पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडिया एनर्जी वीक 2026 चे गोव्यात 27–30 जानेवारी दरम्यान होणार आयोजन


जागतिक मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि धोरणकर्ते ऊर्जा सुरक्षा, गुंतवणूक आणि निष्कार्बनीकरणावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणार

प्रविष्टि तिथि: 06 JAN 2026 5:59PM by PIB Mumbai

पणजी, 6 जानेवारी 2026

इंडिया एनर्जी वीक (IEW) 2026 या ऊर्जानिर्मिती आणि संवर्धनविषयक विचारमंथन करणाऱ्या कार्यक्रमाचे पुन्हा एकदा 27–30 जानेवारी 2026 दरम्यान गोव्यात आयोजन होणार आहे. जागतिक ऊर्जा क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर जगभरातील मंत्री, जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी, धोरणकर्ते, वित्तीय संस्था, शैक्षणिक संस्था आणि तंत्रज्ञान पुरवठादार या निमित्ताने एकत्र येतील.

वर्षातील पहिली प्रमुख  आंतरराष्ट्रीय ऊर्जा परिषद म्हणून, इंडिया एनर्जी वीक 2026 ऊर्जा सुरक्षा बळकट करणे, गुंतवणुकीला चालना देणे आणि निष्कार्बनीकरणासाठी व्यावहारिक आणि व्यापक मार्ग विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करेल.

वाढती मागणी, भू-राजकीय अनिश्चितता आणि हवामान बदलाबाबतच्या वाढत्या वचनबद्धतेचा सामना जागतिक ऊर्जा व्यवस्था करत असताना, इंडिया एनर्जी वीक 2026 संवाद आणि सहकार्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल. मागील आवृत्त्यांच्या यशाचा आधार घेत, या कार्यक्रमात 120 पेक्षा जास्त देशांतील सहभागी येण्याची अपेक्षा आहे. 2025 च्या आवृत्तीत 68,000 पेक्षा जास्त सहभागी , 570 प्रदर्शक आणि 5,400 कॉन्फरन्स प्रतिनिधी उपस्थित  होते, ज्यामध्ये 100 सत्रांमध्ये 540 पेक्षा जास्त जागतिक वक्त्यांनी आपले विचार मांडले. 2026 मध्ये होणारा हा कार्यक्रम अधिक व्यापक स्वरुपात आयोजित होईल, ज्यामुळे जागतिक ऊर्जा संवाद मंचांमध्ये  या मंचाचे स्थान भक्कम होईल. भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अधिपत्याखाली आयोजित आणि फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्री (FIPI) व डीएमजी इव्हेन्ट्सद्वारे संयुक्तपणे आयोजित, इंडिया एनर्जी वीक 2026 ऊर्जा सुरक्षा, परवडणारी उपलब्धता आणि शाश्वतता यावर सहकार्यासाठी एक तटस्थ आणि जागतिक स्तरावर जोडलेले व्यासपीठ प्रदान करते. अमेरिका, युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशातील शिष्टमंडळे यामध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे, जे जागतिक ऊर्जा वाटाघाटींमध्ये इंडिया एनर्जी वीकची वाढती भूमिका अधोरेखित करते.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या (IEA) 'वर्ल्ड एनर्जी आउटलुक 2025' नुसार, 2050 पर्यंत जागतिक ऊर्जेच्या वाढीव मागणीत एकट्या भारताचा वाटा 23 टक्क्यांहून अधिक असेल, जो कोणत्याही देशासाठी सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर, IEW 2026 लवचिक ऊर्जा व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला वेग देण्यासाठी धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांना एकत्र आणेल.

भारताची सुधारणा-आधारित ऊर्जा चौकट

इंडिया एनर्जी वीक 2026 भारताच्या सुधारणा-आधारित ऊर्जा मॉडेलवर प्रकाश टाकेल, जे आर्थिक वाढ, हवामान जबाबदारी आणि ग्राहक संरक्षण यांचा समतोल राखते. 'ऑइलफिल्ड्स (रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट) ॲक्ट 2025' आणि 'पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रुल्स 2025' अंतर्गत महत्त्वपूर्ण वैधानिक आणि नियामक सुधारणांनी अपस्ट्रीम परिसंस्थेला अधिक बळकट केले आहे. या सुधारणांमध्ये उत्खनन, उत्पादन, निष्कार्बनीकरण आणि एकात्मिक ऊर्जा प्रकल्पांचा समावेश असलेल्या सिंगल पेट्रोलियम लीजची तरतूद आहे; 180 दिवसांच्या आत भाडेतत्त्वावरील निर्णयांसह कालबद्ध मंजुरी; 30 वर्षांपर्यंतची दीर्घकालीन लीज स्थिरता; पायाभूत सुविधांच्या वाटणीची यंत्रणा; आणि गुंतवणूकदारांच्या जोखीम-निवारणासाठी लवाद आणि भरपाईच्या संरक्षणात्मक उपायांचा समावेश आहे.

स्वच्छ ऊर्जा आणि इथेनॉल कार्यक्रम

भारताचा इथेनॉल मिश्रण कार्यक्रम जागतिक मानक म्हणून उदयास आला आहे, ज्याने लक्षणीय परिणाम साध्य केले आहेत. यामध्ये 2014 पासून आतापर्यंत 1.59 लाख कोटी रुपयांची विदेशी चलनाची बचत, 813 लाख मेट्रिक टन कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनात घट, 270 लाख मेट्रिक टन कच्च्या तेलाला  पर्याय , तेल विपणन  कंपन्यांकडून इथेनॉल डिस्टिलर्सना 2.32 लाख कोटी रुपयांचे शुल्क वितरण  आणि शेतकऱ्यांना थेट दिलेले 1.39 लाख कोटी रुपये यांचा समावेश आहे. जैवइंधन, हरित  हायड्रोजन, शाश्वत इंधन आणि उदयोन्मुख कमी-कार्बन तंत्रज्ञान हे इंडिया एनर्जी वीक 2026 मधील चर्चेचे प्रमुख विषय असतील.

पायाभूत सुविधांचा विस्तार आणि ऊर्जा सुरक्षा

भारताने दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा बळकट करण्यासाठी देशांतर्गत अन्वेषण आणि पायाभूत सुविधांचा निरंतर विकास करणे सुरू ठेवले आहे. पेट्रोल किरकोळ विक्री केंद्रे 2014 मधील सुमारे 52,000 वरून 2025 मध्ये एक लाखांहून अधिक झाली आहेत. सीएनजी स्टेशन्सची संख्या सुमारे 968 वरून 8477 पेक्षा जास्त झाली आहे, तर पीएनजी घरगुती जोडण्या 25 लाखांवरून वाढून 1.59 कोटींपेक्षा जास्त झाल्या आहेत. नैसर्गिक वायू पाइपलाइन नेटवर्कमध्ये सुमारे 66 टक्के वाढ होऊन ते 25923 किमी पेक्षा जास्त झाले आहे, आणि सिटी गॅस डिस्ट्रिब्युशनचे जाळे आता बेटांचा अपवाद वगळता संपूर्ण देशात पसरले आहे.

किंमत स्थिरता आणि ग्राहक संरक्षण

ऊर्जेच्या किमतींमधील जागतिक अस्थिरतेतही, भारताने ग्राहकांसाठी किमतींमध्ये स्थिरता राखली आहे. 2021 पासून प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली असताना, दिल्लीतील किमती 2025 मध्येही 2021 मधील किमतींपेक्षा कमी राहिल्या. पेट्रोलवर प्रति लिटर 13 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर 16 रुपये केंद्रीय उत्पादन शुल्क कपातीचा संपूर्ण लाभ ग्राहकांना देण्यात आला, आणि तेल विपणन कंपन्यांनी मार्च 2024 मध्ये प्रति लिटर 2 रुपयांची अतिरिक्त किंमत कपात लागू केली. पीएमयूवाय लाभार्थ्यांसाठी एलपीजीच्या किमती प्रति सिलेंडर सुमारे 553 रुपये ठेवण्यात आल्या आहेत, ज्या  जागतिक स्तरावर सर्वात कमी किमतींपैकी एक आहे.

जागतिक ऊर्जा संवादासाठी व्यासपीठ

चार दिवसांच्या कालावधीत, इंडिया एनर्जी वीक 2026 मध्ये मंत्र्यांच्या गोलमेज परिषदा, मुख्य कार्यकारी अधिकारी संवाद, सार्वजनिक-खाजगी क्षेत्र परस्पसंवाद, तंत्रज्ञान सादरीकरणे, प्रदर्शने, सामाजिक कार्यक्रम आणि माध्यमांशी संवाद यांचा समावेश असेल. विशेष सत्रांमध्ये हायड्रोजन अर्थव्यवस्था, हरित वित्तपुरवठा, शाश्वत इंधन, चक्रीय अर्थव्यवस्था, डिजिटल परिवर्तन आणि मनुष्यबळ विकास यावर लक्ष केंद्रित केले जाईल. विस्तारित प्रदर्शनामध्ये संपूर्ण ऊर्जा मूल्य साखळीतील शेकडो कंपन्या सहभागी होतील, ज्यांना व्यापक आंतरराष्ट्रीय सहभाग आणि देशांच्या पॅव्हेलियनचे पाठबळ असेल.

इंडिया एनर्जी वीक बद्दल माहिती

इंडिया एनर्जी वीक हे देशाचे प्रमुख जागतिक ऊर्जा व्यासपीठ आहे, जे सुरक्षित, शाश्वत आणि परवडणाऱ्या ऊर्जेच्या भविष्यासाठी सरकार, उद्योग नेते आणि नवोन्मेषकांना एकत्र आणते. एक तटस्थ आंतरराष्ट्रीय मंच म्हणून, ते गुंतवणूक, धोरणात्मक सुसंवाद आणि तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देते. इंडिया एनर्जी वीक 2026 गोव्यात 27 ते 30 जानेवारी 2026 दरम्यान आयोजित केला जाईल. तज्ञांनी तयार केलेल्या या चार दिवसांच्या माहितीपूर्ण कार्यक्रमादरम्यान, इंडिया एनर्जी वीक 2026 मध्ये मंत्र्यांच्या गोलमेज परिषदा, जागतिक भांडवली प्रवाहावर मुख्य कार्यकारी अधिकारी संवाद, सार्वजनिक-खाजगी क्षेत्र परस्परसंवाद, बहुराष्ट्रीय कंपन्या, राष्ट्रीय ऊर्जा कंपन्या आणि वेगाने वाढणाऱ्या स्टार्टअप्सद्वारे तंत्रज्ञान सादरीकरणे, सामाजिक कार्यक्रम आणि माध्यम संवाद यांचा समावेश असेल; सोबतच एक अनोखे प्रदर्शन देखील आयोजित केले जाईल.

अधिक माहितीसाठी, भेट द्या:

https://www.indiaenergyweek.com/

 


सुषमा काणे/शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa

 


(रिलीज़ आईडी: 2211826) आगंतुक पटल : 74
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , Bengali , English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu