कायदा आणि न्याय मंत्रालय
एलएलबी पदवीची मान्यता
प्रविष्टि तिथि:
05 FEB 2026 1:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2026
भारतीय बार कौन्सिल (बीसीआय) यांनी माहिती दिली आहे की, कायदेशीर शिक्षण नियम, 1989 अंतर्गत बीसीआयने दिल्ली तसेच इतर काही राज्यांतील काही विद्यापीठे आणि विधि महाविद्यालयांद्वारे चालवण्यात येणाऱ्या संध्याकाळच्या एलएलबी अभ्यासक्रमांना त्या वेळच्या लागू मानकांच्या अधीन राहून परवानगी आणि मान्यता दिली होती. तथापि, शैक्षणिक वर्ष 2000–2001 पासून, भारतीय बार कौन्सिलने कायदेशीर शिक्षण नियम, 1999 (त्या काळात कायदेशीर शिक्षणाची मानके आणि कायदा पदवींची मान्यता नियम म्हणून ओळखले जात होते) यांच्या माध्यमातून सर्व राज्यांमध्ये संध्याकाळच्या कायदा पदवी अभ्यासक्रमांची मान्यता बंद केली.
भारतीय बार कौन्सिलने कायदेशीर शिक्षण नियम, 2008 अंतर्गतही हीच भूमिका सातत्याने कायम ठेवली आहे. या नियमांनुसार एलएलबी हा नियमित, पूर्णवेळ व्यावसायिक अभ्यासक्रम असून त्यासाठी ठराविक दैनंदिन आणि साप्ताहिक वर्गतास, किमान उपस्थिती, तसेच सकाळी 8.00 ते संध्याकाळी 7.00 या दरम्यान निश्चित अध्यापन कालावधी अनिवार्य आहे. त्यामुळे 2000–2001 पासून आजपर्यंत कोणत्याही राज्यात संध्याकाळी, रात्र शाळा, अंशकालीन, सप्ताहअखेर, सुट्टीतील, ऑनलाइन किंवा दूरस्थ (डिस्टन्स) एलएलबी अभ्यासक्रमांना कोणतीही मान्यता अस्तित्वात नाही किंवा कधीही दिलेली नाही; ही बाब भारतीय बार कौन्सिलने वैधानिक नियम आणि परिपत्रकांद्वारे पुन्हा पुन्हा स्पष्ट केली आहे.
शैक्षणिक वर्ष 1999–2000 पर्यंत संध्याकाळच्या वर्गांद्वारे एलएलबी पदवी पूर्ण केलेल्या पदवीधारकांना वकील म्हणून नोंदणी करण्याचा हक्क आहे; त्यानंतर हअसे विधी शाखेचे अर्धवेळ अभ्यासक्रम करणा-यांना पदवीचा तसेच नोंदणीचा हक्क लागू होत नाही.
ही माहिती कायदा आणि न्याय मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री तसेच संसदीय कार्य मंत्रालयाचे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना दिली आहे.
सुवर्णा बेडेकर /गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2223860)
आगंतुक पटल : 102