दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

यूपीयू आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी तरुण प्रतिभावंतांना भारतीय टपाल विभागाने केले आमंत्रित

प्रविष्टि तिथि: 15 JAN 2026 9:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जानेवारी 2026

युनिव्हर्सल पोस्टल युनियन (यूपीयू) च्या वार्षिक जागतिक उपक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय टपाल विभाग शालेय विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, चिकित्सक विचार आणि पत्रलेखनाची कला यांना प्रोत्साहन देण्यासाठी यूपीयू आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करणार आहे.

2026 साठीची संकल्पना आहे: “डिजिटल जगात मानवी संबंध का महत्त्वाचे आहेत, याबद्दल तुमच्या मित्राला पत्र लिहा.”

ही स्पर्धा संपूर्ण भारतात सर्व टपाल मंडळांमार्फत, शाळा आणि शैक्षणिक संस्थांच्या समन्वयाने आयोजित केली जाणार आहे. भारतीय टपाल विभाग सहभागाला प्रोत्साहन देईल, प्रवेशिका स्वीकारेल, मंडळ आणि राष्ट्रीय स्तरावर प्रवेशिकांचे मूल्यांकन करेल आणि सामान्यतः जागतिक टपाल दिनी (9 ऑक्टोबर) पारितोषिके प्रदान करेल. सर्वोत्तम राष्ट्रीय प्रवेशिका आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करेल. विजेत्या प्रवेशिकांना यूपीयू कडून सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके, प्रमाणपत्रे आणि इतर बक्षिसे प्रदान केली जातील. सुवर्णपदक विजेत्याला स्वित्झर्लंडमधील बर्न येथील यूपीयू मुख्यालयाला भेट देण्याची संधी किंवा पर्यायी बक्षीस देखील मिळू शकते.  

पात्रता आणि मार्गदर्शक तत्त्वे

• वयोगट: 9 ते 15 वर्षे

• स्वरूप: हस्तलिखित पत्र

• भाषा: इंग्रजी किंवा भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध कोणतीही भाषा

• सहभागी: मान्यताप्राप्त शाळा/संस्थांचे विद्यार्थी

शाळांना विनंती आहे की त्यांनी अंतर्गत स्तरावर स्पर्धेचे आयोजन करावे आणि निवडलेल्या प्रवेशिका 20 मार्च 2026 पर्यंत त्यांच्या संबंधित टपाल मंडळाकडे पाठवाव्यात. मंडळे प्रवेशिकांचे मूल्यांकन करतील आणि सर्वोत्तम तीन प्रवेशिका 31 मार्च 2026 पर्यंत संचालनालयाकडे पाठवतील.

पारितोषिके

मंडळ स्तर:

• पहिले बक्षीस: 25,000 रुपये रोख आणि प्रमाणपत्र

• दुसरे बक्षीस: 10,000 रुपये रोख आणि प्रमाणपत्र

• तिसरे बक्षीस: 5,000 रुपये रोख आणि प्रमाणपत्र

राष्ट्रीय स्तर:

• पहिले बक्षीस: 50,000 रुपये रोख आणि प्रमाणपत्र

• दुसरे बक्षीस: 25,000 रुपये रोख आणि प्रमाणपत्र

• तिसरे बक्षीस: 10,000 रुपये रोख आणि प्रमाणपत्र

आवश्यक प्रवेशिका तपशील

प्रत्येक प्रवेशिकेच्या पहिल्या पानावर, इंग्रजी आणि हिंदीमध्ये खालील माहिती असणे अनिवार्य आहे:

1. उमेदवाराचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

2. उमेदवाराचे नाव

3. जन्मतारीख

4. लिंग

5. वडील/पालकांचे नाव

6. शाळा/संस्थेचे नाव आणि संपूर्ण पत्ता

7. संपूर्ण टपाल पत्ता

विद्यार्थी, पालक आणि शाळा अधिक तपशीलांसाठी त्यांच्या मुख्य पोस्टमास्तर जनरल/पोस्टमास्तर जनरल/संचालक टपाल सेवा/नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. अधिक माहिती टपाल विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे: www.indiapost.gov.in


शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर /प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2215112) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Telugu