उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav AI Impact Summit 2026

इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या उज्ज्वल यशासाठी उपराष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 16 FEB 2026 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 फेब्रुवारी 2026

 

नवी दिल्लीत भारत मंडपम येथे सुरु होत असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेसाठी उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

समाजमाध्यमावरील संदेशात उपराष्ट्रपती म्हणतात, "कृत्रिम बुद्धिमतेचे लोकशाहीकरण आणि जनताप्रधान भवितव्य घडवण्यासाठी जगभर सुरु असलेल्या प्रयत्नांच्या अग्रस्थानी भारत विराजमान आहे. या शिखर परिषदेच्या 'सर्वजनहिताय, सर्वजनसुखाय' या मध्यवर्ती संकल्पनेत 'एआय- कृत्रिम बुद्धिमत्ता-- सर्वांच्या कल्याणासाठी आणि आनंदासाठी' हाच दृष्टिकोन सुयोग्य पद्धतीने परावर्तित झालेला दिसतो.

भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक भूमिकेवर आणि दृष्टिकोनावर जोर देत उपराष्ट्रपती म्हणतात, सर्वजनहित, उपलब्धता आणि जागतिक सहकार्य या बाबी एआयच्या उत्क्रांतीच्या केंद्रस्थानी ठेवून, भारत आणखी एक कार्य करत आहे- ग्लोबल नॉर्थ म्हणजे विकसित देशांचे तंत्रज्ञान-सामर्थ्य; ग्लोबल साऊथ म्हणजे विकसनशील देशांतील संख्याबहुलता आणि सुप्त क्षमता यांच्याशी जोडण्याचे कार्य करण्याचा भारत प्रयत्न करत आहे-- जेणेकरून जगभर सर्वसमावेशक आणि सार्वत्रिक प्रगती घडून येईल आणि प्रगतीची फळे सर्वांना चाखता येतील.

गेल्यावर्षी पॅरिसमध्ये झालेल्या एआय ऍक्शन शिखरपरिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढलेल्या उद्गारांचेही स्मरण उपराष्ट्रपतींनी केले आहे-- "बुद्धिमत्तेच्या बाबतीत यंत्रे माणसांपेक्षा वरचढ ठरतील अशी काळजी काही लोकांना वाटते आहे. परंतु, आपल्या सामूहिक भविष्याची आणि सामायिक नियतीची  गुरुकिल्ली माणसांच्या खेरीज कोणाच्याही हाती असू शकत नाही." एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता सदैव मानवकेंद्रित असली पाहिजे आणि उत्तरदायित्वाच्या भावनेने तिला दिशा मिळाली पाहिजे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

‘इंडिया एआय इम्पॅक्ट शिखरपरिषदेला उज्ज्वल यश मिळावे’, अशा शुभेच्छा उपराष्ट्रपतींनी दिल्या आहेत.

 

* * *

निलिमा चितळे/जाई वैशंपायन/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2228677) अभ्यागत कक्ष : 19