जमा करण्याची शिफारस केली. केंद्र सरकारने व्याजदराची अधिकृत सूचना जारी करावी आणि त्यानंतर इपीएफओने खातेदारांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा करावी.

जागतिक अस्थिरतेच्या काळातही इपीएफओने आर्थिक शिस्तीचे काटेकोर पालन केल्यामुळे व्याजदरावर परिणाम न होता स्थिर व तुलनात्मकरित्या चांगल्या परताव्याची हमी दिली. या निर्णयामुळे कोट्यवधी कामगारांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनाची सुरक्षितता वाढल्यामुळे त्यांचा फायदा होईल. इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत दूरदर्शी, शाश्वत व आकर्षक परतावा देण्याची व ठेवी सुरक्षित ठेवण्याची इपीएफओची वचनबद्धता यामुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.

इटीएफ आणि अन्य गुंतवणुकींच्या आधारे इपीएफओला गेली काही वर्षे 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर देणे शक्य झाले आहे. इपीएफओने केलेल्या गुंतवणूकीचा मजबूत क्रेडीट प्रोफाइल आणि सदस्यांना चांगला परतावा देण्याची सातत्यपूर्ण क्षमता या निर्णयाद्वारे प्रतिबिंबित होते.  

सुषमा काणे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2234580) अभ्यागत कक्ष : 40