पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

केरळमधील तिरुवनंतपुरम येथे विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

प्रविष्टि तिथि: 23 JAN 2026 12:43PM by PIB Mumbai

 

केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर जी, मुख्यमंत्री पिनाराई विजयन जी, विविध ठिकाणांहून सहभागी झालेले केंद्रीय मंत्रिमंडळातील  माझे सहकारी, तिरुवनंतपुरमचा अभिमान आणि नवनिर्वाचित महापौर, माझे अतिशय जुने सहकारी व्ही.व्ही. राजेशजी, इतर मान्यवर, महिला आणि पुरुषगण  !  नमस्कारम्!

आज, केरळच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांना नवी गती मिळाली आहे. आजपासून केरळमध्ये रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत झाली आहे आणि तिरुवनंतपुरमला देशातील एक प्रमुख स्टार्ट-अप हब बनवण्यासाठी उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. आज, केरळमधून संपूर्ण देशासाठी गरिबांच्या कल्याणाशी संबंधित एक मोठी सुरुवात देखील होत आहे. आज पंतप्रधान स्वनिधी क्रेडिट कार्ड सुरु  करण्यात आले आहे. याचा फायदा देशभरातील रस्त्यावरील विक्रेते आणि पदपथावर काम करणाऱ्यांना होईल. या सर्व विकास आणि रोजगार निर्मितीच्या  योजनांसाठी मी केरळच्या जनतेचे आणि देशवासीयांचे खूप खूप अभिनंदन करतो.

एंडे सुहुर्तगळे,

विकसित भारताच्या उभारणीसाठी आज  संपूर्ण देश एकजूट होऊन प्रयत्न  करत  आहे. विकसित भारताच्या उभारणीत आपल्या शहरांची खूप मोठी भूमिका आहे. गेल्या 11 वर्षांपासून, केंद्र सरकार शहरी पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे.

सुहुर्तगळे,

केंद्र सरकार शहरातील गरीब कुटुंबांसाठी देखील बरेच काम करत आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत, देशभरात 4  कोटींहून अधिक घरे बांधून गरीबांना देण्यात आली आहेत.  यात शहरी गरिबांसाठी एक कोटींहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. केरळमधील सुमारे सव्वा लाख शहरी गरिबांना त्यांची कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत.

सुहुर्तगळे,

गरीब कुटुंबांचे वीजेचे बिल वाचवण्यासाठी, पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरिबांना  5 लाखांचे मोफत आरोग्य उपचार मिळत आहेत. महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी मातृ वंदना योजनेसारख्या योजना तयार करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. याचा खूप मोठा फायदा  केरळमधील लोकांनाही झाला आहे, विशेषतः मध्यमवर्गीय आणि पगारदार वर्गाला झाला आहे.

एंडे सुहुर्तगळे,

मागील 11 वर्षांमध्ये कोट्यवधी नागरिकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याचे  महत्त्वपूर्ण काम करण्यात आले आहे. आता, गरीब, अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी, महिला आणि मच्छीमार या सर्वांना सहजपणे बँकेकडून कर्ज मिळू लागले आहे.  ज्यांच्याकडे कुठलेही तारण नाही त्यांच्यासाठी सरकार स्वतः हमी देत आहे.

एंडे सुहुर्तगळे,

रस्त्याच्या कडेला आणि गल्लीबोळात जे वस्तू विकतात , त्या फेरीवाल्यांची परिस्थिती पूर्वी खूप वाईट होती. सामान  खरेदी करण्यासाठी काहीशे रुपये देखील त्यांना चढ्या  व्याजदरावर  घ्यावे लागत होते. केंद्र सरकारने  पहिल्यांदाच त्यांच्यासाठी पंतप्रधान स्वनिधी योजना तयार केली. या योजनेनंतर  देशभरातील लाखो लोकांना बँकांकडून मोठी मदत मिळाली आहे.  रस्त्यावरील लाखो विक्रेत्यांना आयुष्यात पहिल्यांदाच बँकांकडून एखादे कर्ज मिळाले आहे.

एंडे सुहुर्तगळे,

आता भारत सरकार एक पाऊल पुढे टाकत, या मित्रांना  क्रेडिट कार्ड प्रदान करत आहे. थोड्या वेळापूर्वीच, येथे पंतप्रधान स्वनिधी क्रेडिट कार्ड  वितरित करण्यात आली. यात केरळमधील दहा हजारांहून अधिक आणि तिरुवनंतपुरममधील   600  हून अधिक लोकांचा समावेश आहे. पूर्वी फक्त श्रीमंत लोकांकडेच क्रेडिट कार्ड असायची . मात्र आता रस्त्यावरील विक्रेत्यांकडेही स्वनिधी क्रेडिट कार्ड आहेत.

एंडे सुहुर्तगळे,

केंद्र सरकार कनेक्टिविटी,  विज्ञान, नवोन्मेष आणि आरोग्यसेवेमध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. केरळमध्ये सीएसआयआर इनोव्हेशन हबचे लोकार्पण , वैद्यकीय महाविद्यालयात रेडिओ सर्जरी सेंटरचे उद्घाटन यामुळे केरळला  विज्ञान, नवोन्मेष आणि आरोग्यसेवेचे केंद्र बनवण्यास मदत होईल.

एंडे सुहुर्तगळे,

आज, केरळची देशाच्या इतर भागांशी रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत झाली आहे. थोड्या वेळापूर्वी ज्या  अमृत भारत एक्सप्रेस गाडयांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला, त्यामुळे  केरळमधील प्रवास सुलभतेला बळकटी मिळेल आणि पर्यटन क्षेत्रालाही त्याचा मोठा फायदा होईल.

गुरुवायूर आणि त्रिशूर दरम्यान नवीन प्रवासी रेल्वेमुळे यात्रेकरूंचा प्रवास आणखी सोपा होईल. या सर्व प्रकल्पांमुळे केरळच्या विकासालाही गती मिळेल.

मित्रहो,

विकसित केरळमुळेच विकसित भारताचे स्वप्न साकार होईल. या प्रयत्नात केंद्र सरकार आपल्या सर्व शक्तीनिशी केरळच्या जनतेसोबत उभे आहे. पुन्हा एकदा, मी तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो. आता,  याच्या अगदी शेजारी केरळमधील हजारो लोक, उत्साही, आत्मविश्वासाने भरलेले लोक, माझ्या भाषणाची वाट पाहत आहेत, आणि तिथेही मला खूप मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळेल, विस्तृतपणे बोलण्याची संधी मिळेल, आणि माध्यमांनाही यात जास्त रस नसेल, त्यात जास्त रस असेल. तर, आज या कार्यक्रमात, मी माझे भाषण इथेच थांबवतो आणि मग पाच मिनिटांनी, मी इथेच बाजूला पुढच्या कार्यक्रमात जाईन आणि केरळच्या भविष्याशी संबंधित अनेक गोष्टी मी तिथे नक्की सांगेन.

खूप-खूप  धन्यवाद!

***

अंबादास यादव/सुषमा काणे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2218013) आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Telugu , Kannada , Malayalam