संरक्षण मंत्रालय
एअर मार्शल नागेश कपूर यांनी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
01 JAN 2026 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2026
एअर मार्शल नागेश कपूर यांनी आज दि. 01 जानेवारी 2026 रोजी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
सर्वोत्तम युद्ध सेवा पदक,परम विशिष्ट सेवा पदक,अति विशिष्ट सेवा पदक, वायू सेना पदक यांनी सन्मानित एअर मार्शल कपूर यांनी डिसेंबर 1985 मध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर 06 डिसेंबर 1986 रोजी ते हवाई दलाच्या उड्डाण दलात लढाऊ विभागात रुजू झाले. एअर मार्शल कपूर हे एक अनुभवी लढाऊ वैमानिक, उड्डाण प्रशिक्षक आणि फायटर कॉम्बॅट लीडर आहेत. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी मिग-21 आणि मिग-29 च्या सर्व श्रेणीतील विमानांचे उड्डाण केले आहे, यासोबतच विविध लढाऊ आणि प्रशिक्षण विमानांचा 3400 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव त्यांना आहे.
(3)N1X8.jpeg)
ते संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. एअर मार्शल कपूर यांनी 39 वर्षांपेक्षा जास्त काळ देशाला सेवा दिली आहे. या काळात त्यांनी कमांड, कार्यान्वयीन, प्रशिक्षण आणि कर्मचारी अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. आपल्या कार्यान्वयीन जबादारीच्या कार्यकाळात एअर मार्शल कपूर यांनी मध्य विभागातील एका फायटर स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर, पश्चिम विभागातील उड्डाण तळाचे स्टेशन कमांडर आणि एका प्रमुख हवाई तळाचे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली आहे.
एअर मार्शल कपूर यांनी पाकिस्तानात भारताचे डिफेन्स अटॅचे म्हणून राजनैतिक जबाबदारीही सांभाळली आहे.
(2)GIJ3.jpeg)
हवाई दल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ प्रशिक्षण कमांड आणि त्यानंतर एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ दक्षिण-पश्चिम एअर कमांड म्हणूनही सेवा दिली आहे. त्यांच्या राष्ट्राप्रती असलेल्या अतुलनीय आणि गौरवशाली सेवेबद्दल 2008 मध्ये त्यांना वायू सेना पदक, 2022 मध्ये अति विशिष्ट सेवा पदक आणि 2025 मध्ये परम विशिष्ट सेवा पदक आणि सर्वोत्तम युद्ध सेवा पदक या राष्ट्रपती पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
एअर मार्शल नागेश कपूर यांनी भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. एअर मार्शल तिवारी हे देशाला 40 वर्षांची प्रदीर्घ आणि गौरवशाली सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्त झाले.
* * *
निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2210557)
आगंतुक पटल : 13