आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शेगाव येथे चार दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 चे आयोजन, या मेळ्यात आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा आणि होमिओपॅथी एकाच छताखाली येणार


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 25 फेब्रुवारी रोजी शेगाव येथे करणार राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 चे उद्घाटन

Posted On: 23 FEB 2026 5:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी 2026

भारत सरकारचे आयुष मंत्रालय, अखिल भारतीय आयुर्वेदिक काँग्रेसच्या सहकार्याने 25 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील  शेगाव येथे चार दिवसांचा "राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026" आयोजित करत आहे.

औषधी वनस्पती लागवड आणि कृषी वनीकरणाद्वारे आयुष औषध प्रणालींबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे , सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रदान करणे आणि शेतकऱ्यांसाठी उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण करणे हे या मेळ्याचे उद्दिष्ट आहे.

राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 चे उद्घाटन 25 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन समारंभ संत गजानन महाराज संस्थानच्या विसावा मैदानावर होणार आहे. उद्घाटन समारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आणि इतर अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या संपूर्ण मेळ्यात नागरिकांना आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा रिग्पा, होमिओपॅथी आणि इतर पारंपरिक आरोग्यसेवा शाखांसह विविध आयुष प्रणालींमार्फत मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि औषधे घेण्याची संधी मिळेल.

आयुष क्षेत्रातील उत्कृष्ट उत्पादन पद्धती, गुणवत्ता मानके आणि अलीकडील संशोधन प्रदर्शित करण्यासाठी अनेक प्रतिष्ठित आयुष औषधनिर्माण आणि वेलनेस  कंपन्या या मेळ्यात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर दैनंदिन आरोग्य गरजांसाठी औषधी वनस्पती आणि साध्या घरगुती उपचारांचे समर्पित प्रदर्शन देखील या मेळ्यात भरवले जाणार आहे.

बुलढाणा जिल्हा आणि आसपासच्या भागातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा शाश्वत आणि लाभदायी स्रोत म्हणून कृषी वनीकरण आणि औषधी वनस्पतींची लागवड स्वीकारण्यास प्रोत्साहन देणारा एक विशेष उपक्रम यावेळी आयोजित करण्यात आला असून,तो या राष्ट्रीय आरोग्य मेळा -2026 चे एक प्रमुख आकर्षण आहे.27 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3.00 वाजता शेगाव येथील विसावा परिसरात "आयुर्वेदिक शेती, उत्पादन आणि विपणन" या विषयावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या महामेळाव्यात, शेतकऱ्यांना वनोत्पादनांवर  आधारित आणि औषधी पिकांची लागवड, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विपणन यावर तज्ज्ञांचे  मार्गदर्शन मिळेल जेणेकरून पारंपारिक शेती करणाऱ्यांना आयुर्वेदिक शेतीसह ते करता येईल आणि त्यांच्या  उत्पन्नात भर पडेल.

केंद्रीय आयुष मंत्री  प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांना आयुर्वेदिक शेती आणि उत्पादन कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होण्याचे आणि पारंपारिक पिकांसोबत औषधी वनस्पती लागवडीची क्षमता शोधण्याचे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीचा काही भाग औषधी वनस्पतींसाठी  राखून ठेवल्याने शेतकऱ्यांना शाश्वत आणि लाभदायी उत्पन्न मिळेल, तर नागरिकांना उच्च दर्जाचे नैसर्गिक उपचार पर्याय उपलब्ध होतील आणि आयुष मूल्य साखळी अधिक मजबूत होईल  असे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांमधील नागरिक, शेतकरी, बचत गट, विद्यार्थी, आरोग्य स्वयंसेवक आणि आयुष भागधारक यांनी शेगावला भेट देऊन राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि या  राष्ट्रीय कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. 

 

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2231839) अभ्यागत कक्ष : 20