संरक्षण मंत्रालय
ऑपरेशन सिंदूर ही जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणाला अनुरूप संतुलित प्रतिक्रिया ; भारताचे साहस, शक्ती, नियंत्रण आणि राष्ट्रीय चारित्र्याचे ते प्रतीक - लष्कर दिनानिमित्त संरक्षणमंत्र्यांचे प्रतिपादन
वर्ष 2047 पर्यंत जगातील सर्वात शक्तीशाली लष्कर बनण्याकडे भारतीय लष्कराची घोडदौड सुरु
प्रविष्टि तिथि:
15 JAN 2026 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जानेवारी 2026
जगातील अनिश्चिततेच्या वातावरणात एक संतुलित लष्करी प्रतिक्रिया म्हणून ऑपरेशन सिंदूर चे महत्व आहे; भारताचे साहस, शक्ती, नियंत्रण आणि राष्ट्रीय चारित्र्याचे प्रतीक म्हणून इतिहासात त्याची नोंद होईल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ते 15 जानेवारी 2026 रोजी राजस्थानातील जयपूर इथे आयोजित 78व्या लष्कर दिनाच्या समारंभात बोलत होते. दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या या हल्ल्यात काळजीपूर्वक अनुमान काढून आणि मानवतेच्या मूल्यांना अनुसरून कृती केली गेली असे सांगताना त्यांनी सैनिकांच्या अतुल्य साहस, अविचल निष्ठा तसेच रणांगणातील बदलत्या परिस्थितीप्रमाणे निर्णय घेण्याच्या क्षमतेची प्रशंसा केली.

या ऑपरेशन दरम्यान स्वदेशी शस्त्रास्त्रांचा केलेला उपयोग दर्शवतो, आत्मनिर्भरता म्हणजे केवळ अभिमानाची बाब नसून येत्या काळात ती एक आवश्यकता असेल असे त्यांनी म्हटले. आत्मनिर्भरतेच्या मार्गावर देशाची वाटचाल सुरु असून त्यात सैन्यदले आघाडीवर आहेत आणि महत्वाचे योगदान देत आहेत असे ते म्हणाले. आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टासाठी येणाऱ्या काळात अधिक वेगाने प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. युद्धनीतीच्या सर्व पैलूंच्या वाढत्या वापरात तिन्ही सैन्यदलाच्या परस्पर सहकार्य आणि समन्वयाला महत्व येणार आहे हे त्यांनी अधोरेखित केले.

आत्मनिर्भरतेच्या दिशेने केलेले अथक प्रयत्न फळाला येत आहेत, असे संरक्षणमंत्री यावेळी म्हणाले. 2014 मध्ये केवळ 46,000 कोटी रुपये असलेले देशांतर्गत संरक्षण उत्पादन आज विक्रमी 1.51 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, असे त्यांनी सांगितले. 2014 मध्ये 1,000 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेली संरक्षण निर्यात आता सुमारे 24,000 कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचली आहे, असेही त्यांनी सांगितले.

सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या वाढत्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले: “पूर्वी, महिलांची सशस्त्र दलांमध्ये केवळ सहाय्यक पदांसाठी भरती केली जात असे, परंतु पंतप्रधान मोदी यांनी महिलांची भूमिका विस्तारण्याची दूरदृष्टी मांडली. आता, सैन्यात महिलांना कायमस्वरूपी कमिशन दिले जात आहे, तर राष्ट्रीय संरक्षण अकादमीनेही महिलांसाठी आपले दरवाजे मुक्त केले आहेत. सशस्त्र दलांमध्ये महिलांना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीने समान संधी सतत उपलब्ध करून देणे, हा आमचा प्रयत्न आहे,” असेही त्यांनी सांगितले.

संरक्षणमंत्र्यांनी तरुणांना सशस्त्र दलात सामील होऊन राष्ट्र उभारणीत योगदान देण्याचे आवाहन केले. “सैन्यात सामील होण्यासाठी केवळ शारीरिक शक्ती पुरेशी नाही. मानसिक क्षमता, नैतिक धैर्य, निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुण यांसारख्या गुणांचीही आवश्यकता असते. तरुणांनी हे गुण विकसित केले पाहिजेत,” हे त्यांनी अधोरेखित केले.

या कार्यक्रमाची सांगता 'ऑपरेशन सिंदूर'च्या शानदार सादरीकरणाने झाली. समन्वित प्रकाश आणि ध्वनी प्रभाव यासह सादर करण्यात आलेल्या या दृश्यात्मक कार्यक्रमानंतर सादर झालेल्या प्रभावी ड्रोन शोने उपस्थित प्रेक्षकांना प्रेरित आणि मंत्रमुग्ध केले.

सुवर्णा बेडेकर/उमा रायकर/श्रद्धा मुखेडकर /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2215120)
आगंतुक पटल : 7