आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अजमेर येथून 14 वर्षांच्या मुलींसाठी राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा केला प्रारंभ


गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्धच्या भारताच्या लढाईतील महत्त्वाचा टप्पा

संमतीनंतर ऐच्छीक, विनामूल्य, एकच मात्रा आवश्यक असलेली एचपीव्ही लस सरकारी आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध

आई निरोगी असेल तर कुटुंब प्रत्येक संकटाचा सामना करण्यास सक्षम राहते, या भावनेतून सरकारने महिलांना आधार देण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत: पंतप्रधान

स्वच्छ इंधन, स्वच्छता आणि पोषण सहाय्य हे महिलांच्या आरोग्याबाबत संवेदनशीलतेच्या नवीन पर्वाचे प्रतीक: पंतप्रधान

Posted On: 28 FEB 2026 5:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील अजमेर येथून 14 वर्षांच्या मुलींसाठी राष्ट्रव्यापी ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेची सुरुवात केली. हा उपक्रम गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्धच्या भारताच्या लढाईतील एक ऐतिहासिक टप्पा आहे.

   

केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी कर्तव्य भवन येथून या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीमार्फत सहभाग घेतला. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल; नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एम्स नवी दिल्लीचे संचालक डॉ. एम. श्रीनिवास; सफदरजंग रुग्णालयाचे संचालक डॉ. संदीप बन्सल आणि एम्स नवी दिल्ली, सफदरजंग रुग्णालय, आरएमएल रुग्णालय आणि लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टर्स देखील या प्रसंगी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी देशव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचे वर्णन भारताच्या 'नारी शक्ती'ला सक्षम करण्यासाठी आणि देशभरातील माता आणि मुलींच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. "आपल्या सर्वांना माहित आहे की जेव्हा कुटुंबात आई आजारी पडते तेव्हा संपूर्ण घर विस्कळीत होते. जर आई निरोगी असेल तर कुटुंब कोणत्याही संकटाचा सामना करण्यास सक्षम राहते. या भावनेतून सरकारने महिलांना आधार देण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत," हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

 

महिलांच्या आरोग्य आणि प्रतिष्ठेबाबतच्या सरकारच्या संवेदनशील आणि ध्येयवादी दृष्टिकोनावर भर देत, पंतप्रधानांनी स्वच्छता उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकाम, परवडणाऱ्या दरात सॅनिटरी पॅडची उपलब्धता आणि लाखो कुटुंबांसाठी स्वच्छ स्वयंपाक इंधन सुनिश्चित करणाऱ्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना यासारख्या परिवर्तनकारी उपाययोजनांचा उल्लेख केला.

पंतप्रधानांनी सुरक्षित मातृत्व योजनेचा उल्लेख केला, ज्या अंतर्गत गर्भधारणेदरम्यान पौष्टिक अन्नासाठी 5,000 रुपये थेट गर्भवती मातांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या उपक्रमांमुळे महिलांच्या आरोग्य आणि कल्याणाबाबतच्या दुर्लक्षाऐवजी काळजी, सन्मान आणि संवेदनशीलतेवर आधारित दृष्टिकोन निर्माण झाल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

अजमेर येथील राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रमात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा आभासी सहभाग दिसून आला. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रशासक, राज्य आरोग्य मंत्री, शिक्षण मंत्री, तसेच अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी त्यांच्या संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेश मुख्यालयातून उपस्थित होते. 

जागतिक स्तरावर आणि भारतात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा सार्वजनिक आरोग्यासंबंधी एक महत्त्वाचा चिंतेचा विषय आहे. डब्ल्यूएचओ ग्लोबोकॅन अहवाल 2022 नुसार, गर्भाशय मुखाचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये सर्वाधिक आढळून येणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग असून दरवर्षी 1 लाख 20 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळून येतात आणि सुमारे 80 हजार मृत्युंची नोंद होते. उच्च-जोखीम असलेल्या मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) प्रकारांचा  विशेषतः टाईप 16 आणि 18 चा सातत्याने संसर्ग हे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्राथमिक कारण आहे.

एचपीव्ही संसर्गाच्या संभाव्य धोक्यापूर्वी मुलींचे संरक्षण करून गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखणे हे राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ही लस सुरक्षित, प्रभावी असून बहुतांश गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला जबाबदार असलेल्या HPV स्ट्रेनपासून दीर्घकालीन संरक्षण प्रदान करते.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि भारताच्या लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट (NTAGI) यासारख्या जागतिक आणि राष्ट्रीय तज्ज्ञ संस्थांनी एचपीव्ही लसीकरणाला मान्यता दिली आहे आणि त्याची शिफारस केली आहे.

जागतिक स्तरावर 194 पैकी 160 देशांनी त्यांच्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत HPV लस देणे सुरू केले आहे.  90 देशांनी सिंगल-डोस वेळापत्रक स्वीकारले आहे, ज्यामध्ये बहुतांश आग्नेय आशियाई देशांचा समावेश आहे. 80 देश त्यांच्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात Gardasil-4 लस वापरत आहेत. यापैकी 61 देश Gardasil-4 चे सिंगल-डोस वेळापत्रक लागू करत आहेत.

वॅक्सीन कव्हर्ड एचपीव्ही टाईपमुळे होणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला रोखण्यात एचपीव्ही लसी 93–100% प्रभावी आहेत. पुराव्यांवरून देखील एक मजबूत सामूहिक प्रभाव दिसून आला आहे, मोठ्या प्रमाणात लसीकरणामुळे एचपीव्ही स्ट्रेनचे सर्क्युलेशन कमी होते, परिणामी लसीकरण न झालेल्या व्यक्तींनाही अप्रत्यक्ष संरक्षण मिळते.

भारताचा राष्ट्रीय कार्यक्रम जागतिक वैज्ञानिक पुराव्यांनुसार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशींनुसार,गार्डासिल- 4 (क्वाड्रिव्हलेंट: एचपीव्ही टाईप 6, 11, 16, 18) सिंगल डोस वेळापत्रकात वापरतो.

लक्ष्य लोकसंख्या आणि व्याप्ती:

या मोहिमेत 14 वर्षे वयोगटातील मुलींना  (ज्यांनी वयाची 14 वर्षे पूर्ण केली आहेत परंतु 15 वर्षे अद्याप पूर्ण केलेली नाहीत) सामावून घेतले जाईल. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (RGI) च्या 2021 च्या अंदाजानुसार, 14 वर्षांच्या मुलींची वार्षिक संख्या अंदाजे  1.2 कोटी आहे, ज्यांना दरवर्षी या उपक्रमाचा लाभ होण्याची अपेक्षा आहे.

HPV लसीकरण मोहिमेचा परिचालन आराखडा:

भारतात HPV लसीकरणाला प्रारंभ करताना सुरक्षितता, लॉजिस्टिक्स आणि देखरेखीकडे बारकाईने लक्ष देऊन काळजीपूर्वक नियोजन करण्यात आले आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये:

  • लसीकरण कालावधी: मोहिम पद्धतीने 3 महिने (90 दिवस).
  • मोहिम टप्पा पूर्ण झाल्यानंतर एचपीव्ही लस नियमित लसीकरण सत्रांच्या दिवशी उपलब्ध राहील.
  • सत्र स्थळे: केवळ शासकीय आरोग्य सुविधा - आयुष्मान आरोग्य मंदिर (एएएम), प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी), समुदाय आरोग्य केंद्रे (सीएचसी), उपजिल्हा रुग्णालये (एसडीएच), जिल्हा रुग्णालये (डीएच), शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये (जीएमसीएच).
  • डोस व देण्याची पद्धत: एकच डोस (0.5 मिली) - डाव्या बाहूवर स्नायूमध्ये (इंट्रामस्क्युलर - आयएम) इंजेक्शन.
  • लसीकरण ऐच्छिक असून पूर्णपणे विनामूल्य आहे. पालक/पालक प्रतिनिधी यांच्या संमतीनंतरच लस देण्यात येईल.
  • लाभार्थी यू-विन (यू-डब्ल्यूआयएन) या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पूर्वनोंदणी करून वेळ निश्चित करू शकतात किंवा नियुक्त शासकीय आरोग्य केंद्रांवर थेट उपस्थित राहून लसीकरण करू शकतात.
  • पालक/पालक प्रतिनिधी यांची संमती अनिवार्य असून ती यू-विनवर डिजिटल पद्धतीने नोंदवली जाईल. इंटरनेट सुविधा नसलेल्या भागांत निर्धारित नमुन्यानुसार लेखी संमती घेण्यात येईल.
  • यू-विन प्लॅटफॉर्मचा वापर सत्र नियोजन, नोंदणी, नोंदवही आणि अहवालासाठी केला जाईल; तर ई-विन (ई-व्हीआयएन) पोर्टलद्वारे लसीचा साठा आणि पुरवठा साखळी व्यवस्थापित केली जाईल.
  • तांत्रिक व कार्यकारी बाबींचा समावेश असलेल्या देशव्यापी क्षमतावृद्धी उपक्रमांसह व्यापक पूर्वतयारी करण्यात आली आहे. सुरळीत अंमलबजावणीसाठी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

हा कार्यक्रम कठोर वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून राबविण्यात येत आहे. खालील परिस्थितींमध्ये लसीकरण पुढे ढकलले जाईल किंवा टाळले जाईल:

  • मध्यम किंवा गंभीर आजार असलेल्या मुली (बरे होईपर्यंत)
  • पूर्वीच्या लसीकरणानंतर गंभीर अॅलर्जिक प्रतिक्रिया आलेल्या मुली
  • यीस्ट (खमीर) ची अॅलर्जी असलेल्या मुली
  • निर्धारित वयोगटाबाहेरील मुली

ज्या मुलींना यापूर्वी कोणतीही एचपीव्ही लस (गार्डासिल, गार्डासिल-9, सर्वारिक्स किंवा सर्वावॅक) देण्यात आली आहे, त्यांची लसीकरण स्थिती यू-विन पोर्टलवर अद्ययावत केली जाईल.

सर्व लसीकरण सत्रे प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडतील. कार्यरत शीतसाखळी केंद्रे (सीसीपी) उपलब्ध असून कोणत्याही दुर्मीळ प्रतिकूल घटना (एईएफआय) व्यवस्थापनासाठी 24×7 शासकीय आरोग्य सुविधांशी संलग्नता सुनिश्चित करण्यात आली आहे.

पंतप्रधानांच्या राष्ट्रीय शुभारंभानंतर सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्थानिक कार्यक्रमांद्वारे एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

देशव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीम ही भारताच्या प्रतिबंधात्मक आरोग्य धोरणातील एक परिवर्तनकारी पाऊल असून वैज्ञानिक पुरावे व अंमलबजावणीची सज्जता यांवर आधारित परिणाम हे केंद्रित प्रशासनाचे प्रतीक आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय पालक व पालक प्रतिनिधींना आवाहन करते की त्यांनी आपल्या 14 वर्षांच्या मुलींना मोहिम कालावधीत एचपीव्ही लस द्यावी. एचपीव्ही लसीकरण हे जीव वाचविणारे प्रभावी प्रतिबंधात्मक साधन असून भारतातील मुलींसाठी निरोगी व कर्करोगमुक्त भविष्य सुनिश्चित करण्यास सहाय्यक ठरेल.

 

* * *

माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/सुषमा काणे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2233952) अभ्यागत कक्ष : 166