: मुंबई, 24 जानेवारी, 26
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा स्वायत्त विभाग असलेल्या ‘ माय भारत’च्यावतीने उद्या- 25 जानेवारी,26 रोजी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजधानींची शहरे आणि जिल्हा मुख्यालयांमध्ये 'माय भारत, माझे मत' या घोषवाक्याखाली लोकशाही प्रक्रियेत तरुणांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय मतदार दिन पदयात्रा तसेच ‘संडेज ऑन सायकल –2026’ उपक्रमाचे आयोजन केले आहे.
हा कार्यक्रम एक देशव्यापी युवा संघटन उपक्रम आहे. याचा उद्देश विशेषतः पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांवर लक्ष केंद्रित करून, त्यांच्यापर्यंत मतदानाची महत्वाची माहिती पोहोचविणे , नैतिकतेने निवडणूक सहभागाला प्रोत्साहन देणे आहे. मतदार जागृतीला शारीरिक तंदुरुस्ती आणि सामुदायिक सहभागाशी जोडून, हा उपक्रम राष्ट्रीय मतदार दिनी तरुणांच्या नेतृत्वाखाली एका उत्साही जनआंदोलनात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करणार आहे.
या कार्यक्रमाच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक म्हणजे तरुण नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देणे, मतदार नोंदणी आणि निवडणूक तपशिलांमध्ये दुरुस्ती करण्यास प्रोत्साहन देणे आणि तळागाळातील लोकशाही मूल्यांना बळकटी देणे. पदयात्रा तसेच ‘संडेज ऑन सायकल’ या सामूहिक नागरी कृतीद्वारे मतदार जागृतीचे संदेश पसरवण्यासाठी एक दृश्यमान आणि सहभागी व्यासपीठ म्हणून काम केले जाणार आहे.
सार्वजनिक जागरूकता आणि तरुणांच्या सक्रीय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी, राज्यस्तरीय पदयात्रा कार्यक्रम 25 जानेवारी, 26 रोजी मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रुझमधील (पूर्व) कलिना परिसरामध्ये आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते डॉ. सुभाष दळवी, जिल्हा युवा पुरस्कार विजेत्या ॲड. अश्विनी बोरुडे, आणि मेरा युवा भारत, मुंबईचे जिल्हा युवा अधिकारी अनुप इंगोले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाईल. या कार्यक्रमात तरुण आणि स्वयंसेवकांचा उत्साही सहभाग अपेक्षित आहे. यामुळे त्यांच्यामध्ये नागरी, सामाजिक जबाबदारी आणि सामुदायिक सहभागाची भावना अधिक दृढ होईल.
या कार्यक्रमात सुमारे एक हजार माय भारत स्वयंसेवक आणि पहिल्यांदा मतदान करणारे मतदार सक्रिय सहभागी होतील. यामध्ये पदयात्रा तसेच सायकलिंग कार्यक्रम, पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांचा सत्कार, मतदार जागृती संवाद, शपथग्रहण समारंभ आणि सार्वजनिक संपर्क उपक्रमांचा समावेश असेल.
अशा प्रकारच्या लोकशाही प्रक्रियांमध्ये तरुणांचा सहभाग असणे, म्हणजे राष्ट्र उभारणीचा एक महत्त्वाचा घटक सहभागी होणे आहे. तरुण नागरिकांमध्ये जागरूकता, आणि निवडणूक प्रक्रियेसंबंधी जबाबदारीची भावना निर्माण करून सक्षम केल्याने लोकशाहीचा पाया मजबूत होण्यास मदत मिळेल. या उपक्रमाद्वारे, तरुणांना लोकशाही मूल्यांचे आणि जबाबदार नागरिकत्वाचे दूत म्हणून पुढे येण्यास प्रोत्साहित केले जात आहे. ‘माय भारत’ने सर्व तरुण नागरिकांना राष्ट्रीय मतदार दिन पदयात्रा / ‘संडे ऑन सायकल – 2026 मध्ये सक्रिय सहभागी होण्याचे आणि भारताची लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे आवाहन केले आहे.
***
शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2218334)
आगंतुक पटल : 15