सहकार मंत्रालय
“सहकार से समृद्धी” संकल्पनेअंतर्गत उदयपूर येथे राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेत सहकार सुधारणांचा आढावा
प्रविष्टि तिथि:
10 JAN 2026 12:45PM by PIB Mumbai
सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासंदर्भात राष्ट्रीय स्तरावरील दोन दिवसांची कार्यशाळा आणि आढावा बैठक 8–9 जानेवारी 2026 रोजी राजस्थानातील उदयपूर येथे आयोजित करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाद्वारे आयोजित या कार्यशाळेत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ प्रतिनिधी, सहकारी संस्थांचे सचिव आणि निबंधक यांच्यासह सहकार क्षेत्रातील प्रमुख हितधारक एकत्र आले होते.
मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशिष कुमार भुतानी यांनी या कार्यशाळेचे उद्घाटन केले. आपल्या प्रमुख भाषणात, सहकार मंत्रालयाच्या सचिवांनी केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील समन्वय अधिक मजबूत करणे, विचारांच्या आदानप्रदानाला चालना देणे आणि सहकार क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अभिनव दृष्टिकोनांना प्रोत्साहन देणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट असल्यावर भर दिला. सहकारी संस्था गेल्या अनेक वर्षांपासून मागे पडल्या आहेत आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सार्वजनिक धारणा बदलून तसेच पारंपारिक आणि सोशल मीडियाद्वारे सकारात्मक यशोगाथा अधोरेखित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
एका समर्पित आढावा सत्रात सहकार मंत्रालयाच्या मुख्य उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला, ज्यामध्ये प्राथमिक कृषी पतसंस्था (पॅक्स ), कृषी आणि ग्रामीण विकास बँका आणि आरसीएस कार्यालयांचे संगणकीकरण तसेच आदर्श पॅक्स (MPACS), बहुउद्देशीय दुग्ध सहकारी संस्था आणि बहुउद्देशीय मत्स्यपालन सहकारी संस्था अशा योजनांच्या अंमलबजावणीचा समावेश होता. जगातील सर्वात मोठा धान्य साठवणूक उपक्रम तसेच सामान्य सेवा केंद्रे, प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र आणि पंतप्रधान जनऔषधी केंद्रांसह पॅक्स द्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या अतिरिक्त सेवांचा विस्तार यावरही चर्चा करण्यात आली.
या कार्यशाळेत राष्ट्रीय सहकारी डेटाबेस मजबूत करणे आणि बहु-राज्य सहकारी संस्थांमध्ये सुधारणांना चालना देणे यावरही प्रामुख्याने भर देण्यात आला. राज्यांनी एपीआय एकत्रीकरण, सकल मूल्यवर्धन अंदाजासाठी वार्षिक उलाढाल आणि नफा-तोटा आकडेवारी अद्यतनित करणे, जीईएम वर सहकारी संस्थांना ऑनबोर्ड करणे, लिक्विडेशन प्रक्रियेला गती देणे आणि सहकारी संस्थांसाठी प्रशासन आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मजबूत करणे यावरील अनुभव सामायिक केले. कार्यशाळेत लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA), त्रिभुवन सहकारी विद्यापीठ, राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण परिषद आणि वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (VAMNICOM) सारख्या संस्थांद्वारे सशक्त नेतृत्व, सुशासन आणि क्षमता बांधणीद्वारे भविष्यासाठी सज्ज सहकारी संस्था उभारण्यावर भर देण्यात आला, ज्यामध्ये महिला, युवक आणि उपेक्षित समुदायांसाठी संधी विस्तारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले .
सहकार क्षेत्राला बळकटी देण्याबाबत दोन दिवसांची राष्ट्रीय-स्तरीय कार्यशाळा आणि आढावा बैठकीचा भाग म्हणून, दुसऱ्या दिवशी "सहकार से समृद्धी - पॅक्स आघाडीवर " या शीर्षकाचे एक समर्पित सत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चेत प्राथमिक कृषी पतसंस्थाचे पुनरुज्जीवन करण्यात सहकारी बँकांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करण्यात आली, ज्यामध्ये राज्यांनी त्यांचे अनुभव आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक केल्या.
समारोप सत्रात, सहकार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव पंकज कुमार बन्सल यांच्या अध्यक्षतेखाली सामूहिक सहकार्य, बचत गट आणि शेतकरी उत्पादक संस्थाबरोबर पॅक्सचे एकत्रीकरण आणि एनसीडीसी योजनांअंतर्गत पोहोच मजबूत करण्यावर चर्चा झाली.
***
माधुरी पांगे/सुषमा काणे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2213221)
आगंतुक पटल : 23