वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्याबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली
भारत ईएफटीए व्यापार व आर्थिक भागीदारी करारांतर्गत भारत स्वित्झर्लंडमधील धोरणात्मक सहकार्य प्रगतीपथावर
प्रविष्टि तिथि:
19 FEB 2026 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2026
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय परमेलिन यांच्याबरोबर 19 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक घेतली. ते इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले होते.
भारत-ईएफटीए व्यापार व आर्थिक भागीदारी करार (टीईपीए) अंतर्गत भारत आणि स्वित्झर्लंडची दीर्घकालीन आर्थिक भागीदारी आणि धोरणात्मक सहकार्य आणखी दृढ करण्यासाठी सामायिक वचनबद्धतेची या बैठकीत पुष्टी करण्यात आली. एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांनी नवोपक्रम जबाबदारीच्या भावनेचे संतुलन साधण्याची गरज मान्य केली, तसेच उच्चस्तरीय अभियांत्रिकी, आरोग्य विज्ञान, अक्षय ऊर्जा, नवोपक्रम तसेच संशोधन आणि विकास यासारख्या क्षेत्रात तंत्रज्ञान सहकार्यासाठी टीईपीएद्वारे महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होऊ शकतात हे नमूद केले.
भारताच्या विकासाच्या मार्गावर प्रकाश टाकताना पियुष गोयल म्हणाले की, भारत सध्या जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे व भारताचा 2026 मधील जीडीपी अंदाजे 451अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. भारतात सुधारणांची गती जास्त आहे, तसेच एक मोठी आणि विस्तारणारी बाजारपेठ, मजबूत औद्योगिक पाया आणि व्यवसाय सुलभतेवर भर असल्यामुळे भारतात डिजिटायझेशन आणि पायाभूत सुविधांवर आधारित स्पर्धात्मकता आहे . यामुळे भारताच्या रूपाने दीर्घकालीन भागीदारीसाठी एक स्थिर व्यासपीठ उपलब्ध होते. ज्या क्षेत्रांमध्ये स्वित्झर्लंडने उच्च तांत्रिक क्षमता मिळवलेली आहे, अशा क्षेत्रांमध्ये भारतात स्विस गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्याचे महत्व गोयल यांनी पुन्हा अधोरेखित केले. उच्च-गुणवत्तेची व रास्त दरात औषधे आणि लसींचा विश्वासार्ह जागतिक पुरवठादार म्हणून भारताची भूमिका देखील त्यांनी अधोरेखित केली. दोन्ही देशांनी संशोधन आणि विकास, जैवतंत्रज्ञान, विशेष औषधनिर्माण आणि प्रगत उपचारांमध्ये सखोल सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
टीईपीएच्या क्षमतेचा पूर्णपणे वापर करण्यासाठी गुंतवणूक ओघ, नियामक सहकार्य आणि संस्थात्मक सहभाग वाढवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची दोन्ही देशांनी ग्वाही दिली. भारतात सहभाग वाढवू इच्छिणाऱ्या स्विस कंपन्यांसाठी सुविधा यंत्रणा म्हणून सुरु केलेल्या ‘इन्व्हेस्ट इंडिया’मधील समर्पित ईएफटीए केंद्राबद्दलही गोयल यांनी माहिती दिली .
भविष्यातील उच्चस्तरीय चर्चांमधून द्विपक्षीय आर्थिक सहकार्य मजबूत होईल व त्यामुळे दोन्ही देशांमधील दीर्घकालीन समृद्धीसाठी मार्ग सुकर होईल अशी अपेक्षा दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली.
टिईपीए हा ईएफटीए गटातील विकसित देशांशी ( आइसलँड, लिकटेंस्टीन, नॉर्वे व स्वित्झर्लंड) भारताचा हा पहिलाच मुक्त व्यापार करार आहे. याचसोबत युरोपीय आर्थिक गटासोबत अमलात आलेला भारताचा हा पहिलाच सक्रिय व्यापार करार आहे. या गटात इतर दोघांचा म्हणजे युरोपीय महासंघ आणि युनायटेड किंगडम यांचा समावेश आहे. या करारामुळे स्वित्झरलँडच्या 1.0 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स किमतीच्या बाजारपेठेमध्ये ‘मेक इन इंडिया’ उत्पादनांना प्रवेश मिळणार आहे. टीईपीएमुळे शेतकरी, मत्स्यपालकांपासून वनवासी, कामगार, युवक, लघु उद्योग व व्यावसायिकांपर्यंत सर्वांना नवीन संधींची व प्रकाशमान आर्थिक भवितव्याची दारे खुली होणार आहेत.
टीईपीए अंतर्गत ईएफटीएकडून आयातशुल्कात भरीव सूट मिळून त्या बाजारपेठेत 99.6% भारतीय उत्पादनांचा प्रवेश सुलभ होईल. त्यात प्रक्रियाकृत कृषी उत्पादनांचाही समावेश असेल. भारतातील सर्व राज्यांना यामुळे अमर्याद संधी मिळणार आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील द्राक्षे, कर्नाटकातील कॉफी, केरळमधील मसाले व सागरी उत्पादने, ईशान्येकडील राज्यांमधील बागायती उत्पादने, इत्यादी अनेक वस्तूंच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे. यात भारताने आपल्या दुग्धोत्पादन, सोयाबीन तसेच कोळसा क्षेत्रासारख्या संवेदनशील क्षेत्रांना संरक्षण दिले असून यामुळे शेतकरी, लघु उद्योजक व इतर उद्योजकांना संरक्षण मिळेल. औषधनिर्मिती, वैद्यकीय उपकरणे, प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ इत्यादी क्षेत्रातील उत्पादक संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेतील उद्योगांनाही या करारातून संरक्षित केले आहे. टीईपीएद्वारे भारतात 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक व 10 लाख थेट रोजगार उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षा आहे.
सोनाली काकडे/उमा रायकर/प्रिती मालंडकर
(रिलीज़ आईडी: 2230414)
आगंतुक पटल : 48