PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

सोमनाथ स्वाभिमान पर्व


हजारो वर्षांची अखंड श्रद्धा आणि सभ्यतागत अस्मितेचा अभिमान

प्रविष्टि तिथि: 10 JAN 2026 9:42AM by PIB Mumbai

 

  • सोमनाथ स्वाभिमान पर्व (8-11 जानेवारी, 2026) हे 1026 साली महमूद गझनवीने सोमनाथ मंदिरावर केलेल्या पहिल्या हल्ल्याच्या 1000 वर्षांच्या पूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आले आहे.
  • हा पर्व भारताच्या संस्कृतीचा चिरस्थायी आत्मा आणि समृद्ध सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा साजरा करतो.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी 10-11 जानेवारी, 2026 रोजी या  महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी सोमनाथला भेट देणार आहेत.
  • सोमनाथ मंदिराला दरवर्षी 92 ते 97 लाख भाविक भेट देतात.
  • सोमनाथमध्ये महिला महत्त्वाची भूमिका बजावतात. सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या 906 कर्मचाऱ्यांपैकी 262 महिला आहेत; एकूण सुमारे 363 महिलांना मंदिरामुळे रोजगार मिळतो, ज्यातून वार्षिक सुमारे 9 कोटी रुपयांची कमाई होते.
प्रस्तावना
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् ।
उज्जयिन्यां महाकालम्ॐकारममलेश्वरम्”
द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्राच्या या पहिल्या श्लोकात गुजरातमध्ये असलेल्या सोमनाथ मंदिराचा उल्लेख बारा पवित्र ज्योतिर्लिंगांच्या अगदी सुरुवातीला केला आहे, जो भारताच्या आध्यात्मिक वारशातील त्याचे महत्वाचे स्थान दर्शवतो. हे या सांस्कृतिक विश्वासाचे प्रतीक आहे की सोमनाथ आणि भारताच्या आध्यात्मिक भूगोलाचा पाया आहे. गुजरातमध्ये वेरावळजवळ प्रभास पाटन येथे असलेले सोमनाथ मंदिर हे केवळ एक पूजास्थान नसून, भारताच्या सांस्कृतिक सातत्याचे एक जिवंत प्रतीक आहे.
 
शतकानुशतके सोमनाथने लाखो लोकांची श्रद्धा आणि प्रार्थना आकर्षित केली. विध्वंसाच्या उद्देशाने आलेल्या, भक्तीची भावना नसलेल्या आक्रमणकर्त्यांनी त्याला वारंवार लक्ष्य केले. तरीही, सोमनाथची गाथा कोट्यवधी समर्पित भक्तांच्या अदम्य धैर्य, श्रद्धा आणि निश्चयाने ओळखली जाते.
 
स्वाभिमान पर्व : सामूहिक अभिमानाची राष्ट्रीय अभिव्यक्ती
सोमनाथ स्वाभिमान पर्वाचे आयोजन 8 जानेवारी ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत करण्यात येत असून, जानेवारी 1026 मध्ये सोमनाथ मंदिरावर झालेल्या पहिल्या नोंदवलेल्या आक्रमणाला एक हजार वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हा राष्ट्रीय स्तरावरील स्मरणोत्सव साजरा केला जात आहे.
हा उपक्रम विध्वंसाच्या स्मृती म्हणून नव्हे, तर जिद्द, श्रद्धा आणि सभ्यतागत आत्मसन्मानाला अभिवादन करण्यासाठी संकल्पित करण्यात आला आहे. शतकानुशतके सोमनाथवर वारंवार आक्रमणे झाली, ज्यामागील उद्देश भक्ती नव्हे तर विध्वंस होता. मात्र प्रत्येक वेळी देवी अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या भक्तांच्या सामूहिक संकल्पशक्तीतून हे मंदिर पुन्हा उभे राहिले. या अखंड पुनर्निर्माणाच्या परंपरेमुळे सोमनाथ हे भारताच्या सभ्यतागत सातत्याचे सामर्थ्यवान प्रतीक बनले आहे.
वर्ष 2026 हे वर्ष स्वातंत्र्यानंतर 11 मे 1951 रोजी सध्याचे सोमनाथ मंदिर भक्तांसाठी पुन्हा खुले करण्यात आले, त्या घटनेच्या पंच्याहत्तर वर्षांच्या पूर्ततेशीही जुळून येते. हे दोन्ही ऐतिहासिक टप्पे एकत्रितपणे‘सोमनाथ स्वाभिमान पर्वा' चा मूलाधार ठरतात.
चार दिवस चालणाऱ्या या पर्वकाळात सोमनाथ हे आध्यात्मिक साधना, सांस्कृतिक चिंतन आणि राष्ट्रीय स्मरणाचे केंद्र बनले आहे. या उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे 72 तास अखंड ओंकार जप, जो एकता, सामूहिक श्रद्धा आणि आत्मिक ऐक्याचे प्रतीक आहे. यासोबतच मंदिरनगरीत भक्तिसंगीत, आध्यात्मिक प्रवचने तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमनाथ स्वाभिमान पर्व हे भारताच्या सनातन सभ्यतागत प्रवासातील अभिमान, स्मरण आणि आत्मविश्वासाचे सामूहिक प्रतीक म्हणून उभे राहिले आहे.
 
ऐतिहासिक पार्श्वभूमी : सहस्रकांची जिद्द
सोमनाथचा ऐतिहासिक वारसा प्राचीन भारतीय परंपरेत खोलवर रुजलेला आहे. सोमनाथ वसलेले प्रभास तीर्थ हे भगवान शिव आणि चंद्रदेवांच्या उपासनेशी संबंधित मानले जाते. परंपरेनुसार चंद्रदेवांनी याच स्थळी भगवान शिवांची आराधना केली आणि त्यांच्या शापातून मुक्ती मिळवली. त्यामुळे या तीर्थस्थळाला अत्यंत महान आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
शतकानुशतके सोमनाथने अनेक पुनर्निर्माणाचे टप्पे अनुभवले असून, प्रत्येक टप्प्यात त्या काळातील श्रद्धा, कलात्मकता आणि साधनसंपत्तीचे प्रतिबिंब दिसून येते. प्राचीन नोंदींमध्ये विविध कालखंडांत वेगवेगळ्या साहित्याचा वापर करून येथे मंदिरे उभारली गेल्याचा उल्लेख आढळतो, जो पुनर्निर्मिती आणि सातत्याचे प्रतीक आहे. सोमनाथच्या इतिहासातील सर्वात अस्थिर आणि संघर्षमय कालखंडाची सुरुवात अकराव्या शतकात झाली.
जानेवारी 1026 मध्ये गझनीचा महमूद याने सोमनाथावर पहिला नोंदवलेला हल्ला केला. यानंतरच्या दीर्घ कालखंडात शतकानुशतके हे मंदिर वारंवार उद्ध्वस्त झाले आणि पुन्हा उभे राहिले. तरीही सोमनाथ लोकांच्या सामूहिक स्मृतीतून कधीही लोप पावला नाही. मंदिराच्या विध्वंस आणि पुनरुज्जीवनाचा हा प्रवास जागतिक इतिहासात अद्वितीय आहे. यावरून सोमनाथ हे केवळ दगडांचे बांधकाम केलेली वास्तु नसून श्रद्धा, ओळख आणि सभ्यतागत अभिमानाचे सजीव प्रतीक होते.
कार्तिक सुद 1, दिवाळीच्या दिवशी म्हणजेच 12 नोव्हेंबर 1947 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथच्या अवशेषांना भेट दिली आणि मंदिर पुनर्निर्माणाचा दृढ संकल्प व्यक्त केला. सोमनाथचे पुनर्स्थापन हे भारताचा सांस्कृतिक आत्मविश्वास पुनःप्रस्थापित करण्यासाठी अत्यावश्यक आहे, या विश्वासावर त्यांची दृष्टी आधारित होती. जनसहभाग आणि राष्ट्रीय संकल्पनेतून या मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले. कैलास महामेरू प्रसाद स्थापत्यशैलीत उभारलेले सध्याचे सोमनाथ मंदिर 11 मे 1951 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत विधिवत प्रतिष्ठापित करण्यात आले. हा सोहळा केवळ मंदिराच्या पुनःउद्घाटनाचा नसून, भारताच्या सभ्यतागत आत्मसन्मानाच्या पुनःस्थापनेचा ऐतिहासिक क्षण ठरला.
वर्ष 1951 मध्ये पुनर्निर्मित सोमनाथ मंदिर भक्तांसाठी पुन्हा खुले करण्यात आले, त्या घटनेच्या 50 वर्षांच्या पूर्तीनिमित्त 31 ऑक्टोबर 2001रोजी आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. याप्रसंगी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणात सरदार वल्लभभाई पटेल, के. एम. मुन्शी तसेच इतर अनेकांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला. हा कार्यक्रम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्तही आयोजित करण्यात आला होता. यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
वर्ष 2026 मध्ये देश 1951 मधील त्या ऐतिहासिक सोहळ्याच्या 75 वर्षांची पूर्तता साजरी करत आहे. हा सोहळा केवळ सोमनाथ मंदिराच्या पुनःउद्घाटनाचा नव्हता, तर भारताच्या सभ्यतागत आत्मसन्मानाच्या पुनःप्रत्ययाचे प्रतीक होता. साडेसात दशकांनंतरही सोमनाथ नवचैतन्याने उभा असून, आपल्या सामूहिक राष्ट्रीय संकल्पशक्तीचे चिरस्थायी सामर्थ्य प्रतिबिंबित करतो.
 
सोमनाथ मंदिर : वैभव, श्रद्धा आणि सजीव वारसा
सोमनाथ मंदिर भगवान शिवाच्या 12आद्य ज्योतिर्लिंगांपैकी पहिले मानले जाते. सध्याच्या मंदिर संकुलात गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप यांचा समावेश असून, हे संकुल अरबी समुद्राच्या सान्निध्यात भव्यतेने उभे आहे. मंदिराच्या शिखराची उंची 150 फूट असून त्याच्या शिखरावर 10 टन वजनाचा कलश विराजमान आहे. 27 फूट उंच ध्वजदंड मंदिराची अढळ ओळख दर्शवतो. संपूर्ण संकुलात 1,666 सोन्याचा मुलामा दिलेले कलश आणि 14,200 ध्वज असून, ते पिढ्यान्‌पिढ्यांच्या श्रद्धा व कलाकौशल्याचे प्रतीक आहेत.
सोमनाथ मंदिर आजही अत्यंत सक्रिय उपासनेचे केंद्र राहिले आहे. येथे दर वर्षी भाविकांच्या भेटी सतत उच्च प्रमाणात राहतात, जे 92 ते 97 लाखांदरम्यान असतात (2020 मध्ये सुमारे 98 लाख भाविकांनी दर्शन घेतले). बिल्व पूजनासारख्या विधींमध्ये 13.77 लाखांहून अधिक भाविक सहभागी होतात, तर 2025 मधील महा शिवरात्री
साठी 3.56लाख भाविक उपस्थित होते. सांस्कृतिक उपक्रमांमुळे भक्तांना सोमनाथच्या इतिहासाशी जोडण्यात महत्त्वाचा वाटा राहिला आहे. 2003 मध्ये सुरू केलेल्या लाईट आणि साऊंड शो ला 2017मध्ये 3 डी लेसर तंत्रज्ञान आणि कथनासह सुधारण्यात आले, आणि मागील तीन वर्षांत 10 लाखांहून अधिक लोकांनी या शो चा अनुभव घेतला. 'वंदे सोमनाथ कला महोत्सव'सारख्या कार्यक्रमांमुळे सुमारे 1500 वर्षांपूर्वीच्या नृत्यपरंपरांचे पुनरुज्जीवन झाले आहे. श्री सोमनाथ ट्रस्टच्या अध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथ मंदिराने पुनरुज्जीवनाचा नवीन टप्पा गाठला आहे. प्रशासन सुधारणा, पायाभूत सुविधा उन्नती आणि वारसा संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे मंदिराचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून स्थान अधिक मजबूत झाले आहे.
 

सोमनाथ स्वाभिमान पर्व आध्यात्मिक वातावरण आणि पदयात्रा

सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या शुभारंभापूर्वी सोमनाथमध्ये एका अनोख्या आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गिरनार तीर्थक्षेत्र आणि इतर अनेक पवित्र केंद्रांतील साधू संतांनी शंख चौक ते सोमनाथ मंदिरापर्यंत भव्य पदयात्रा काढली.
या मिरवणुकीत भगवान शंकराला अत्यंत प्रिय असलेले डमरू, विविध पारंपारिक वाद्ये आणि भक्तिसंगीताचे सूर उमटले होते. सिद्धिविनायक ढोल पथकाच्या सुमारे 75 वादकांनी या मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतला होता, त्यांच्या वादनाने संपूर्ण परिसर तालात आणि आध्यात्मिक ऊर्जेने भारून गेला होता. मंदिर परिसराच्या कानाकोपऱ्यात हर हर महादेवचा जयघोष घुमत होता.
या पदयात्रेत सहभागी झालेल्या साधू संतांनी आणि इतर प्रतिष्ठित मान्यवरांनी अत्यंत श्रद्धेने प्रार्थना केली. फुलांच्या वर्षावाने या पदयात्रेचे स्वागत करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण मंदिर संकुलाचा परिसराला एक दैवी आणि भव्य स्वरुप लाभले होते. तिथे उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना या आध्यात्मिक वातावरणाने एका सखोल आत्मिक समाधानाचा अनुभव आला.


सोमनाथमधील महिला सक्षमीकरण आणि शाश्वतता
2018 मध्ये स्वच्छ आयकॉनिक प्लेस अर्थात स्वच्छ आदर्श ठिकाण म्हणून घोषित झालेल्या सोमनाथमध्ये, शाश्वततेच्या संदर्भात अनेक नवोन्मेषी पद्धतींचा अवलंब केला गेला. मंदिरात देवा चरणी अर्पण केलेली फुले फेकून न देता, त्यापासून गांडूळ खत तयार केले जाते आणि हेच खत तिथल्या 1,700 बिल्व वृक्षांचे खाद्य म्हणून वापरले जाते. मिशन लाईफ अंतर्गत प्लास्टिक कचऱ्याचे रूपांतर पेव्हर ब्लॉक्समध्ये केले जाते आणि दर महिन्याला अशा 4,700 ब्लॉक्सची निर्मिती केली जाते. पावसाचे पाणी साठवण्याच्या यंत्रणेद्वारे दरमहा सुमारे 30 लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते.


या परिसरात 72,000 स्क्वेअर फूट क्षेत्रावर 7,200 झाडांचे मियावाकी जंगल पसरलेले आहे. हे जंगल दरवर्षी वातावरणातील सुमारे 93,000 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. मंदिरात पूजेसाठी वापरले जाणारे शुद्ध केलेले अभिषेकाचे जल सोमगंगाजल या नावाने बाटल्यांमध्ये भरले जाते, डिसेंबर 2024 पर्यंत 1.13 लाख पेक्षा जास्त कुटुंबांना या पद्धतीचा लाभ घेतला आहे.
सोमनाथ हे महिला सक्षमीकरणाचे एक भक्कम केंद्र म्हणूनही उदयाला आले आहे. सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या एकूण 906 कर्मचाऱ्यांपैकी 262 कर्मचारी महिला आहेत. विशेष म्हणजे बिल्व वनाचे संपूर्ण व्यवस्थापन महिलांद्वारेच पाहिले जाते. 65 महिला प्रसाद वाटपाच्या कामात तर 30 महिला मंदिरातील भोजन व्यवस्थेच्या सेवेत कार्यरत आहेत. इथे एकूण 363 महिलांना रोजगार मिळाला असून, या माध्यमातून या सगळ्यांना वार्षिक सुमारे 9 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळते. ही वस्तुस्थितीतून या मंदिर संकुलातून साधली जाणारी आत्मनिर्भरता आणि सन्मानाचीच प्रचिती येते.


पंतप्रधानांचा दौरा आणि संबंधित कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 08 ते 11 जानेवारी 2026 दरम्यानच्या नियोजित दौऱ्यामुळे सोमनाथ स्वाभिमान पर्वाला आता राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. 10 जानेवारी 2026 रोजी पंतप्रधान सोमनाथमध्ये उपस्थित राहून स्वाभिमान पर्वाच्या निमित्ताने आयोजित महत्त्वाच्या आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. संध्याकाळी ते मंदिर परिसरात सुरू असलेल्या 72 तासांच्या अखंड ओंकार जप कार्यक्रमात सहभागी होतील. हा कार्यक्रम निरंतर श्रद्धा, एकता आणि संस्कृतिक सामर्थ्याचे प्रतीक असणार आहे. त्याच संध्याकाळी पंतप्रधान स्वाभिमान पर्वाच्या सोहळ्याचा भाग म्हणून आयोजित केलेला ड्रोन शो देखील पाहणार आहेत.

 


11 जानेवारी 2026 रोजी पंतप्रधान शौर्य यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. ही शौर्य यात्रा म्हणजे शतकानुशतके सामना कराव्या लागलेल्या संकटांनंतरही सोमनाथचे अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या धाडसाचे, बलिदानाचे आणि अदम्य भावनेचे प्रतीक असणार आहे. या यात्रेनंतर पंतप्रधान सोमनाथ मंदिरात जाऊन पूजा करणार आहेत.
त्यानंतर पंतप्रधान सोमनाथमधील जनसमुदायाला संबोधित करतील. आपल्या भाषणात ते या मंदिराचे नागरी सांस्कृतिक महत्त्व, स्वाभिमान पर्वाचे मोल आणि सोमनाथशी जोडलेली श्रद्धा, लवचिकता आणि स्वाभिमानाचा चिरंतन संदेश यावर आपले विचार मांडतील. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमांमधील सहभागातून सोमनाथ स्वाभिमान पर्वाचे राष्ट्रीय महत्त्वच अधोरेखित होणार आहे, त्यासोबतच भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनाच्या वचनबद्धतेलाही बळकटी मिळणार आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे भारताच्या नागरी संस्कृतीतील सातत्यपूर्णता आणि सामूहिक विश्वासार्हतेचे जिवंत प्रतीक सोमनाथची महत्वाची भूमिका ठळकपणे अधोरेखित होणार आहे.

 


सारांश
सोमनाथ स्वाभिमान पर्वामुळे भारताच्या नागरी सांस्कृतिक आत्मविश्वासाला नवी उभारी मिळणार आहे. या पर्वाच्या माध्यमातून विनाशाचे नाही तर लवचिकतेचा, तसेच भीतीचा नाही तर श्रद्धेचा सन्मान केला जाणार आहे. सौराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर उभे असलेले सोमनाथ मंदिर जगभरातील भारतीयांना प्रेरणा देत आले आहे, यासोबतच विघातक शक्ती इतिहासजमा होतात, मात्र सदाचार, एकता आणि स्वाभिमानावर आधारलेली श्रद्धा चिरकाल टिकून राहते या तत्वाचेही हे मंदिर स्मरण करून देते. म्हणूनच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथचे आध्यात्मिक सार मांडणारा, खाली नमूद केलेला एक संस्कृत श्लोकही सामायिक केला आहे :

आदिनाथेन शर्वेण सर्वप्राणिहिताय वै।

आद्यतत्त्वान्यथानीयं क्षेत्रमेतन्महाप्रभम्।

प्रभासितं महादेवि यत्र सिद्ध्यन्ति मानवाः॥

याचा अर्थ असा की, आदिनाथ स्वरूपातील भगवान शंकरांनी सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी आपल्या शाश्वत तत्त्वाच्या माध्यमातून प्रभास खंड म्हणून ओळखले जाणारे हे अत्यंत शक्तिशाली आणि पवित्र क्षेत्र निर्माण केले. दैवी प्रकाशाने न्हाऊन निघालेली ही पवित्र भूमी म्हणजे मानवाला आध्यात्मिक पूर्णत्व, पुण्य आणि मोक्ष प्राप्त करून देणारे ठिकाण आहे.

 

संदर्भ : 

  1. https://www.pib.gov.in/PressNoteDetails.aspx?NoteId=154536&ModuleId=3&reg=3&lang=2
  2. https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2122423&reg=3&lang=2
  3. https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2212756&reg=3&lang=2
  4. https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2212686&reg=3&lang=1
  5. https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2212293&reg=3&lang=1
  6. https://www.pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=2212686&reg=3&lang=2
  7. https://www.newsonair.gov.in/hm-amit-shah-appeals-to-nation-to-join-somnath-swabhiman-parv/
  8. https://somnath.org/
  9. https://somnath.org/jay-somnath
  10. https://somnath.org/somnath-darshan/
  11. https://somnath.org/social-activities/
  12. https://girsomnath.nic.in/about-district/history
  13. माहिती आणि जनसंपर्क संचालनालय, गुजरात

पीडीएफ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

***

नितीन फुल्लुके / हेमांगी कुलकर्णी / तुषार पवार / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2213232) आगंतुक पटल : 36
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Nepali , Bengali , Manipuri , Gujarati , Tamil