संरक्षण मंत्रालय
आयएनएस चिल्का येथे 02/25 तुकडीतील प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत संचलन सोहळा
प्रविष्टि तिथि:
09 JAN 2026 4:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2026
आयएनएस चिल्का येथे 8 जानेवारी 2026 रोजी 02/25 तुकडीचा प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत संचलन सोहळा पार पडला. 16 आठवड्यांच्या अब-इनिशिओ (प्रारंभिक) प्रशिक्षणाची यशस्वी सांगता झाली. प्रशिक्षणार्थींनी सूर्यास्तानंतर आयोजित करण्यात आलेल्या प्रभावी औपचारिक संचलनात सहभाग नोंदवत, शिस्तबद्ध, कणखर आणि युद्धसज्ज नौदल व्यावसायिकांमध्ये झालेल्या त्यांच्या परिवर्तनाचे प्रतीकात्मक दर्शन घडविले. या पासिंग आउट तुकडीत एकूण 2,172 प्रशिक्षणार्थी सहभागी होते. यामध्ये 2,103 अग्निवीरांचा समावेश असून, त्यात 113 महिला अग्निवीरांचा समावेश आहे. तसेच भारतीय नौदलातील 270 एसएसआर (वैद्यकीय सहाय्यक), 44 क्रीडा प्रवेश प्रवर्गातील कर्मचारी आणि भारतीय तटरक्षक दलातील 295 नाविकांचा या तुकडीत समावेश होता.
दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अॅडमिरल समीर सक्सेना हे या परेडचे प्रमुख पाहुणे आणि निरीक्षण अधिकारी होते. आयएनएस चिल्काचे कमांडिंग ऑफिसर कमोडोर बी. दीपक अनील हे परेडचे संचालन अधिकारी होते. या समारंभास प्रतिष्ठित माजी सैनिक, नामवंत क्रीडापटू, वरिष्ठ नौदल अधिकारी, इतर मान्यवर तसेच प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परेडमधून प्रशिक्षणार्थींच्या शिस्तबद्ध हालचाली, उत्कृष्ट ड्रिल आणि व्यावसायिक परिपक्वतेचे प्रभावी दर्शन घडले. पुरुष प्रशिक्षणार्थींसह महिला अग्निवीरांचा समावेश, कार्यरत जबाबदाऱ्यांमध्ये लिंग समता आणि समावेशकतेचा भारतीय नौदलाचा दृष्टिकोन स्पष्ट करणारा ठरला.
परेडला संबोधित करताना दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ यांनी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले. त्यांनी प्रशिक्षणार्थींना आपल्या व्यावसायिक कौशल्यांचा अधिक विस्तार करण्याचे, तंत्रज्ञानाबाबत सजग राहण्याचे तसेच कर्तव्य, सन्मान आणि धैर्य या नौदलाच्या मूलभूत मूल्यांचे आत्मसात करण्याचे आवाहन केले. तसेच, धैर्य आणि दृढ निश्चयाच्या बळावर आपली वाटचाल करताना राष्ट्राचा सन्मान सदैव जपण्याचे निर्देश त्यांनी प्रशिक्षणार्थींना दिले. अग्निवीरांच्या पालकांनी राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत, त्यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. प्रमुख पाहुण्यांनी नौदल आणि राष्ट्राच्या परिवर्तनाच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या ‘टीम चिल्का’च्या सातत्यपूर्ण परिश्रमांचे विशेष कौतुक केले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत अग्निवीरांना पदके आणि चषक प्रदान करण्यात आले. शशी बी. केंचवागोल आणि जतिन मिश्रा यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अग्निवीर (एसएसआर) आणि सर्वोत्कृष्ट अग्निवीर (एमआर) म्हणून ‘नौदल प्रमुख रोलिंग ट्रॉफी’ आणि सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. एकूण गुणवत्ता क्रमवारीत सर्वोत्कृष्ट महिला अग्निवीर म्हणून अनिता यादव यांना ‘जनरल बिपिन रावत रोलिंग ट्रॉफी’ प्रदान करण्यात आली. तसेच केशव सूर्यवंशी आणि सोनेंद्र यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट नाविक (जीडी) आणि सर्वोत्कृष्ट नाविक (डीबी) म्हणून गौरविण्यात आले.
तत्पूर्वी, समारोप समारंभादरम्यान, खरावेल विभागाला सर्वसाधारण विजेतेपदाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली, तर अशोक विभागाने उपविजेतेपद पटकावले. या प्रसंगी आयएनएस चिल्काच्या 'अंकुर 2025' या द्वैभाषिक प्रशिक्षणार्थी मासिकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. हे मासिक अग्निवीरांचे अनुभव आणि त्यांच्या परिवर्तनात्मक प्रवासाचे दर्शन घडवते.
0YH6.jpg)
3TFT.jpg)
(1)J426.jpg)
नेहा कुलकर्णी /राज दळेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2212906)
आगंतुक पटल : 17