रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ( एनएचएआय) राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापनाची डिजिटल सुरक्षा मजबूत करण्याच्या दृष्टीने एनएफएसयू सोबत केला सामंजस्य करार

Posted On: 02 FEB 2026 9:54PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 फेब्रुवारी 2026

 

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ( एनएचएआय) प्रवर्तित भारतीय महामार्ग व्यवस्थापन कंपनी लिमिटेडने (आय एच एम सी एल) डिजिटल सुरक्षा आणि डेटा संरक्षण मजबूत करण्याच्या दृष्टीने संशोधन, प्रशिक्षण आणि सल्लागार सेवा, विशेषतः सायबर फॉरेन्सिक्स, डिजिटल पुराव्यांची अखंडता आणि राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापनाशी संबंधित प्रगत तांत्रिक अनुप्रयोगांच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी भारत सरकारची राष्ट्रीय महत्त्वाची संस्था असलेल्या आणि गांधीनगर, गुजरात येथे मुख्यालय असलेल्या नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी (एन एफ एस यू) सोबत सामंजस्य करार केला आहे.

एनएचएआयचे अध्यक्ष संतोष कुमार यादव, आयएचएमसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विशाल चौहान आणि एनएचएआय, आयएचएमसीएल व एनएफएसयूच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयएचएमसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए.आर. चित्रांशी आणि एनएफएसयू, गांधीनगरचे कॅम्पस संचालक डॉ. एस.ओ. जुनारी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

या सामंजस्य कराराचा उद्देश ज्ञाननिर्मिती, तांत्रिक लवचिकता आणि संस्थात्मक क्षमता बांधणी वाढवण्यासाठी दोन्ही सरकारी संस्थांमध्ये परस्पर हितकारक शैक्षणिक आणि संशोधन-आधारित सहकार्य सुलभ करणे हा आहे. हे सहकार्य महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग कार्यांमध्ये आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये सायबर सुरक्षा प्रणाली आणि न्यायवैद्यक विश्वासार्हता मजबूत करण्यास हातभार लावेल.

या सामंजस्य करारानुसार, एनएफएसयू आयएचएमसीएलला सीसीटीव्ही, मल्टीमीडिया विश्लेषण, ऑडिओ-व्हिडिओ विश्लेषण आणि डिजिटल तसेच सायबर फॉरेन्सिक्स प्रयोगशाळांसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज प्रयोगशाळांच्या विकासासाठी तांत्रिक मार्गदर्शन आणि सहाय्य प्रदान करेल.

याव्यतिरिक्त, विद्यापीठ सायबर आणि डिजिटल फॉरेन्सिक्स, मल्टीमीडिया विश्लेषण आणि संबंधित क्षेत्रांमध्ये विशेष प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान करून आयएचएमसीएलला सायबर लवचिकता आणि पुराव्यांची अखंडता मजबूत करण्यासाठी सहकार्य करेल.

या सामंजस्य कराराद्वारे मल्टी-लेन फ्री फ्लो (एम एल एफ एफ), प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (ए टी एम एस), स्वयंचलित नंबर प्लेट ओळख (ए एन पी आर), वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (टी एम एस) आणि वे-इन-मोशन (डब्ल्यू आय एम) यांसारख्या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. निवडक क्षेत्रांमध्ये सुरक्षित कॅमेरा-आधारित इमेजिंग प्रणाली, कूटबद्ध डेटा साठवणूक आणि पुनर्प्राप्ती, महत्त्वपूर्ण ॲप्लिकेशन्सचे सायबरसुरक्षा पुनरावलोकन, पुराव्याची अखंडता आणि न्यायवैद्यक विश्वसनीयता, इमेजिंग अचूकतेमध्ये वैज्ञानिक सुधारणा आणि सुरक्षा कार्य केंद्र (एस ओ सी) सेवा व न्यायवैद्यक प्रमाणीकरण प्रयोगशाळांची स्थापना यांचाही समावेश आहे.

याव्यतिरिक्त, दोन्ही संस्था परस्पर सहमतीच्या क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन, विकास आणि सल्लागार प्रकल्प हाती घेतील. अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी प्रत्येक संस्थेद्वारे एका समन्वयकाची नियुक्ती केली जाईल. हा सामंजस्य करार तीन वर्षांच्या कालावधीसाठी वैध राहील.

हा सामंजस्य करार म्हणजे देशभरातील वेगाने विस्तारणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधांना बळकटी देणाऱ्या सुरक्षित आणि मजबूत डिजिटल परिसंस्थांना चालना देण्याच्या एनएचएआयच्या लक्ष्याचे प्रतिबिंब आहे.

 

* * *

शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2222382) अभ्यागत कक्ष : 5