इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत मंडपम येथे अभूतपूर्व जागतिक सहभागासह 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026' चा प्रारंभ


एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 साठी नवी दिल्लीत 20 पेक्षा जास्त राष्ट्रप्रमुख, 60 मंत्री आणि 500 जागतिक एआय नेते एकत्र

16 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत नवी दिल्लीत पहिल्यांदाच आयोजित 'ग्लोबल एआय समिट' द्वारे भारत जागतिक एआय संवादाचे नेतृत्व करत आहे

Posted On: 16 FEB 2026 9:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 फेब्रुवारी 2026

 

इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद  2026' चा आज भारत मंडपम येथे प्रारंभ झाला. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आधारित एवढ्या मोठ्या प्रमाणावरील जागतिक परिषद 'ग्लोबल साऊथ' देशामध्ये  आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही शिखर परिषद राष्ट्रप्रमुख, सरकार, मंत्री, जागतिक तंत्रज्ञान नेते, प्रख्यात संशोधक, बहुपक्षीय संस्था आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांना सर्वसमावेशक विकास, सार्वजनिक प्रणाली बळकट करण्यासाठी आणि शाश्वत विकास साधण्यासाठी एआयच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी एकत्र आणणार आहे.

19 फेब्रुवारी रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनपर भाषण करतील, ज्यामध्ये जागतिक सहकार्य आणि सर्वसमावेशक व जबाबदार एआयसाठी भारताचा दृष्टिकोन मांडला जाईल. 16 ते 20 फेब्रुवारी 2026 या पाच दिवसांच्या शिखर परिषदेमध्ये 100 पेक्षा जास्त सरकारी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, ज्यात 20 पेक्षा जास्त राष्ट्रप्रमुख आणि 60 मंत्री व उपमंत्र्यांचा समावेश आहे. तसेच यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, संस्थापक, शैक्षणिक तज्ज्ञ, संशोधक, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी  आणि परोपकारी संस्थांच्या 500 पेक्षा जास्त जागतिक एआय नेत्यांचा सहभाग असेल.

या शिखर परिषदेचे मुख्य आकर्षण म्हणजे - 'AI for ALL', 'AI by HER', आणि 'YUVAi' या तीन प्रमुख 'ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंजेस'चा निकाल आणि ग्रँड फिनाले सादरीकरण आहे. सर्वसमावेशक, जबाबदार आणि विकासाभिमुख कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी ही आव्हाने सुरू करण्यात आली होती, जेणेकरून राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि जागतिक विकास उद्दिष्टांशी सुसंगत अशी उच्च-प्रभावी एआय सोल्युशन्स म्हणजेच उपाययोजना विकसित होतील. या उपक्रमांसाठी 60 पेक्षा जास्त देशांतून 4,650 हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढता सहभाग आणि जबाबदार एआय नवोन्मेषांचे केंद्र म्हणून भारताचा उदय दिसून येत आहे.

क्षेत्रीय तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि उद्योग नेत्यांद्वारे  कठोर मूल्यमापनानंतर, तीन श्रेणींमधील अव्वल 70 संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. हे संघ 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम आणि सुषमा स्वराज भवन येथे ग्रँड फिनाले आणि पुरस्कार सोहळ्यात आपल्या उपाययोजना सादर करतील. अंतिम फेरीतील स्पर्धकांना धोरणकर्ते, उद्योग नेते, गुंतवणूकदार आणि शैक्षणिक क्षेत्रातील लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल, तसेच त्यांच्या नवकल्पनांचा राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी आवश्यक पाठबळ प्राप्त होईल.

एआय आणि त्याचा प्रभाव या विषयावर 18 फेब्रुवारीला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हैदराबादच्या सहकार्याने संशोधन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून ते या शिखर परिषदेचे मुख्य शैक्षणिक व्यासपीठ आहे. या परिसंवादासाठी आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतून सुमारे 250 शोधनिबंध प्राप्त झाले असून एस्टोनियाचे अध्यक्ष अलार करिस; केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव; केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या उपस्थितीत हा परिसंवाद होणार आहे. जागतिक स्तरावरील नामांकित एआय प्रणेते आणि आघाडीच्या संशोधन संस्थांना एआय-चालित वैज्ञानिक शोध, सुरक्षा आणि प्रशासन चौकटी, संगणकीय पायाभूत सुविधांमध्ये समान प्रवेश आणि ग्लोबल साउथमधील संशोधन सहकार्य यावर चर्चा करण्यासाठी परिसंवादात एकत्र आणले जाणार आहे.

 

इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेविषयी 

इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 जागतिक एआय अजेंडाला आकार देणारे प्रमुख व्यासपीठ म्हणून भारताची भूमिका अधिक दृढ करते.सात चक्रे आणि पिपल (लोक), प्लॅनेट (पृथ्वी) आणि प्रोग्रेस (प्रगती) या तीन सूत्रांवर आधारलेली ही शिखर परिषद कृत्रिम प्रज्ञेसाठी विकासाभिमुख चौकट तयार करण्याच्या दिशेने प्रगती करत आहे.

ही शिखर परिषद लोक, पृथ्वी आणि प्रगती या तीन मुख्य स्तंभांवर आधारित असून सात विषयगत कार्यगटांद्वारे चालविली जाते.

धोरणांना अंमलबजावणीची आणि नवोन्मेषाला सार्वजनिक उद्देशाची जोड देऊन शिखर परिषद एआयच्या जबाबदार वापरासंदर्भात रचनात्मक दृष्टिकोन स्थापित करत आहे. ती तांत्रिक प्रगतीची  समावेशक आणि शाश्वत विकासाशी सांगड घालते.

या शिखर परिषदेच्या आयोजनामुळे जागतिक एआय सहकार्यात संयोजक आणि भागीदार म्हणून भारताचे स्थान निर्माण झाले असून ते सामायिक मानके, सहयोगी ढाचे आणि सार्वजनिक हितासाठी मोठ्या प्रमाणातील उपायांसाठी सहाय्यक आहे. एआयच्या जबाबदार, समावेशक आणि विकासाभिमुख वापराचे मार्ग ठरविण्याप्रती भारताची वचनबद्धता दर्शविणारी ही परिषद  संवादाकडून अंमलबजावणीकडे वळल्याचे प्रतिक आहे.

 

* * *

निलिमा चितळे/शैलेश पाटील/मंजिरी गानू/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2228900) अभ्यागत कक्ष : 10