नवी दिल्ली – दि. 24, जानेवारी, 26
एसएचआय म्हणजेच राज्य हज निरीक्षकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आज मुंबईतील हज हाऊस येथे सुरू झाला. 24 आणि 25 जानेवारी रोजी आयोजित या प्रशिक्षण सत्राचा उद्देश सौदी अरेबियामध्ये (केएसए) आगामी हज हंगामादरम्यान राज्य हज निरीक्षकांना त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सर्वसमावेशकपणे तयार करणे हा आहे.

हा कार्यक्रम भारतीय हज यात्रेकरूंना सुरळीत सुविधा आणि प्रभावी सहाय्य सुनिश्चित करण्यासाठी राज्य हज निरीक्षकांना कार्यान्वयन कार्यप्रणाली, समन्वय यंत्रणा, कल्याणकारी उपाययोजना आणि प्रत्यक्ष जमिनीवरील आव्हानांशी परिचित करण्यावर लक्ष केंद्रित करतो.

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला मार्गदर्शन करताना, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार यांनी यात्रेकरूंना सुरक्षित, सुरळीत आणि सन्मानजनक हज अनुभव मिळवून देण्यात राज्य हज निरीक्षकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. त्यांनी राज्य हज निरीक्षकांना सौदी अरेबियामध्ये वास्तव्यादरम्यान हाजींना मदत करताना उच्च पातळीचा संयम राखण्याचे, तसेच सर्वकाळ सतर्क राहण्याचे आणि नैसर्गिक, सहानुभूतीपूर्ण आणि सेवाभावी वृत्तीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. सचिवांनी अधोरेखित केले की, राज्य हज निरीक्षकांचे वर्तन आणि प्रतिसाद यांचा यात्रेकरूंच्या एकूण अनुभवावर आणि कल्याणावर थेट परिणाम होतो.
या प्रशिक्षण सत्राला ‘हज कमिटी ऑफ इंडिया’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी सहानवास सी. यांनीही मार्गदर्शन केले, त्यांनी हज दरम्यान विविध भागधारकांसोबतच्या कार्यान्वयन बाबी आणि समन्वयावर प्रकाश टाकला. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे संचालक (हज) नझीम अहमद यांनी सहभागींना प्रशासकीय कार्यपद्धती, प्रमाणित कार्यप्रणाली आणि वेळेवर तक्रार निवारणाचे महत्त्व याबद्दल माहिती दिली.

हज दरम्यान आरोग्य आणि सुरक्षिततेच्या पैलूंवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे उपमहासंचालक डॉ. एल. स्वस्तिचरण यांनी माहिती दिली. त्यांनी राज्य हज निरीक्षकांना सार्वजनिक आरोग्य सज्जता, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि यात्रेकरूंच्या आरोग्य-संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी वैद्यकीय पथकांसोबतच्या समन्वयाबद्दल संवेदनशील असावे, याबाबत सांगितले.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये यात्रेकरू सुविधा, निवास आणि वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉल, आपत्कालीन प्रतिसाद, सौदी अधिकाऱ्यांशी समन्वय आणि प्रभावी देखरेख तसेच तक्रार निवारणासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर यावर तपशीलवार सत्रांचा समावेश आहे.
दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता उद्या, 25 जानेवारी रोजी, संवादात्मक सत्रे आणि चर्चांनी होईल. यामागे उद्देश आगामी हज हंगामासाठी राज्य हज निरीक्षकांची तयारी अधिक मजबूत करणे आहे.
***
शैलेश पाटील/ सुवर्णा बेडेकर/परशुराम कोर