इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 : आतापर्यंत 35,000 पेक्षा जास्त नोंदणी, 500 सत्रांमध्ये 100 पेक्षा जास्त देश आणि 500 पेक्षा जास्त स्टार्टअप्सचा सहभाग
शिखर परिषदेसाठी प्रसारमाध्यम नोंदणी सुरू, 8 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख
Posted On:
02 FEB 2026 8:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी 2026
नवी दिल्ली येथे 16-20 फेब्रुवारी 2026 दरम्यान इंडिया एआय इम्पॅक्ट समिट ही कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक शिखर परिषद होणार आहे. ही शिखर परिषद आतापर्यंत आयोजित केलेल्या चार जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदांपैकी सर्वात मोठी शिखर परिषद असणार आहे. या परिषदेतून जबाबदार, सर्वसमावेशक तसेच परिणामकारक कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत्या जाणीवांचे दर्शन घडेल.
या शिखर परिषदेने जागतिक समुदायामध्ये अभूतपूर्व उत्सुकता निर्माण केली असून, या शिखर परिषदेसाठी प्रत्यक्ष आयोजनापूर्वीच 35,000 पेक्षा जास्त नोंदणी झाली आहे. या परिषदेत संकल्पना अंमलात आणून त्यातून प्रत्यक्षात परिणामकारता साधण्यावर भर दिला जाणार आहे.
या शिखर परिषदेअंतर्गत मांडलेली उद्दिष्टे प्रत्यक्षात साध्य करण्याच्या उद्देशाने सरकारे, उद्योग जगतातील आघाडीची व्यक्तिमत्वे, संशोधक, नागरी समाजिक संस्था तसेच आंतरराष्ट्रीय संस्था यात सहभागी होणार आहेत. या परिषदेत 100 पेक्षा जास्त देश सहभाग घेतील अशी अपेक्षा असून त्यात, 15 ते 20 देशांचे प्रमुख, विविध देशांचे 50 पेक्षा जास्त मंत्री आणि आघाडीच्या जागतिक तसेच भारतीय कंपन्यांचे 40 पेक्षा जास्त मुख्य कार्यकारी अधिकारीही सहभागी होतील. नवोन्मेषक, संशोधक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी असलेले जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्थेतील सुमारे 500 प्रतिष्ठित व्यक्तीही या परिषदेत सहभागी होण्याची शक्यता आहे.
या शिखर परिषदेत 500 पेक्षा जास्त कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप्सचे प्रदर्शन भरवले जाईल इतकी याची व्याप्ती मोठी असेल. तसेच मुख्य कार्यक्रमासोबतच सुमारे 500 सत्रांचे आयोजन केले जाईल, ज्यामुळे ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सर्वात व्यापक जागतिक परिषदांपैकी एक परिषद ठरणार आहे.
या शिखर परिषदे निमित्त होत असलेल्या देवाणघेवाणीचे प्रमाणही तितकेच लक्षणीय आहे. शिखर परिषदपूर्व कार्यक्रमांसाठी 1,300 पेक्षा जास्त प्रस्ताव प्राप्त झाले असून आतापर्यंत भारतातील विविध क्षेत्र आणि भागांमध्ये तसेच जागतिक स्तरावर 500 पेक्षा जास्त पूर्व शिखर परिषद कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. या शिखर परिषदेच्या आराखड्यामध्ये सात प्रमुख कार्यक्रमांचा देखील समावेश असून, त्यात एकत्रितपणे 3,00,000 पेक्षा जास्त जणांनी सहभाग नोंदवला आहे. या सर्व घडामोडींतून या शिखर परिषदेच्या आयोजन प्रक्रियेतील व्यापक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वारस्य दिसून येते.
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 या शिखर परिषदेतील कार्यक्रम, विषयानुसारची लक्ष्यित क्षेत्रे आणि सहभागाच्या पद्धतींचा अंतर्भाव असलेले तपशील, https://impact.indiaai.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जबाबदार आणि प्रभावी वापराला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित केल्या असलेल्या या जागतिक संवादाचा भाग होण्यासाठी उत्सुक असलेल्या भागधारकांनी संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करावी असे आवाहन केले जात आहे.
शिखर परिषदेसाठी प्रसारमाध्यमांची नोंदणी सुरू झाली आहे. केवळ अधिकृत माध्यम प्रतिनिधींनाच शिखर परिषदेच्या कामकाजाचे वार्तांकन करण्याची परवानगी दिली जाईल. यासाठीचे अर्ज https://impact.indiaai.gov.in/media-accreditation या अधिकृत पोर्टलद्वर ऑनलाइन दाखल करावे लागतील. प्रसारमाध्यमांसाठी नोंदणीची अखेरची तारीख 8 फेब्रुवारी 2026 आहे.
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2222359)
अभ्यागत कक्ष : 14