संरक्षण मंत्रालय
विकसित भारताच्या प्रवासात युवक हे मुख्य चालक आहेत: संरक्षण मंत्री
प्रविष्टि तिथि:
10 JAN 2026 8:11PM by PIB Mumbai
“विकसित भारताच्या दिशेने देशाच्या प्रवासात युवक हे मुख्य चालक आहेत,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. 10, जानेवारी 2026 रोजी दिल्ली कॅन्ट येथे झालेल्या एका कार्यक्रमात उत्तर प्रदेशातील 78 युवा प्रतिभावंतांशी संवाद साधताना ते बोलत होते. 10 ते 12 जानेवारी 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आयोजित केलेल्या विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026 मध्ये सहभागी होणाऱ्या युवकांमध्ये उत्तर प्रदेशची तुकडी देखील आहे. विविध क्षेत्रातील कामगिरीबद्दल युवा नेत्यांचे कौतुक करताना, संरक्षण मंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला की त्यांची ऊर्जा, आकांक्षा आणि नाविन्यपूर्ण क्षमता देशाला विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी मार्गदर्शन करत आहे.
राजनाथ सिंह यांनी युवकांना विविध विषयांमधील शिक्षण आत्मसात करण्याचे आवाहन केले, जेणेकरून तंत्रज्ञान क्षेत्रातील जलद प्रगती, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कम्प्युटिंग, जैवतंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधन यासारख्या क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीशी ते जुळवून घेऊ शकतील. "शिकण्याची प्रक्रिया कधीही संपत नाही. नवनवीन पद्धतींमधून, स्वतःच्या चुकांमधून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतरांच्या अनुभवांमधून तुम्ही शिकले पाहिजे. मोठी स्वप्ने पहा, पण त्यांना कधीही ओझे बनू देऊ नका," असे ते म्हणाले.
आव्हाने ही जीवनाचा अपवाद नसून त्याचा नैसर्गिक भाग आहेत असे नमूद करत, परीक्षेचा काळ एखाद्या व्यक्तीचे खरे अंतर्मन आणि चारित्र्य उलगडून दाखवतो, यावर संरक्षणमंत्र्यांनी भर दिला. "जेव्हा गोष्टी नियोजनानुसार घडत असतात तेव्हा शांत राहणे सोपे असते. परंतु टीका आणि अपयश हे एखाद्या व्यक्तीच्या धैर्याची परीक्षा घेतात, अंतिमतः भविष्याची दिशा ठरवतात. मात्र भीती न वाटणे म्हणजे समस्यांकडे बेफिकिरीपणे पाहणे असे नाही; याचा अर्थ आपण त्यांना धैर्याने, चातुर्याने आणि आत्मविश्वासाने सामोरे जायला हवे," असे ते म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी युवकांना आव्हानाकडे ओझे म्हणून न पाहता, संधी म्हणून पाहण्याचे आवाहन केले, जे व्यक्तिमत्त्व बळकट करताना एखाद्याच्या क्षमता ओळखते आणि त्यात वृद्धी करते. "सोपे मार्ग अनेकदा आपल्याला कमकुवत बनवतात, तर कठीण मार्ग आपल्याला मजबूत, लवचिक आणि सक्षम बनवतात. तक्रार केल्याने समस्या सुटत नाही, तर उपाय शोधल्यामुळेच ती सुटते. आत्मविश्वास ही गुरुकिल्ली आहे, जो अहंकाराने मिळत नाही, तर कठोर परिश्रम आणि सचोटीतून मिळतो. एखाद्याने नेहमीच नम्र राहिले पाहिजे कारण तुमचे यश केवळ तुमचेच नसते तर कुटुंब, शिक्षक आणि मित्रांचे देखील त्यात योगदान असते. नम्रता तुमचे पाय जमिनीवर ठेवते," असे त्यांनी यावेळी उपस्थित युवकांना सांगितले.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, सचिव (संरक्षण उत्पादन) संजीव कुमार, सचिव (माजी सैनिक कल्याण) सुकृती लिखी आणि इतर वरिष्ठ अधिकारी या संवादादरम्यान उपस्थित होते.
***
माधुरी पांगे\सुषमा काणे\परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2213345)
आगंतुक पटल : 20