गृह मंत्रालय
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज श्री विजयापुरम येथे अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेश सरकारच्या ₹373 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी
सेल्युलर कारागृहामध्ये उभारलेले वीर सावरकर स्मारक आणि अमर ज्योत स्वातंत्र्य सैनिकांच्या संघर्ष, त्याग आणि बलिदानाचा संदेश संपूर्ण जगाला देत आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमान आणि निकोबारमधील बेटांना‘शहीद’आणि‘स्वराज' अशी नावे देऊन नेताजींना गौरवांजली अर्पण केली
जिथे स्वातंत्र्यसैनिकांनी दुःखाचे बळात आणि छळाचे स्वातंत्र्याच्या संकल्पात रूपांतर केले, असे अंदमान आणि निकोबार हे प्रत्येक भारतीयासाठी तीर्थक्षेत्र आहे
मोदी सरकार अंदमान आणि निकोबारला आंतरराष्ट्रीय स्कुबा डायव्हिंग गंतव्यस्थान बनवत आहे
ग्रेट निकोबार प्रकल्पामुळे हे बेट जागतिक कार्गो केंद्र, पर्यटन केंद्र आणि भारताच्या सामरिक सुरक्षेचा अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ बनेल
अंदमान आणि निकोबार बेट आपल्या सार्वभौमत्वाचे, सागरी सामर्थ्याचे आणि आर्थिक उपक्रमांचे केंद्र बनत आहेत
पर्यावरणाचे संरक्षण आणि वारसा जतन करत मोदी सरकार अंदमान आणि निकोबारचा विकास करत असून, विकसित भारताच्या उभारणीत त्यांचे योगदान निश्चित करत आहे
मागील सरकारने अंदमान आणि निकोबारला सरकारी तिजोरीवरचा भार मानले होते; मोदी सरकारच्या काळात हे देशाच्या तिजोरीत योगदान देणार आहे
श्री विजयापुरम नगरपरिषदेकडून 98% घरांमधून कचरा संकलन ही स्वच्छ भारत अभियानाची ऐतिहासिक कामगिरी आहे
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते श्री विजयापुरम येथे तीन नव्या कायद्यांवर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
03 JAN 2026 7:45PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज श्री विजयापुरम येथे अंदमान आणि निकोबार प्रशासनाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली. या प्रसंगी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, बंदी संजय कुमार, अंदमान आणि निकोबार बेटांचे उपराज्यपाल अॅडमिरल डी. के. जोशी (निवृत्त), केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी श्री विजयापुरम येथे तीन नव्या कायद्यांवर आधारित प्रदर्शनाचेही उद्घाटन केले.

याप्रसंगी अमित शाह म्हणाले की, याच भूमीवर भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या अनेक हुतात्मा स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांनी बांधलेल्या सेल्युलर कारागृहामध्ये आपल्या आयुष्याची अनेक वर्षे घालवली. अनेकांनी येथे प्राणत्याग केला, ज्यामुळे भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक बळकट झाला, तर अनेक वीरांना फाशी देण्यात आली. आज सेल्युलर जेलमधील वीर सावरकर स्मारक आणि प्रज्वलित अमर ज्योत संपूर्ण जगाला सांगत आहेत की येथे अनेक महान आत्म्यांनी आपले जीवन बलिदान दिले. त्यांनी सांगितले की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वतंत्र भारताचा तिरंगा सर्वप्रथम याच ठिकाणी फडकवला होता आणि त्यांच्या स्मरणार्थ व त्यांच्या शब्दांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन बेटांना‘शहीद' आणि‘स्वराज’ अशी नावे दिली. या द्वीपसमूहातील प्रत्येक बेटाला भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वीरांच्या नावाने ओळख देण्याचे कार्य पंतप्रधान मोदी यांनी हाती घेतले आहे, असेही त्यांनी नमूद केले. ही भूमी स्वतंत्र भारतातील प्रत्येक नागरिकासाठी तीर्थक्षेत्र आहे, कारण येथेच आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दुःखाला शक्तीमध्ये, एकांताला दृढ संकल्पामध्ये आणि छळाला स्वातंत्र्याच्या मार्गामध्ये रूपांतर करून अखेर स्वातंत्र्य प्राप्त केले.

अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी या बेटांना सामरिक सामर्थ्याचे केंद्र बनवले आहे. मागील सरकारने अंदमान आणि निकोबारला तिजोरीवरचा भार मानले होते; परंतु मोदी सरकारच्या काळात हे देशाच्या तिजोरीत योगदान देणार आहे. गेल्या 11 वर्षांत दिसून आलेला हा बदल देशातील प्रत्येक कणाला भारतमाता मानून राष्ट्रसेवेला वाहून घेण्याच्या संकल्पातून साकार झाला आहे, असे त्यांनी सांगितले. या दृष्टीकोनातून आज येथे 9 मोठ्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि 2 प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली असून, एकाच दिवशी ₹373 कोटींच्या विकासकामांची भेट या बेटांना देण्यात आली आहे. या विकास प्रकल्पांमध्ये ₹229 कोटी खर्चाचा एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्र समाविष्ट आहे. ₹33 कोटी खर्चाच्या जिल्हा रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन, न्याय वैद्यक शास्त्र प्रयोगशाळेचे उद्घाटन तसेच ₹50 कोटी खर्चाच्या आणखी 6 योजनांचे उद्घाटन आज करण्यात आले. या विकास प्रकल्पांमुळे आपल्या बेटांच्या विकासात आज एक नवे पर्व सुरू होत आहे, असे केंद्रीय गृह मंत्र्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले की, येथे आज तीन नवीन फौजदारी कायद्यांबद्दल माहिती देणारे प्रदर्शनाचे उद्घाटन झाले आहे. येत्या काळात फौजदारी न्यायव्यवस्थेत होणारे मूलभूत बदल आणि तंत्रज्ञानाला मिळणारा कायदेशीर आधार याबद्दल माहिती मिळवण्यासाठी प्रत्येकाने या प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, येथील सर्व वकिलांनी, तरुण विद्यार्थ्यांनी, विशेषतः महिलांनी हे प्रदर्शन पाहिले पाहिजे.

पंतप्रधान मोदींनी देशाला वसाहतवादी राजवटीच्या चिन्हांपासून मुक्त करण्यासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली आहे, असे अमित शाह म्हणाले. याच मोहिमेअंतर्गत पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजय पुरम ठेवण्यात आले आहे आणि इतर बेटांनाही आपल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांची नावे देण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आज अंदमान आणि निकोबार बेट, एका अर्थाने, आपल्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, सागरी शक्ती आणि आर्थिक घडामोडींचे केंद्र म्हणून उदयास येत आहेत. ते म्हणाले की, अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये नील अर्थव्यवस्था आणि पर्यटनाची प्रचंड क्षमता आहे, त्याचबरोबर ती देशाच्या प्रत्येक भागातील स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींचे प्रतिबिंब देखील आहेत. शाह म्हणाले की, या बेटाचा वारसा जतन करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि त्यांची सुरक्षा मजबूत करत त्यांना विकसित भारताचा अविभाज्य भाग बनवण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध आहे.
पर्यटन असो वा पर्यावरण, मत्स्यव्यवसाय असो वा कृषी, एमएसएमई असो वा स्वच्छ ऊर्जा, येथे प्रत्येक क्षेत्रात विकास सुरू झाला आहे असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, ग्रेट निकोबारमधील आगामी प्रकल्पामुळे अंदमान आणि निकोबार बेटे जागतिक नकाशावर एक महत्त्वाचे जागतिक व्यापार केंद्र आणि सामरिक सुरक्षेचे केंद्र बनतील. ते म्हणाले की, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एका दशकात हे ठिकाण जगातील पर्यटकांनी सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणांपैकी एक बनेल.

अमित शाह म्हणाले की, अंदमान आणि निकोबार बेटांना स्कूबा डायव्हिंगसाठीच्या आयएसओ मानकांनुसार श्रेणीसुधारित करून, स्कूबा डायव्हिंग आणि साहसी जलक्रीडांसाठी जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या 'एक पेड माँ के नाम' या आवाहनानुसार, पर्यावरणाची काळजी घेत येथे २४ लाख झाडे लावण्यात आली आहेत. श्री विजयपुरम नगर परिषदेद्वारे ९८% घरांतून कचरा गोळा केला गेला असून हे स्वच्छ भारत अभियानाचे एक ऐतिहासिक यश आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जगातील ११व्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडून चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे आणि केवळ दोन वर्षांत देश तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शाह म्हणाले की, देशात आर्थिक वाढ होत असून तो उत्पादनाचे जागतिक स्तरावरील केंद्र बनत आहे, अधिक सुरक्षित होत आहे आणि परंपरांना पुनरुज्जीवित करून, आपल्या संस्कृती आणि इतिहासातून प्रेरणा घेऊन पुढे जात आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतातील जनतेने प्रत्येक क्षेत्रात व्यापक बदल घडवून आणले आहेत, ज्यामुळे सर्वांगीण विकासाच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी स्वतः एक संकल्प केला आहे आणि १३० कोटी भारतीयांनाही प्रतिज्ञा घेण्यास प्रेरित केले आहे की, स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत भारत प्रत्येक क्षेत्रात जगात पहिल्या क्रमांकावर असेल. हे ध्येय साध्य करण्यासाठी आत्मनिर्भर भारत आणि भारतीयांकडून स्वदेशी उत्पादनांचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. ते म्हणाले की, विकसित राष्ट्र बनण्यासाठी देशाला प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर व्हावे लागेल आणि प्रत्येक भारतीयाने स्वदेशी उत्पादने वापरण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे.
***
नितीन फुल्लुके / नितीन गायकवाड / उमा रायकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2211242)
आगंतुक पटल : 13