राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav AI Impact Summit 2026

स्लोव्हाक प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

Posted On: 19 FEB 2026 10:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2026
 

 

स्लोव्हाक प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष  पीटर पेलेग्रिनी यांनी आज 19 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

राष्ट्रपती भवन येथे राष्ट्राध्यक्ष पेलेग्रिनी यांचे स्वागत करताना राष्ट्रपतींनी गतवर्षी स्लोव्हाक प्रजासत्ताकाला दिलेल्या आपल्या  भेटीच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्या भेटीदरम्यान मिळालेल्या सन्मानपूर्वक स्वागत व आदरातिथ्यासाठी त्यांचे आभार मानले.

राष्ट्रपतींनी ‘एआय इम्पॅक्ट परिषद’मधील सहभागाबद्दल स्लोव्हाक प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षांचे कौतुक केले. त्यांनी नमूद केले की, भारत आणि जगासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. “लोक, ग्रह  आणि प्रगती ” या तत्त्वांवर आधारित हे संमेलन  असून, कृत्रिम बुद्धिमत्ता मानवकल्याणासाठी कार्य करेल आणि सर्वसमावेशक विकासास चालना देईल.

राष्ट्रपतींनी सांगितले की, भारत “ सार्वजनिक हितासाठी तंत्रज्ञान” या तत्त्वावर कार्यरत असून, त्याच धर्तीवर हा शिखर परिषदेचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वांसाठी सुलभ व उपयुक्त ठरावी, यावर या परिषदेचा भर आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत-स्लोव्हाक सहकार्य जगासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते, असे त्यांनी अधोरेखित केले.

राष्ट्रपतींनी नमूद केले की, उच्चस्तरीय परस्पर भेटी आणि विविध क्षेत्रांतील सहकार्यामुळे भारत-स्लोव्हाक प्रजासत्ताक द्विपक्षीय संबंधांना अलीकडेच नवचैतन्य लाभले आहे. व्यापार, गुंतवणूक, विज्ञान व तंत्रज्ञान, संरक्षण सहकार्य तसेच लोकसंपर्क या क्षेत्रांत दोन्ही देशांतील भागीदारी सातत्याने विस्तारत आहे, असे त्यांनी सांगितले.

दोन्ही नेत्यांनी या भेटीमुळे भारत आणि स्लोव्हाक प्रजासत्ताक यांच्यातील विकसित होत असलेल्या द्विपक्षीय भागीदारीला अधिक गती मिळेल तसेच डिजिटल सहकार्यासह नव्या क्षेत्रांत सहकार्याची भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला.

सोनाली काकडे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 
 

 


(Release ID: 2230541) अभ्यागत कक्ष : 6