उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी नवी दिल्ली येथे भारतीय भाषांवरील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे केले उद्घाटन
भारतातील भाषा राष्ट्राला विभाजित नव्हे तर एकजूट करतात : उपराष्ट्रपती
भाषांचे संरक्षण म्हणजे संस्कृतीचे रक्षण : उपराष्ट्रपती
प्रविष्टि तिथि:
09 JAN 2026 7:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2026
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्ली येथे भारतीय भाषाविषयक तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. ही परिषद वैश्विक हिंदी परिवार, आंतरराष्ट्रीय सहयोग परिषद, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र आणि दिल्ली विद्यापीठातील भारतीय भाषा विभाग यांनी आयोजित केली होती. अभ्यासक, भाषाशास्त्रज्ञ आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
भाषा ही संस्कृतीचा आत्मा आहे. ती पिढ्यान्पिढ्या सामूहिक स्मृती, ज्ञानप्रणाली आणि मूल्ये पुढे नेत असते. प्राचीन शिलालेख, ताडपत्री हस्तलिखिते ते आजच्या डिजिटल लिपीपर्यंत, भाषांनी तत्त्वज्ञान, विज्ञान, कविता आणि नैतिक परंपरा जपल्या आहेत. या गोष्टी मानवतेला तिची खरी ओळख आणि रूप देतात, असे उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.
भारतातील अनेक भाषा राष्ट्राला कधीही विभाजित करत नाहीत; उलट त्या सामायिक सांस्कृतिक परंपरा आणि समान धर्म यांना अधिक बळकट करतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून आपल्या पहिल्या संसदीय अधिवेशनाचा अनुभव सांगताना उपराष्ट्रपतींनी नमूद केले की आता अधिकाधिक खासदार आपल्या मातृभाषेत बोलतात. लोकशाही तेव्हाच समृद्ध होते जेव्हा प्रत्येक नागरिक आपल्या भाषेत व्यक्त होतो, असे ते म्हणाले.
सध्याच्या आव्हानांवर त्यांनी भाष्य केले. जगभरातील अनेक स्थानिक भाषा आज धोक्यात आहेत. विशेषतः संकटात असलेल्या भाषांविषयी अधिक संशोधन करण्यात, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य वाढवण्यात आणि प्राचीन लिपी व हस्तलिखितांचे संवर्धन करण्यात भाषा परिषदा महत्त्वाची भूमिका बजावतात, असे ते म्हणाले,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील उपक्रमांचा उल्लेख करून उपराष्ट्रपतींनी बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अधोरेखित केले. तसेच भारतीय भाषांची हस्तलिखिते जतन करून त्यांचा प्रसार करणाऱ्या ज्ञान भारतम् मिशनविषयीही त्यांनी गौरवोद्गार काढले. ज्ञान हे पवित्र आहे आणि ते वाटले गेले पाहिजे यावर भारताचा विश्वास आहे, असे ते म्हणाले.
भाषा संवर्धनासाठी तंत्रज्ञानाचे सहकार्य घ्या असे त्यांनी सांगितले. भारतीय भाषांची वर्तमानात भरभराट व्हावी आणि त्यांनी भविष्य घडवावं यासाठी डिजिटल संग्रहालये, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भाषांतर साधने आणि बहुभाषिक मंचांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
निलीमा चितळे/प्रज्ञा जांभेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2213021)
आगंतुक पटल : 19