राष्ट्रपती कार्यालय
एस्टोनियाच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
Posted On:
19 FEB 2026 11:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2026
एस्टोनिया प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष अलार करिस यांनी आज (19 फेब्रुवारी 2026) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

एस्टोनिया प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरच्या पहिल्या भारत भेटीत राष्ट्राध्यक्ष करिस यांचे स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, सामायिक लोकशाही मूल्ये, आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर आणि नियमाधारित जागतिक व्यवस्थेप्रति समान वचनबद्धतेवर भारत आणि एस्टोनियामधील मैत्रीपूर्ण संबंध आधारित आहेत.
एस्टोनियाने डिजिटल आणि एआय क्षेत्रात प्रचंड मोठे योगदान दिले असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केले. एस्टोनियाची एआय आणि शिक्षणक्षेत्रातील प्रगती पाहता या एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत त्यांच्या सहभागामुळे शिखर परिषदेच्या इतर सहभागींना त्यांच्या अनुभवाचा खूप फायदा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रपती म्हणाल्या की कृत्रिम बुद्धिमत्ता ही शक्ती असून तिचा उपयोग जागतिक भल्यासाठी झाला पाहिजे असा भारत आणि एस्टोनियाचा दृष्टिकोन आहे . सध्याच्या वाढत्या अनिश्चिततेच्या काळात , सायबरसुरक्षा आणि एआयच्या सुरक्षित वापराच्या दृष्टीने दोन्ही देशांचे सहकार्य अधिक फलदायी होऊ शकते . भारत आणि एस्टोनियामध्ये डिजिटल क्षेत्रात अर्थपूर्ण सहकार्य असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एस्टोनिया आघाडीवर आहे आणि भारताकडे एक चैतन्यमयी स्टार्टअप परिसंस्था आहे असे त्यांनी सांगितले. एस्टोनियाच्या तंत्रज्ञान कौशल्याचे भारतातील गतिशील स्टार्टअप्सशी संयोजन केल्याने दोन्ही देशांना फायदा होऊ शकतो.

भारत- युरोपीय महासंघामधील संबंध आता धोरणात्मकदृष्ट्या गतीशील होत असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. युरोपीय महासंघ आणि त्याच्या सदस्य देशांसोबतच्या संबंधांना भारताच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार कराराच्या यशस्वी पूर्ततेसाठी एस्टोनियाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. या मुक्त व्यापार करारामुळे नवीन संधींचे मार्ग खुले होतील असे त्या म्हणाल्या.
भारत आणि एस्टोनियामधील द्विपक्षीय सहकार्य आणखी दृढ करण्यासाठी अतिशय सकारात्मक वातावरण असल्याचे दोन्ही नेते म्हणाले.अलिकडच्या काळात तंत्रज्ञान, डिजिटल प्रशासन आणि व्यापार विस्तारावर केंद्रित उच्च-स्तरीय आदानप्रदानात प्रगती झाल्याची दखल घेत दोन्ही नेत्यांनी त्याबद्दल आनंद व्यक्त केला. या भेटीमुळे द्विपक्षीय सहकार्यात सकारात्मक गती राखण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोनाली काकडे/उमा रायकर/प्रिती मालंडकर
(Release ID: 2230549)
अभ्यागत कक्ष : 6