इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ग्लोबल साऊथसाठी समावेशक आणि बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा भारताने केला पुरस्कार, भारताकडून नवी दिल्ली फ्रंटिअर एआय कमिटमेंट्सची घोषणा
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या सुलभ उपलब्धतेचे आणि नवोन्मेषाचे लोकशाहीकरण करणे हे नवी दिल्ली फ्रंटिअर एआय कमिटमेंट्सचे उद्दिष्ट
मानवाचे, मानवाद्वारे आणि मानवासाठी अशा स्वरुपातील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देऊ या : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
Posted On:
19 FEB 2026 7:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2026
इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 च्या उद्घाटन समारंभादरम्यान केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली फ्रंटियर एआय इम्पॅक्ट कमिटमेंट्सची घोषणा केली.समावेशक आणि जबाबदारपूर्व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी आघाडीच्या जागतिक कंपन्या आणि भारतातील स्थानिक संशोधकांना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या या परिषदेची ही एक ऐतिहासिक फलनिष्पत्ती ठरली आहे.

यावेळी अश्विनी वैष्णव यांनी उपस्थितांना संबोधितही केले.आपल्या संबोधनातून त्यांनी लोकशाहीकरण, व्याप्ती आणि सार्वभौमत्वाच्या पायावर आधारलेल्या भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विषयक धोरणाची मांडणी केली. वैष्णव यांनी ॲप्लिकेशन्स, प्रारुपे (मॉडेल्स), संगणकीय क्षमता, प्रतिभा आणि ऊर्जा या पाच स्तरीय एआय स्टॅकच्या भारताच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाची रूपरेषाही मांडली. आपल्या संबोधनातून त्यांनी हे तंत्रज्ञान आरोग्यसेवा, कृषी, शिक्षण तसेच सार्वजनिक सेवांमध्ये प्रत्यक्ष अंमलात आणण्याच्या कृतीवर भर दिला.

"कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक पायाभूत तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाने आपण ज्या पद्धतीने काम करतो, शिकतो आणि निर्णय घेतो, त्यात बदल घडवून आणण्याची सुरुवात केली आहे. कोणत्याही तंत्रज्ञानाचे खरे मूल्य हे त्याचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यातच असल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यादृष्टीने तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करणे, त्याची व्याप्ती वाढवणे आणि ते सर्वांना सुलभतेने उपलब्ध असेल हाच दृष्टिकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवलंबला असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळेच आज भारत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पाचही स्तरांवर काम करत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे मिळणाऱ्या लाभांचा आपण प्रामाणिकपणे उपयोग करून घेऊ लागलो की, या तंत्रज्ञानाशी संबंधित धोके कमी करण्यासाठी सामूहिक उपाययोजनांचा शोधही घेतलाच पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी मानवी सुरक्षितता आणि प्रतिष्ठा या बाबी ठेवूनच आपण दृढ विश्वासाने पुढे वाटचाल करू शकतो. मानवाचे, मानवाद्वारे आणि मानवासाठी अशा स्वरुपातील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या भविष्याला आपण आकार देऊ या" असे आवाहन अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केले.
ऐच्छिक वचनबद्धतेच्या घोषणांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींचा विकास आणि वापर, विशेषतः साऊथ ग्लोबलमधल्या देशांसाठी याचा विकास आणि वापर, हा समन्याय्य, सांस्कृतिक विविधता आणि वास्तविक गरजांना अनुकूल असावा, ही सामायिक भावना उमटलेली आहे. या उपक्रमाअंतर्गत आघाडीवरील अनेक जागतिक कंपन्यांसोबतच Sarvam, BharatGen, Gnani.ai आणि Soket यांसारख्या भारतीय संशोधक संस्थांही भागिदार संस्था म्हणून सहभागी झाल्या आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वास्तव जगातील वापराविषयी जागरूकता वाढवणे ही या अंतर्गत पहिली वचनबद्धता आहे. या अंतर्गत व्यक्तींच्या ओळखीची गुप्तता राखलेली माहिती (anonymized) आणि माहितीच्या एकंदरीत विश्लेषणाच्या माध्यमातून वास्तव जगात या तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या मूल्यावर भर दिला गेला आहे. याअंतर्गत सहभागी संस्था रोजगाराच्या संधी, कौशल्ये, उत्पादकता आणि आर्थिक परिवर्तनावर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या परिणामांचे पुरावे संकलित करण्याचे काम करणार आहेत. यामुळे विविध क्षेत्रांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जात आहे, याचे माहिती साठ्यावर आधारित विश्लेषण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे सरकार आणि संस्थांना जोखीमांचे प्रमाण कमी करून जास्तीत जास्त लाभ मिळवता येण्याजोग्या धोरणात्मक रणनीती आखण्यात मोठी मदत होणार आहे.
बहुभाषिक आणि संदर्भीय मूल्यमापनाला बळकटी देणे ही याअंतर्गतची दुसरी वचनबद्धता आहे. याअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली या विविध भाषा, संस्कृती आणि प्रत्यक्ष वापराच्या अनुषंगाने परिणामकारक असतील याची सुनिश्चिती करण्यावर भर दिला गेला आहे. याअंतर्गत ज्या भाषा आणि सांस्कृतिक संदर्भांना जागतिक स्तरावर कमी प्रतिनिधित्व मिळाले आहे, अशा क्षेत्रांसाठीच्या मूल्यमापनाकरता माहितीसाठा संच तसेच निकष विकसित करण्यासाठी, या उपक्रमात सहभागी झालेल्या संस्था सरकार तसेच स्थानिक परिसंस्थेसोबत सहकार्यपूर्ण भागिदारीत काम करणार आहेत. अशा सामुहिक प्रयत्नांमुळे वैविध्यपूर्ण लोकसंख्येच्या बाबतीतील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराच्या कामगिरीत सुधारणा घडून येईल. यासोबतच जागतिक स्तरावर उच्च दर्जाचे तंत्रज्ञान सुलभतेने उपलब्ध असेल यादृष्टीने या तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरणही घडून येईल. त्याचवेळी विविध पर्यायांची निवड करण्याची सुलभता तसेच मूल्यमापनाच्या कार्यपद्धतींमधील लवचिकताही कायम राखता येणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान व्यापकरित्या मानवतेच्या सेवेसाठी कामी येईल याची सुनिश्चिती करायची असेल तर त्यासाठी सरकार, उद्योगक्षेत्र आणि संशोधन करणाऱ्या समुदायांनी अशा तऱ्हेने परस्पर सहकार्यपूर्ण भागिदारीअंतर्गत काम करणे गरजेचे असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी ठळकपणे अधोरेखित केले. या परिषदेत सहभागी झालेल्या सर्व संस्थांमधील दिग्गज व्यक्तिमत्वांनी, जगभरात एक जबाबदारपूर्व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विकसित करण्याचा पाया म्हणून या वचनबद्धतेत सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
सोनाली काकडे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
(Release ID: 2230376)
अभ्यागत कक्ष : 10