युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
58 व्या आवृत्तीच्या निमित्ताने 'फिट इंडिया संडेज् ऑन सायकल' या उपक्रमाने गाठली यशाची नवीन शिखरे; तंदुरुस्ती, लोकशाही आणि शाश्वततेच्या सूत्रात एकत्र गुंफला गेला देश
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अटारी सीमेवर ऐतिहासिक 'फिट इंडिया संडेज् ऑन सायकल' उपक्रम संपन्न
डॉ. मनसुख मांडविया, रक्षा खडसे, ऑलिम्पिकपटू मुष्टीयुद्ध खेळाडू निखत झरीन, अभिनेते, गायक आणि खेळाडू #MyBharatMyVote साजरा करण्यासाठी आले एकत्र
'फिट इंडिया संडेज् ऑन सायकल' उपक्रमाच्या माध्यमातून कारिकलपासून अमृतसरपर्यंत, पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांसोबत 'राष्ट्रीय मतदार दिवस' साजरा
प्रविष्टि तिथि:
25 JAN 2026 4:20PM by PIB Mumbai
कराईकल, अमृतसर, दिल्ली, रुरकी, 25 जानेवारी 2026:
पुद्दुचेरीमधील कारिकल येथे 'संडेज् ऑन सायकल' च्या 58 व्या आवृत्तीला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी त्यांनी, पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवतरुण मतदारांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. राष्ट्रीय मतदार दिवसाला समर्पित असलेल्या 'फिट इंडिया संडेज् ऑन सायकल'च्या या 58 व्या आवृत्तीचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी या तरुणांसोबत सायकलिंगही केले.

'फिट इंडिया संडेज् ऑन सायकल'ची 58 वी आवृत्ती अभूतपूर्व अशा देशव्यापी स्तरावर पार पडली. या उपक्रमाचे रूपांतर आता भारतातील एका सर्वात मोठ्या लोकसंचालीत तंदुरुस्ती चळवळीत झाले आहे, हेच यातून अधोरेखित झाले. 2026 च्या प्रजासत्ताक दिन पूर्वसंध्येला पुद्दुचेरीच्या दक्षिण किनारपट्टीपासून आयआयटी रुरकीसारख्या ऐतिहासिक संस्थेपर्यंत आणि अमृतसरच्या ऐतिहासिक अटारी सीमेपासून ते देशाची राजधानी नवी दिल्लीपर्यंत या उपक्रमाचे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
डिसेंबर 2024 मध्ये 'फिट इंडिया संडेज् ऑन सायकल' या उपक्रमाचा शुभारंभ करणारे डॉ. मांडविया यांनी, मतदानाचे महत्त्व आणि लोकशाहीतील सहभागाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 'माय भारत' च्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. केवळ एका वर्षाच्या कालावधीत, या उपक्रमाने दोन लाखांहून अधिक ठिकाणांवरील 25 लाखांहून अधिक नागरिकांना एकत्र आणले आहे. विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिकांपासून ते ज्येष्ठ नागरिक, खेळाडू तसेच गणवेशधारी दलांच्या जवानांपर्यंत, हा उपक्रम वयोगट, व्यवसाय आणि भौगोलिक सीमा ओलांडत तंदुरुस्तीला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवत आहे.

यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या सोहळ्यात #MYBharatMYVote या मोहिमेअंतर्गत ‘विकसित भारताचे तरुण मतदार’ म्हणून युवकांचा गौरव करण्यात आला. ‘फिट इंडिया संडेज् ऑन सायकल'ने तंदुरुस्ती, युवा सहभाग आणि लोकशाही मूल्ये यांचा संगम घडवण्यासाठी एक देशव्यापी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

या 58 व्या आवृत्तीतील सर्वाधिक प्रेरणादायी अध्यायांपैकी एक अमृतसरमधील अटारी सीमेवर साकार झाला. प्रजासत्ताक दिनाची पूर्वसंध्या आणि राष्ट्रीय मतदार दिनी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे जवान आणि तरुण मतदारांसोबत ‘संडेज् ऑन सायकल’ हा उपक्रम साजरा करण्यात आला. अटारी–वाघा सीमेच्या सोहळेवजा परिसराच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या सकाळी, जवान, प्रथमच मतदान करणारे तरुण, खेळाडू, नामवंत व्यक्ती आणि सामान्य नागरिक अभिमानाची समान भावना बाळगत एकत्र सायकल चालवताना दिसले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आणि राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने, तंदुरुस्ती, स्वातंत्र्य आणि नागरी कर्तव्य यांचा हा अनोखा त्रिवेणी संगम स्पष्टपणे अधोरेखित झाला.

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सकाळी घडलेल्या अर्थपूर्ण उपक्रमांच्या मालिकेचे नेतृत्व केले. त्यांनी सीमा सुरक्षा दल, मुख्यालय जालंदरच्या महासंचालकांचा सत्कार केला तसेच # माझा भारत माझं मतदान - MyBharatMyVote मोहिमेअंतर्गत प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांचा गौरव केला. यानंतर मतदार शपथविधी पार पडला. देशाच्या सीमेवर तरुण मतदारांचा उत्सव साजरा करण्याने लोकशाही आणि तंदुरुस्ती या दोन्हींचा सशक्त संदेश देण्यात आला.

ऑलिम्पिकपटू आणि दोन वेळा जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धा विजेती निखत जरीन, माजी भारतीय वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल, तसेच अभिनेते विवेक दहिया, रागिणी द्विवेदी आणि गायिका आशिता दत्त यांनी या उत्सवात सहभाग घेतला. त्यांनी सहभागींसोबत संवाद साधत लोककेंद्रित चळवळीला मान्यवरांच्या वतीने पाठिंबा दिला.
तंदुरुस्त भारत `इन्फ्लुएन्सर्स`नीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीमुळे तंदुरुस्ती ही व्यवसाय किंवा प्रसिद्धीपलीकडे जाऊन सर्वांना समान पातळीवर एकत्र आणते, ही संकल्पना अधिक बळकट झाली.
सायकल फेरीला सकाळी 8:45 वाजता हिरवा झेंडा दाखवण्यात आला. अटारी सीमेवरून 800 सायकलस्वारांनी मार्गक्रमण सुरू केले. प्रेक्षक आणि सहकारी सहभागींच्या उत्साहवर्धनामुळे वातावरण भारावून गेले. याचवेळी परिसरात इतर उपक्रमही सुरू होते. `योगा कॉर्नर` येथे शांतता आणि समतोलाचा संदेश देण्यात येत होता, दोरी उड्या मारण्याच्या विभागात तरुणाईची ऊर्जा दिसून येत होती, तर संवादात्मक खेळ आणि सांस्कृतिक सादरीकरणांमुळे उत्सवी वातावरण कायम राहिले. अभिमान, मतदानाविषयी आदर आणि सामूहिक सहभागातील आनंद यांनी भारलेले हे वातावरण उत्साही असूनही भावनिक होते.
ही चळवळ शैक्षणिक क्षेत्रातही पोहोचली. आयआयटी रुडकी येथे प्रथमच परिसरामध्ये 58 वी आवृत्ती आयोजित करण्यात आली. विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकारी यांनी सायकल फेरी आणि तंदुरुस्ती उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. यामुळे रविवारी सायकलस्वारी उपक्रमाला तरुणाई आणि शैक्षणिक संस्थांमध्ये कसा प्रतिसाद मिळत आहे, हे अधोरेखित झाले.
रुडकी येथील आवृत्तीतून या उपक्रमाचा वाढता विस्तार दिसून आला. सार्वजनिक रस्ते आणि वारसा स्थळांपासून ते अग्रगण्य शैक्षणिक परिसरांपर्यंत पोहोचलेला हा उपक्रम तरुण नागरिकांना सक्रिय जीवनशैली स्वीकारण्यास आणि आपल्या `कार्बन फूटप्रिंट`बाबत सजग राहण्यास प्रोत्साहन देतो. कार्यक्रमात बोलताना आयआयटी रुडकीचे संचालक प्रा. कमल किशोर पंत म्हणाले, “आपल्या तरुण पिढीचे मन अधिक सक्षम करण्यासाठी शिक्षणामध्ये तंदुरुस्तीचा समावेश करणे अत्यावश्यक आहे.”
तंदुरुस्त भारत रविवारी सायकल स्वारी उपक्रमाची 58 वी आवृत्ती आयआयटी रुडकी येथेही पार पडली. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी सायकलिंगमध्ये सहभाग घेतला. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांनाही या उपक्रमात विशेष स्थान देण्यात आले.
***
शैलेश पाटील/आशुतोष सावे/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2218637)
आगंतुक पटल : 7