पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने प्रवेश आणि लाभ वाटप' प्रणालीअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेला केले 17 लाख रुपयांचे वितरण
प्रविष्टि तिथि:
29 JAN 2026 12:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जानेवारी 2026
प्रवेश आणि लाभ वाटप आराखड्यांतर्गत मिळालेल्या अधिकारांनुसार, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीला 17 लाख रुपये वितरित केले आहेत. या वितरणातून राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने, जैविक साधन संपत्तीचा शाश्वत वापर आणि त्यांच्या वापरातून मिळणाऱ्या लाभांचे न्याय्य तसेच समान वाटप करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला अधिकचे बळ दिले आहे.
मातीमधील बॅसिलस वंशाच्या सूक्ष्मजीवांच्या यशस्वी व्यावसायिक वापरामुळे हे वितरण शक्य झाले आहे. या सूक्ष्मजीवांचा वापर मूल्यवर्धित आरोग्यदायी पूरक जीवाणू उत्पादनांच्या विकासासाठी करण्यात आला आहे. ही घडामोड जैवविविधता संवर्धन आणि आधुनिक जैवतंत्रज्ञानातील प्रभावी समन्वयाचे उदाहरण ठरले आहे. लाभ वाटप करारानुसार, जैविक साधनसंपत्तीपासून मिळणाऱ्या व्यावसायिक नफ्याचा एक हिस्सा स्थानिक समुदायांना परत दिला जातो, यामुळे समुदाय स्तरावरील विकास विषयक उपक्रमांनाही पाठबळ पुरवले जाते.
जैवतंत्रज्ञान क्षेत्रात सूक्ष्मजीव हे औद्योगिक नवोन्मेषाचा एक महत्त्वपूर्ण आधार म्हणून उदयाला येऊ लागले असल्याचे राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने म्हटले आहे. जैवतंत्रज्ञान क्षेत्राने जमा झालेल्या प्रवेश आणि लाभ वाटप निधीमध्ये सुमारे 10 कोटी रुपयांचे योगदान दिले असून, यातून आरोग्य सेवा, कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातील सूक्ष्मजीव विषयक साधन संपत्तीची महत्त्वाची भूमिका अधोरेखित झाली आहे.
प्रवेश आणि लाभ वाटप निधी वितरणात महाराष्ट्र हे आंध्र प्रदेशनंतर देशातील दुसरे प्रमुख लाभार्थी राज्य ठरले आहे. लाल चंदनाच्या लाकडाशी संबंधित लाभाची रक्कम वगळता, महाराष्ट्राला या वितरणात सर्वाधिक वाटा मिळाला आहे. सध्याच्या वितरणामुळे महाराष्ट्राला मिळालेली एकूण आर्थिक मदत आता सुमारे 8 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. राज्यातील 200 पेक्षा जास्त जैवविविधता व्यवस्थापन समित्या आणि सात संस्थांना या वितरणाचा लाभ झाला आहे.
राष्ट्रीय स्तरावर प्रवेश आणि लाभ वाटप वितरणाअंतर्गतच्या एकूण रक्कमेने 144.37 कोटी रुपयांचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या यशातून जैविक विविधता कायदा 2002 ची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येते. त्यासोबतच या घडामोडींनी कुनमिंग मॉन्ट्रियल जागतिक जैवविविधता आराखड्यांतर्गत, विशेषतः या आराखड्यातील 13 व्या तसेच 19 व्या ध्येय उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या बाबतीत भारताच्या वचनबद्धतेच्या वाटचालीलाही पुढच्या दिशेने नेले आहे. ही परिणामकारकता राष्ट्रीय जैवविविधतेतील 13 व्या तसेच 19 व्या ध्येय उद्दिष्टांना अनुसरूनच आहे. याअंतर्गत जैविक साधन संपत्तीचा शाश्वत वापर, लाभांचे स्थानिक समुदायांसह न्याय्य वाटप, जैवविविधता व्यवस्थापन समित्यांचे सक्षमीकरण आणि उपजीविकांच्या सुरक्षेच्या विस्तारावर भर दिला गेला आहे.
हा प्रवेश आणि लाभ वाटप आराखडा शाश्वत विकासाच्या ध्येय उद्दिष्टांच्या पूर्तीमध्येही योगदान देणारा ठरला आहे. या सर्व यशामुळे एकात्मिक दृष्टिकोनातून जैवविविधता संवर्धन आणि सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन मिळू लागले आहे. यासोबतच जैवविविधता कराराच्या आणि या करारासंबंधी नागोया मानकाच्या जागतिक अंमलबजावणीच्या प्रक्रियेतील भारताच्या नेतृत्वाला अधिक बळकटीही मिळाली आहे.
* * *
नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2219963)
आगंतुक पटल : 19