सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हरदीप सिंग गिल आणि करमसिंग कर्मा यांनी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य म्हणून 23.02.2026 (ए/एन) पासून घेतला पदभार

Posted On: 25 FEB 2026 7:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2026

 

सामाजिक आणि संघटनात्मक कार्यात हरदीप सिंग गिल सदैव सक्रिय सहभाग घेत आले आहेत. समुदाय विकासाच्या दृष्टीने त्यांनी जिल्हा आणि राष्ट्रीय अशा दोन्ही स्तरांवर योगदान दिले आहे. अंमली पदार्थ प्रतिबंध, सामाजिक जागृती, समुदाय गतिशीलता, आणि युवा सक्षमीकरण अशा सामाजिक मुद्द्यांना हात घालणाऱ्या मोहिमांमध्ये त्यांनी आजवर सक्रिय सहभाग घेतला आहे. स्वच्छता मोहिमा, जनजागृती उपक्रम, आणि तळागाळातील लोकांना सहभागी करून घेण्याचे उपक्रम यांतील त्यांचा सहभाग म्हणजे, सामाजिक प्रश्नांप्रति आणि सर्वसमावेशक विकासाप्रति त्यांच्या तळमळीचे द्योतक आहे.

करम सिंग कर्मा हे अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आहेत. स्वच्छता कर्मचारी आणि वंचित समुदायांच्या विकासाशी संबंधित सामाजिक आणि संघटनात्मक कार्याशी त्यांचा निकटचा संबंध आहे. सफाई कामगारांच्या अधिकार, प्रतिष्ठा, व्यावसायिक सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षेची बाजू त्यांनी नेहमीच प्रखरपणे मांडली आहे. समाजातील वंचित आणि असुरक्षित वर्गांच्या समस्या-- जसे की- शिक्षण, आरोग्यसेवांची उपलब्धता, रोजगारासंबंधी पाठबळ, आणि धोरणात्मक बाबतींत त्यांना प्रतिनिधित्व -- या मुद्द्यांचा ते पाठपुरावा करत आले आहेत. संघटनात्मक रचनांना बळकटी देण्यात आणि विविध मंचावर सफाई कर्मचाऱ्यांचा आवाज बुलंद करण्यात त्यांच्या नेतृत्वाने मोलाचे योगदान दिले आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण मंत्रालयाने दोन्ही सदस्यांचे यथोचित स्वागत केले आहे. त्यांचे अमूल्य अनुभव, नेतृत्व आणि समर्पित सेवेच्या बळावर, देशभरच्या सफाई कर्मचाऱ्यांचे कल्याण व्हावे, त्यांना प्रतिष्ठा मिळावी, आणि त्यांचे सामाजिक-आर्थिक उन्नयन व्हावे-- याची काळजी घेण्याच्या निर्धाराचे स्मरण करत मंत्रालयाने पुढील वाटचाल ठरवली आहे.

 

* * *

नेहा कुलकर्णी/जाई वैशंपायन/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2232816) अभ्यागत कक्ष : 9