पंचायती राज मंत्रालय 25 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलन 2026 साठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलेल्या निवडून आलेल्या पंचायत प्रतिनिधींचा सन्मान करण्यासाठी सत्कार समारंभ आयोजित करणार आहे. या सन्मानार्थींना पंचायती राज राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांच्या हस्ते, पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गौरवण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात मंत्रालयाच्या विविध महत्त्वाच्या उपक्रमांचे आणि प्रकाशनांचे अनावरण व उद्घाटनही करण्यात येणार आहे. यामध्ये युनिसेफच्या सहकार्याने विकसित केलेला ‘पंचम’ - पंचायत सहाय्य आणि संदेशवहन चॅटबॉट, ‘ग्रामोदय संकल्प’ मासिकाचा 17 वा अंक, ‘पंचायती राज संस्थांवरील मूलभूत सांख्यिकी माहिती -2025’ हा संग्रह, ‘पंचायत स्तरावरील सेवा वितरण’ या विषयावरील तज्ज्ञ समितीचा अहवाल तसेच ‘पेसा’ कामगिरी आणि अंमलबजावणी क्रमवारी निर्देशांक यांचा समावेश आहे. यासोबतच संविधान दिन -2025 च्या निमित्ताने आयोजित ‘आपली राज्यघटना ओळखा’ या प्रश्नमंजुषा आणि निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
सन्मानार्थींमध्ये सरपंच, मुखिया, ग्रामप्रधान तसेच तालुका आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा समावेश आहे.ज्या पंचायतींनी केंद्र सरकारच्या प्रमुख योजनांमध्ये शंभर टक्के यश मिळवले आहे,अशा सर्व पंचायतींचा यात समावेश आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून नामनिर्देशित करण्यात आलेले सुमारे 240 पंचायत प्रमुख त्यांच्या तळागाळातील योगदानासाठी आणि ‘विकसित भारत’ या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी केलेल्या कार्यासाठी गौरवण्यात येत आहेत.
प्रजासत्ताक दिन संचलनासाठी मंत्रालय पंचायत राज संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था प्रमुखांना त्यांच्या जोडीदारांसह आमंत्रित करत असून, एकूण सुमारे 450 विशेष अतिथी उपस्थित राहणार आहेत. हे विशेष आमंत्रित 25 जानेवारी 2026 रोजी पंतप्रधान संग्रहालयाला भेट देऊन स्वातंत्र्यानंतरचे भारताचे नेतृत्व आणि प्रशासन प्रवासाचा अनुभव घेणार आहेत. तसेच संचलनादरम्यान मंत्रालयाच्या “स्वामित्व योजना: आत्मनिर्भर पंचायत से समृद्ध एवं आत्मनिर्भर भारत” या विषयावरील चित्ररथाचे दर्शन घेणार आहेत.
***
शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2218322)
आगंतुक पटल : 10