युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
निरोगी शरीर हा भक्कम नेतृत्त्वाचा पाया आहे: नवी दिल्ली येथे झालेल्या 56 व्या फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमात डॉ मनसुख मांडवीय
प्रविष्टि तिथि:
11 JAN 2026 4:31PM by PIB Mumbai
फिट इंडियाची प्रमुख सामूहिक फिटनेस चळवळ, 'संडेज ऑन सायकल', पुन्हा एकदा रविवारी राष्ट्रीय राजधानीत उत्साहात पार पडली. सकाळी 7 वाजता 6 अंश सेल्सिअस इतक्या कडाक्याच्या थंडीतही, 500 तरुण नेत्यांसह 1000 हून अधिक लोक या फिटनेस महोत्सवात आणि त्यानंतर आयोजित सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी या सायकल रॅलीचे नेतृत्व केले, यामध्ये टेनिसपटू लिअँडर पेस आणि बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्यासह उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू शिवानी पवार सहभागी झाले होते.

सार्वजनिक सेवेचा एक भाग बनण्यासाठी उत्सुक असलेल्या युवकांना ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक राष्ट्रीय व्यासपीठ असलेल्या विकसित भारत युवा नेतृत्त्व संवाद, 2026 या चार दिवसीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपूर्ण देशभरातून नवी दिल्ली येथे आलेले युवा नेते, फिट इंडिया संडेज ऑन सायकल चळवळीच्या 56 व्या भागात विशेष निमंत्रित म्हणून सहभाग घेत या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमात डॉ मांडवीया म्हणाले."निरोगी शरीर हा भक्कम नेतृत्त्वाचा पाया आहे. सायकलिंग आपल्याला नेतृत्वाची मौल्यवान शिकवण देते—ते आपल्याला कधी वेगाने पॅडल मारायचे, कधी वेग कमी करायचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जीवनात पुढे जाण्यासाठी संतुलन कसे राखायचे हे शिकवते."

संडेज ऑन सायकल या मोहिमेची सुरुवात करण्यामागील केंद्रीय मंत्र्यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करत गोपीचंद म्हणाले,"दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी इतका सखोल विचार करणारे मंत्री पाहणे खरोखरच प्रेरणादायी आहे. इतकेच नव्हे तर संपूर्ण चळवळीचे नेतृत्व ते स्वतः आघाडीवर उभे राहून करत आहेत, हे अधिकच प्रेरक आहे. आपल्या आठवडाभराच्या परिश्रमानंतर देखील ते स्वतः रविवारी सकाळी या मोहिमेत सहभागी होतात यातूनच फिट इंडियाप्रति त्यांची बांधिलकी दिसून येते."

सामुदायिक फिटनेस अभियान चालवण्याच्या महत्त्वाविषयी बोलताना लिअँडर पेस म्हणाले,"कोणीच एकट्याने फिटनेस साध्य करु शकत नाही, त्यासाठी तुम्हाला एकमेकांना प्रेरित करावे लागते आणि समुदायाचा एक भाग असायला लागते कारण फिटनेस हा केवळ एक सुदृढ शरीर असण्यापुरता मर्यादित नाही तर एक निरोगी मन असणे ही तितकेच महत्त्वाचे आहे आणि जेव्हा आपण अशा सामुदायिक उपक्रमांमध्ये भाग घेतो, तेव्हा ते सहज साध्य होऊ शकते."

***
सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2213456)
आगंतुक पटल : 17