वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत आणि आखाती सहकार्य परिषदेने, भारत-जीसीसी यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या संयुक्त निवेदनावर केल्या स्वाक्षरी
Posted On:
24 FEB 2026 9:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2026
भारत- जीसीसी यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या संयुक्त निवेदनावर आज -24 फेब्रुवारी, 2026 रोजी नवी दिल्ली येथे, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि आखाती सहकार्य परिषदेचे महामहिम जसीम मोहम्मद अल बुदैवी यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी उभय बाजूंची शिष्टमंडळे आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी कार्यक्रमाच्यावेळी पीयूष गोयल यांनी यावर भर दिला की, 5 फेब्रुवारी 2026 रोजी स्वाक्षरी केलेल्या मुक्त व्यापार करारासाठी संदर्भ अटींसह (टीओआर) निवेदन भारत आणि जीसीसी देशांच्या संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. सामायिक इतिहास आणि सांस्कृतिक संबंध याविषयीच्या खोलवर रुजलेल्या या संबंधांना व्यापक-आधार आणि परस्पर फायदेशीर मुक्त व्यापार कराराद्वारे आणखी चालना मिळेल, ही गोष्ट गोयल यांनी अधोरेखित केली. जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, परस्पर समन्वय आणि पूरकता निर्माण करणाऱ्या मजबूत व्यापार व्यवस्थेवर चर्चा सुरू होण्यासाठी आता सर्वात योग्य संधी आहे असेही त्यांनी नमूद केले.
महामहिम जसीम मोहम्मद अल बुदैवी यांनी यावर भर दिला की, मुक्त व्यापार करार हा भारत आणि जीसीसी देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून काम करेल, त्यामुळे व्यवसायांसाठी योग्य अंदाज बांधणे आणि निश्चितता निर्माण होईल.
भारताचे व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात दीर्घकालीन ऐतिहासिक संबंध असलेल्या एका महत्त्वाच्या प्रदेशाशी व्यापाराची व्दारे मुक्त करण्याची आणि विस्तारण्याची ‘एफटीए’मध्ये लक्षणीय क्षमता आहे. जीसीसी हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार गट आहे. या गटाबरोबर द्विपक्षीय व्यापार आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 178.56 अब्ज डॉलर्स (यापैकी निर्यात: 56.87 अब्ज डॉलर्स; आयात: 121.68 अब्ज डॉलर्स) पर्यंत पोहोचला आहे. हे प्रमाण भारताच्या जागतिक व्यापाराच्या 15.42 टक्के आहे. गेल्या पाच वर्षांत, ‘जीसीसी’सोबत भारताचा व्यापार सातत्याने वाढला आहे. या व्यापारामध्ये वार्षिक सरासरी 15.3 टक्के वाढ नोंदवली आहे.
भारताकडून जीसीसीला होणाऱ्या प्रमुख निर्यातींमध्ये अभियांत्रिकी वस्तू, तांदूळ, कापड, यंत्रसामग्री, रत्ने आणि आभूषणे यांचा समावेश आहे. जीसीसीमधून होणाऱ्या आयातीतील प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने कच्चे तेल, एलएनजी, पेट्रोकेमिकल्स आणि सोन्यासारख्या मौल्यवान धातूंचा समावेश आहे. एकत्रितपणे, जीसीसी देश 61.5 दशलक्ष लोकांची बाजारपेठ (2024 ) आणि सध्याच्या किमतींवर जीडीपीच्या बाबतीत 2.3 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचे प्रतिनिधित्व करतात.व्यापार या श्रेणीनुसार जागतिक स्तरावर 9 व्या क्रमांकावर आहे. जीसीसी प्रदेश हा भारतासाठी ‘एफडीआय’चा एक महत्त्वाचा स्रोत आहे, सप्टेंबर 2025 पर्यंत 31.14 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे.
जीसीसीमध्ये भारतीय समुदायाचे जवळजवळ दहा दशलक्ष सदस्य आहेत.हे सदस्य दोन्ही देशांमधील सेतू म्हणून काम करतात. हे मजबूत आणि शाश्वत ‘लोकांचे - लोकांबरोबर असलेले संबंध म्हणजे भारत आणि जीसीसी देशांमधील संबंधांचा पाया आहे. या प्रदेशात भारतीय कंपन्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे उभय बाजूंनी संबंध आणखी मजबूत होत आहेत.
भारत-जीसीसी यांनी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दोन्ही बाजूंनी व्यापारी बाजारपेठ पूर्ण क्षमतेने उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे आणि जागतिक हितासाठी अनेकपटींनी बळ वाढेल. त्याचबरोबर निर्यातीचा विस्तार आणि विविधीकरण सुलभ होईल आणि दोन्ही बाजूंमधील आर्थिक एकात्मता मजबूत होण्यास मदत मिळेल.
सोनाली काकडे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2232453)
अभ्यागत कक्ष : 11