रेल्वे मंत्रालय
रेल्वेत नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्याकरिता नवोन्मेषक, स्टार्टअप्स, उद्योग आणि संस्थांना सहभागी करून घेण्यासाठी रेल टेक पोर्टलचा प्रारंभ आणि रेल्वे दावा न्यायाधिकरणात प्रक्रियांचे डिजिटायझेशन, या तिसरी आणि चौथी सुधारणा म्हणून घोषित
Posted On:
26 FEB 2026 5:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2026
तंत्रज्ञान-चालित प्रशासन आणि नवोन्मेष-चालित परिवर्तनाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज भारतीय रेल्वेच्या प्रमुख "52 आठवड्यात 52 सुधारणा" उपक्रमांतर्गत सुधारणा क्रमांक तीन म्हणून रेलटेक धोरण घोषित केले. तसेच सुधारणा क्रमांक चार म्हणून रेल्वे दावे न्यायाधिकरणाचे (आरसीटी) संपूर्ण डिजिटायझेशन जाहीर केले.

रेल टेक धोरण सुधारणा
भारतीय रेल्वेमध्ये नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी नवोन्मेषक, स्टार्टअप्स, उद्योग आणि संस्थांना सहभागी करून घेण्याचे रेल टेक धोरणाचे उद्दिष्ट आहे. नवीन धोरण नवोन्मेषकांची निवड सुलभ करते आणि नवोन्मेषासाठी एक समर्पित "रेल टेक पोर्टल" सादर करते. नवोन्मेषक आव्हाने, कोणत्याही नवोन्मेषक किंवा विभागीय वापरकर्त्याद्वारे सुरू केली जाऊ शकतात, ज्यामध्ये प्रस्तावांचे एक-टप्प्याचे तपशीलवार सादरीकरण केले जाऊ शकते.

हे धोरण वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस प्रदान करते, स्केल-अप अनुदान तीन पटीने वाढवते आणि प्रोटोटाइप विकास आणि चाचण्यांसाठी कमाल अनुदान दुप्पट करते.
प्रमुख नवोन्मेष क्षेत्रांमध्ये रेल्वे आणि हत्ती यांची धडक टाळण्यासाठी एआय-आधारित एलिफंट इंट्रूजन डिटेक्शन सिस्टम (ईआयडीएस), रेल्वेडब्यांमध्ये एआय-आधारित आग शोध प्रणाली, तुटलेले रूळ शोधण्यासाठी ड्रोन-आधारित ब्रोकन रेल डिटेक्शन सिस्टम, रेल्वे स्ट्रेस मॉनिटरिंग सिस्टम(रुळांवर वजन, उष्णता अशा बाबीमुळे येणारा ताण शोधणारी प्रणाली), पार्सल व्हॅन (व्हीपीयू) वर सेन्सर-आधारित वजन मोजणी उपकरण, रेल्वेडब्यांवरील सौर पॅनेल, एआय-आधारित रेल्वेडब्यांची स्वच्छता देखरेख प्रणाली, धुक्यात अडथळा शोधणे आणि एआय-आधारित निवृत्तीवेतन आणि वाद निवारण प्रणाली यांचा समावेश आहे.
रेल्वेमध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात आणि पद्धतशीर समावेश करण्यासाठी रेलटेक धोरण आखलेले असल्याचे वैष्णव यांनी तिसऱ्या सुधारणेची रूपरेषा मांडताना सांगितले. स्टार्टअप्स, संशोधक आणि नवोन्मेषक भारतीय रेल्वेशी संरचित, अर्थपूर्ण आणि सुलभरित्या जोडले जाणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला. तंत्रज्ञानविषयक चांगली कल्पना असलेले कोणीही समर्पित रेलटेक पोर्टलद्वारे रेल्वेशी संपर्क साधू शकतात आणि हे पोर्टल पूर्णपणे डिजिटल असून एन्ड टू एन्ड प्रक्रियेद्वारे कार्यरत असेल,असे त्यांनी सांगितले.
संरक्षण क्षेत्रातील आयडीईएक्स उपक्रम, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील स्टार्टअप आराखडा आणि दूरसंचार क्षेत्रातील नवोन्मेष धोरणे यासारख्या यशस्वी मॉडेल्सचा अभ्यास केल्यानंतर रेलटेक धोरण तयार करण्यात आल्याचे वैष्णव यांनी सांगितले. या अनुभवांच्या आधारे रेल्वेने प्रक्रियात्मक अडथळे दूर करण्याचा आणि पारदर्शक, सरलीकृत आणि नवोन्मेष-स्नेही परिसंस्था तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की जर हे मॉडेल यशस्वी झाले, तर ते इतर क्षेत्रांसाठीही एक नमुना म्हणून काम करू शकते.
ई-आरसीटी: 'रेल्वे दावे न्यायाधिकरण' प्रकरणांच्या निपटाऱ्यामध्ये सुधारणा
सुधारणा क्रमांक चारमध्ये, वैष्णव यांनी रेल्वे दावा न्यायाधिकरणाचे (आरसीटी) संपूर्ण डिजिटायझेशन आणि एआय-सक्षम परिवर्तन जाहीर केले. ई-आरसीटी प्रणाली रेल्वे दावे न्यायाधिकरणाचे संपूर्ण संगणकीकरण आणि डिजिटायझेशन सक्षम करेल. यामुळे दावे दाखल करणे, प्रक्रिया करणे आणि निर्णय घेणे यात परिवर्तन घडून येईल, ज्यामुळे ही प्रक्रिया जलद, अधिक पारदर्शक आणि देशात कोठूनही करणे सुलभ होईल. वैष्णव म्हणाले की, देशभरात 23 आरसीटी खंडपीठे आहेत आणि सध्या, विशेषतः जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा राज्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दावे दाखल करणे आव्हानात्मक आहे. दावा दाखल करण्यासाठी योग्य अधिकार क्षेत्र निश्चित करणे, हा अनेकदा महत्वाचा मुद्दा ठरतो.
ते म्हणाले की, दावे दाखल करण्याची प्रक्रिया सोपी, डिजिटल आणि देशात कोठूनही सहज असावी, हे या सुधारणेचे उद्दिष्ट आहे. नवीन प्रणाली अंतर्गत, पीडित प्रवासी प्रवास करताना अथवा त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतरही, मग ते कोणत्याही ठिकाणी असले तरी, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दावे दाखल करू शकतील. ई-फायलिंगपासून ते केस इन्फॉर्मेशन सिस्टीमपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि एआय-सक्षम असेल. या उपक्रमांतर्गत पुढील 12 महिन्यांत रेल्वे दावा न्यायाधिकरणाच्या सर्व खंडपीठांचे डिजिटायझेशन केले जाईल, अशी माहिती वैष्णव यांनी दिली.
सुषमा काणे/सोनाली काकडे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2233145)
अभ्यागत कक्ष : 24