कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तीन दिवसीय राष्ट्रीय पुसा कृषी विज्ञान मेळाव्याचे केले उद्घाटन


शिवराज सिंह चौहान यांनी 'विकसित कृषी क्षेत्र – आत्मनिर्भर भारत’ या दिशेने कृषी क्षेत्राला नेणाऱ्या प्रमुख कृषी सुधारणांचा पथदर्शी कार्यक्रम केला सादर

Posted On: 25 FEB 2026 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2026

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुधवारी दिल्लीतील पुसा येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या परिसरामध्ये आयोजित तीन दिवसीय पुसा कृषी विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन केले.  भारतीय शेतीला 'विकसित कृषी  - आत्मनिर्भर भारत' या दिशेने  नेण्याच्या उद्देशाने प्रमुख कृषी सुधारणांचा व्यापक पथदर्शी कार्यक्रम  त्यांनी सादर केला. यावेळी  त्यांनी  स्पष्‍ट केले की, शेतकऱ्यांचे पैसे रोखून ठेवण्याची जुनी पद्धत यापुढे सहन केली जाणार नाही. ‘एमएसपी’ खरेदीपासून ते किसान क्रेडिट कार्ड कर्ज, कीटकनाशक परवाना आणि कृषी विज्ञान केंद्रांची भूमिका, अशा प्रत्येक स्तरावर पारदर्शकता, कालबद्ध वितरण आणि उत्तरदायित्व सुनिश्चित केले जाईल.

पुसा येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या  परिसरामध्ये आयोजित प्रतिष्ठित वार्षिक पुसा कृषी विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते औपचारिक वृक्षारोपण करून करण्यात आले.

शेतकऱ्यांचे पैसे रोखून ठेवल्यास 12% व्याज द्यावे लागेल

कृषी सुधारणांबद्दल बोलताना, शिवराज चौहान यांनी प्रथम शेतकऱ्यांची  देणी देण्यास विलंब होण्याच्या मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी  कडक इशारा देताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे पैसे रोखून ठेवणाऱ्या कोणत्याही एजन्सीला किंवा राज्य सरकारला रोखलेल्या रकमेवर 12% व्याज द्यावे लागेल.

कृषी विज्ञान केंद्रे जिल्हास्तरीय कृषी सुधारणेची प्रमुख केंद्रे बनणार

कृषी विज्ञान केंद्रांची भूमिका अधोरेखित करताना, केंद्रीय मंत्री म्हणाले की, संशोधन आणि विस्तार यांच्यातील सेतू म्हणून काम करणाऱा एक मजबूत जिल्हास्तरीय घटक  म्हणून कृ‍षी विज्ञान केंद्रे विकसित केली जातील.

कीटकनाशक परवान्यातील विलंब थांबवणे

यावेळी त्यांनी असे सूचित केले की, वेगवेगळे टप्पे  कमी करून, सुयोग्य  वेळापत्रक निश्चित करण्‍यात येईल आणि संपूर्ण पारदर्शकता ठेवून  कीटकनाशक परवाना प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

किमान आधारभूत किमतीवर खरेदी एका महिन्यात पूर्ण करावी

किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) खरेदीबाबत, त्यांनी राज्यांशी समन्वय साधून जास्तीत जास्त एका महिन्याच्या आत किमान आधारभूत किमतीने  खरेदी पूर्ण करण्यासाठी यंत्रणा उभारण्याची सूचना केली. यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ आणि योग्य भाव मिळतील आणि नंतर इतरांना किमान आधारभूत किमतीच्या नावाखाली अनुचित फायदा  मिळवण्यापासून रोखता येईल.

एप्रिलमध्ये विकसित कृषी संकल्प मोहीम पुन्हा सुरू होणार

भविष्यातील रणनीतीची रूपरेषा सांगताना, कृषी मंत्री  शिवराज सिंह चौहान यांनी 'विकसित कृषी संकल्प अभियान' याची  तपशीलवार माहिती दिली. ते म्हणाले की, ही मोहीम एप्रिलमध्ये खरीप हंगामापूर्वी सुरू होऊन कालबद्ध पद्धतीने राबविली जाईल. त्यामुळे  शेतकऱ्यांना वैज्ञानिक सल्ला, चांगले बियाणे आणि सुधारित तंत्रज्ञान यांचा लाभ घेता येईल. 

पुसा कृषी विज्ञान मेळाव्याचे वर्णन शेतकऱ्यांचा ‘राष्ट्रीय कुंभ' म्हणून करताना केंद्रीय मंत्री  शिवराज सिंह चौहान म्हणाले की,  हा कार्यक्रम केवळ एक प्रदर्शन नाही तर देशभरातील शेतकरी, शास्त्रज्ञ, उद्योजक आणि धोरणकर्त्यांचा एक प्रमुख संगम आहे.

 

* * *

निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2232910) अभ्यागत कक्ष : 7