वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वैद्यकीय तंत्रज्ञान स्टार्टअप्सनी जागतिक स्तरावर पोहोचून जगाच्या जीडीपीचा 70% भाग व्यापणाऱ्या व्यापार करारांचा लाभ करून घेण्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचे आवाहन

Posted On: 12 FEB 2026 4:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 फेब्रुवारी 2026

 

देशांतर्गत बाजारपेठेच्या पलीकडचा विचार करून जगाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या सुमारे 70% भाग व्यापणाऱ्या भारताच्या व्यापार करारांचा उपयोग करून घेऊन भारतासोबतच जगाच्या सेवेसाठी परवडण्यायोग्य नावीन्यपूर्ण उपाय शोधण्यावर भर देण्याचे  आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पियुष गोयल यांनी आज वैद्यकीय तंत्रज्ञान स्टार्टअप्सना केले.

नवी दिल्ली येथे फायझर इंडोव्हेशन स्टार्टअप शोकेस कार्यक्रमाला संबोधित करताना मंत्र्यांनी परवडणाऱ्या, मोठ्या प्रमाणात वापरण्यायोग्य वैद्यकीय तंत्रज्ञानाची भारताच्या दुर्गम भागात पोहोचण्यास मदत होण्याबरोबरच आफ्रिका, लॅटिन अमेरिका, मध्य आशिया, आग्नेय आशिया आणि विकसित अर्थव्यवस्था अशा जगभरातील बाजारपेठा देखील त्याला उपलब्ध होऊ शकतील या मुद्द्यावर भर दिला.

गेल्या तीन वर्षांत झालेल्या नऊ मुक्त व्यापार करारांमध्ये चांगले दरडोई उत्पन्न असलेल्या 38 देशांचा समावेश असून बहुतांश विकसित बाजारपेठांनी आता भारतासोबत व्यापार करण्याची व्यवस्था केली असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताला आता जागतिक जीडीपीच्या 70% एवढी बाजारपेठ उपलब्ध आहे, बहुतांश बाबतीत भारतीय उत्पादनांवर शून्य शुल्क आहे, असे  ते म्हणाले.

गोयल म्हणाले की, स्टार्टअप्सनी स्वतःला स्थानिक बाजारपेठेपुरतेच मर्यादित न ठेवता आणि जागतिक व्यापार मेळ्यांमध्ये आणि प्रदर्शनांमध्ये सहभागी व्हावे. त्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळांना वाणिज्य मंत्रालयाकडून सहाय्य दिले जाईल तसेच 190 हून अधिक देशांमधील भारतीय दूतावास नवोन्मेषकांच्या मदतीसाठी उपलब्ध असतील अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. विकसित बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी 100 हून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेल्या जागतिक कंपन्यांशी सहकार्य करण्याचीही त्यांनी सूचना केली.

नवोन्मेषाद्वारे भारताच्या दैनंदिन गरजा आणि तळागाळातील गरजा पूर्ण होतील याकडे लक्ष देण्याची आवश्यकता स्पष्ट करत मंत्र्यांनी यशोगाथा सर्वांपुढे आणण्याचे महत्त्व अधोरेखित करत स्टार्टअप इंडिया, खासगी क्षेत्र आणि माध्यमांनी  नवउद्योजकांना जे सुरुवातीलाच कदाचित यशस्वी होऊ शकणार नाहीत अशांसह सर्व उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले.

निरुपयोगी अर्ज विचारात न घेता खऱ्याखुऱ्या नवोन्मेषाला पाठबळ देण्यासाठी स्टार्टअप्सना आयपी संबंधित शुल्कावर 80% सूट दिली जात असल्याचे गोयल यांनी अधोरेखित केले. समर्पित स्टार्टअप इंडिया टीमच्या पाठिंब्यासह मंत्रालयाचे दरवाजे 24x7 खुले असतील असे आश्वासनही त्यांनी दिले.

 

* * *

सुषमा काणे/मंजिरी गानू/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2227111) अभ्यागत कक्ष : 13