रेल्वे मंत्रालय
भारतामध्ये निर्मित 'कवच 4.0' ही रेल्वेची स्वयंचलित संरक्षण प्रणाली गुजरातच्या बाजवा (बडोदा) – अहमदाबाद विभागात कार्यान्वित
'कवच' प्रणाली अंतर्गत 2,200 हून अधिक किलोमीटर अंतराच्या मार्गांचा समावेश
प्रविष्टि तिथि:
30 DEC 2025 3:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2025
'कवच'च्या विस्ताराच्या अनुषंगाने, आता गुजरातच्या पहिल्या बाजवा (बडोदा)–अहमदाबाद विभागात (96 किमी) 'कवच 4.0' कार्यान्वित करण्यात आले आहे. या प्रकल्पात 17 स्थानकांचा समावेश आहे आणि त्यामध्ये 23 मनोरे, 20 कवच इमारती/झोपड्या, 192 किमी ऑप्टिकल फायबर केबल आणि 2,672 आरएफआयडी टॅगच्या स्थापनेसारख्या मजबूत पायाभूत सुविधांचा समावेश आहे.
या मार्गावरील 'कवच' प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली रेल्वे गाडी संकल्प फास्ट पॅसेंजर (59549/ 59550) होती, ही प्रवासी गाडी डब्ल्यूएपी-7 लोकोमोटिव्ह आणि 11 एलएचबी प्रवासी डब्यांसह चालवण्यात आली.

'कवच 4.0' आता या विभागात पूर्णपणे कार्यरत आहे. आता सिग्नल ओलांडल्यामुळे (एसपीअॅटडी) उद्भवणाऱ्या परिणामांना प्रतिबंध करणे, विभागीय वेग, लूप लाइन आणि कायमस्वरूपी वेग मर्यादा पर्यवेक्षणासह स्वयंचलित वेग नियंत्रणाची अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर गाडीला समोरासमोर अथवा मागून कसलीही धडक बसली तर, त्याविरुद्ध संरक्षण प्रदान करून सुरक्षिततेचे धोके आपोआप कमी करण्यासाठी ही प्रणाली तयार केली आहे. अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये एसओएस सुविधा आणि ‘लेव्हल क्रॉसिंग गेट’ जवळ आल्यानंतर स्वयंचलित शिट्टी वाजवण्याची सोय यांचा समावेश या ‘कवच’ यंत्रणेमध्ये आहे.
आतापर्यंत, 'कवच' संरक्षण प्रणाली 2200 हून अधिक किलोमीटरवर मार्गांवर लागू करण्यात आली आहे.
'कवच' ही भारतीय रेल्वेची स्वदेशी बनावटीची स्वयंचलित ट्रेन संरक्षण (एटीपी) प्रणाली आहे, जी सर्वोच्च पातळीची परिचालन सुरक्षा प्रदान करण्यासाठी तयार केली आहे. ही एक अत्यंत तंत्रज्ञान-केंद्रित प्रणाली आहे, जी सेफ्टी इंटिग्रिटी लेव्हल-4 (एसआयएल-4) प्रमाणित असून सिग्नलिंग प्रणालीमधील सर्वोच्च सुरक्षा मानकांपैकी एक आहे, आणि यावरून जागतिक दर्जाची सुरक्षा आणि विश्वासार्हतेसाठी भारतीय रेल्वेची वचनबद्धता दर्शवते.

ज्यावेळी निश्चित केलेली वेगमर्यादा ओलांडली जाते किंवा ज्यावेळी सुरक्षिततेशी संबंधित धोका उद्भवतो त्यावेळी गाडीला आपोआप ब्रेक लावला जातो आणि लोको पायलटना मदत होते. ज्यामुळे अपघात टाळले जाणे शक्य होते आणि प्रतिकूल हवामानातही सुरक्षित ट्रेन संचालनात वाढ होते. परिचालन अनुभव आणि स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनांवर आधारित सततच्या सुधारणांमुळे ‘आरडीएसओ’ द्वारे 'कवच आवृत्ती 4.0 ' ला मंजुरी मिळाली. 'कवच 4.0' हा रेल्वे सुरक्षेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि तो भारताच्या वैविध्यपूर्ण आणि उच्च-घनतेच्या रेल्वे नेटवर्कच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केले आहे.
'कवच 4.0 ' हे एक महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रगतीचे प्रतीक आहे. मुख्य सुधारणांमध्ये त्याचा समावेश आहे:
- सुधारित स्थान अचूकता, ज्यामुळे गाडीचे अचूक स्थान निश्चित करणे शक्य होते.
- मोठ्या आणि गुंतागुंतीच्या रेल्वे स्थानक यार्डमध्ये सिग्नलच्या स्थितीची अधिक चांगली माहिती.
- ऑप्टिकल फायबर केबलद्वारे स्टेशन-टू-स्टेशन कवच इंटरफेस, ज्यामुळे जलद आणि अधिक विश्वसनीय संवाद सुनिश्चित होतो.
- विद्यमान ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम’ सह थेट एकत्रीकरण, ज्यामुळे सध्याच्या सिग्नलिंगचा पायाभूत सुविधेसह अखंड समन्वय साधता येतो.
या सुधारणांमुळे कवच 4.0 अधिक मजबूत, प्रतिसादक्षम आणि भारताच्या विविध आणि उच्च-घनतेच्या रेल्वे नेटवर्कवर मोठ्या प्रमाणावर उपयोजनासाठी अधिक योग्य बनले आहे. या प्रणालीला स्वतंत्र सुरक्षा मूल्यमापनकर्ता (आयएसए) द्वारे जागतिक सुरक्षा मानकांची पूर्तता केल्याबद्दल प्रमाणितही करण्यात आले आहे.
गुजरातच्या बाजवा (बडोदा)–अहमदाबाद विभागामध्ये कवच 4.0 कार्यान्वित केल्याने भारतीय रेल्वेने स्वदेशी सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत तसेच प्रवाशांची सुरक्षा मजबूत करण्यावर, भर देताना प्रत्यक्ष अंमलबजावणीविषयी विश्वासार्हता सुधारण्यावर भर दिला आहे. देशासाठी अधिक सुरक्षित आणि स्मार्ट रेल्वे मार्गाचे जाळे तयार करण्याचा दृष्टिकोन प्रत्यक्षात साकार करण्याबाबत निरंतर भर दिला जात आहे, हे यातून अधोरेखित होते.
* * *
निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2209812)
आगंतुक पटल : 11