संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षणमंत्र्यांनी यंत्र इंडिया लिमिटेडला 'मिनीरत्न' श्रेणी-I दर्जा देण्यास दिली मंजुरी

Posted On: 02 FEB 2026 8:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 फेब्रुवारी 2026

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यंत्र इंडिया लिमिटेड (YIL) ला 'मिनीरत्न' श्रेणी-I दर्जा देण्यास मंजुरी  दिली आहे. अवघ्या चार वर्षांच्या कालावधीत सरकारी संस्था ते नफा कमावणारी कंपनी अशी वाटचाल करणाऱ्या  संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील या उपक्रमाचे (DPSU) त्यांनी अभिनंदन केले. कंपनीची उलाढाल वाढवण्यासाठी, जास्तीत जास्त स्वदेशीकरण करण्यासाठी आणि मिनीरत्न (श्रेणी--I) दर्जा प्राप्त करण्यासाठी इतर कामगिरी निकषांची पूर्तता करण्यासाठी यंत्र इंडिया लिमिटेडच्या व्यवस्थापनाने हाती घेतलेल्या उपक्रमांबद्दल संरक्षण मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

यंत्र इंडिया लिमिटेडने स्थापना झाल्यानंतर महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत.  2021-22 (दुसरी सहामाही) मधील  956.32  कोटी रुपयांच्या विक्रीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये उल्लेखनीय वाढ नोंदवत 3,108.79 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. निर्यातीच्या बाबतीत, 2021-22 (दुसरी सहामाही) मधील शून्यावरून ते आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 321.77 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे. यंत्र इंडिया लिमिटेडच्या प्रमुख उत्पादनांमध्ये कार्बन फायबर कंपोझिट्स, मध्यम आणि मोठ्या कॅलिबर दारूगोळ्यासाठी असेंब्ली उत्पादने, आर्मर्ड वाहनांसाठी असेंब्ली उत्पादने, तोफखाना आणि मुख्य युद्ध रणगाडे (MBTs) साठी असेंब्ली उत्पादने, ग्लास कंपोझिट्स, ऍल्युमिनिअम मिश्र धातू इत्यादींचा समावेश आहे.

मिनीरत्न (श्रेणी-I) दर्जा मिळाल्यामुळे यंत्र इंडिया लिमिटेडच्या मंडळाला सरकारी मंजुरीशिवाय नवीन प्रकल्प, आधुनिकीकरण, उपकरणे खरेदी, इत्यादींवर 500 कोटी रुपयांपर्यंत भांडवली खर्च करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. यामुळे कंपनीला वेगवान विकास आणि संरक्षण उत्पादन तसेच निर्यातीत नवीन उंची गाठण्यास अधिक मदत होईल.

संरक्षण उत्पादन क्षेत्रात कार्यात्मक स्वायत्तता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि नवोन्मेष व विकासाला चालना देण्यासाठी सरकारने 1, ऑक्टोबर 2021 रोजी पूर्वीच्या आयुध कारखाना मंडळाचे (ओएफबी) सात नवीन डीपीएसयूमध्ये  कॉर्पोरेटायझेशन केले होते. यंत्र इंडिया लिमिटेड ही संरक्षण उत्पादन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या नव्याने तयार केलेल्या अनुसूची 'अ' डीपीएसयूपैकी एक आहे. मे  2025 मध्ये, संरक्षण मंत्र्यांनी सात डीपीएसयूपैकी तीन - म्युनिशन्स इंडिया लिमिटेड, आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड आणि इंडिया ऑप्टेल लिमिटेड यांना मिनीरत्न--I दर्जा देण्यास मान्यता दिली होती.

हा निर्णय आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाप्रति  सरकारची निरंतर  वचनबद्धता अधोरेखित करतो, ज्यामध्ये संरक्षण उत्पादन, संशोधन आणि धोरणात्मक तंत्रज्ञानात स्वदेशी क्षमता निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. हे व्यापक संरक्षण सुधारणांच्या अनुरूप असून आयात अवलंबित्व कमी करणे, देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला प्रोत्साहन देणे, भारतीय उद्योगाच्या सहभागाला प्रोत्साहन देणे आणि भारताला जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून स्थान देणे हा उद्देश आहे.

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2222363) अभ्यागत कक्ष : 8