उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीत कृत्रिम बुद्धीमत्ता उत्क्रांतीवरील राष्ट्रीय परिषदेला उपराष्ट्रपतींनी केले संबोधित


कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर मानव कल्याणासाठी नैतिकतेने आणि सकारात्मकपणे करण्यावर उपराष्ट्रपतींनी दिला भर

प्रविष्टि तिथि: 23 DEC 2025 6:29PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 डिसेंबर 2025

 

नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात, गुरू गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठाद्वारे, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि आउटलुक मासिकाच्या सहयोगाने आयोजित 'एआय इवोल्युशन -द महाकुंभ ऑफ एआय' (एआय उत्क्रांती – एआयचा महाकुंभ) या प्रमुख राष्ट्रीय परिषदेला आज उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन उपस्थित होते.

त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. कृत्रिम बुद्धिमत्ता ही आता भविष्यातील संकल्पना राहिलेली नाही, तर ती वर्तमानाची वास्तविकता आहे.  ती आरोग्यसेवा निदान, हवामान मॉडेलिंग, प्रशासन, शिक्षण, वित्त आणि राष्ट्रीय सुरक्षा यांसारख्या विविध क्षेत्रांवर प्रभाव टाकत आहे.  व्यक्तीच्या जीवनाला, समाजरचनेला ती नव्याने आकार देत आहे, असे त्यांनी सांगितले. 

  

आधुनिक वैज्ञानिक आणि तांत्रिक घडामोडींबद्दल निराशावादी असण्याची गरज नाही, असे उपराष्ट्रपती म्हणाले. सुरुवातीला विरोध पत्करावा लागलेल्या, पण नंतर जगालाच नव्याने आकार देणाऱ्या संगणकांच्या आगमनाशी त्यांनी तुलना केली आणि प्रत्येक तांत्रिक प्रगती आपल्यासोबत सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही पैलू घेऊन येते, असे सांगितले.  तंत्रज्ञानाचा सकारात्मक आणि विधायक मार्गाने उपयोग करण्याचे मार्ग शोधण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, यावर त्यांनी भर दिला.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारत जगातील आघाडीच्या राष्ट्रांमध्ये उदयास आला असल्याचे उपराष्ट्रपतींनी नमूद केले.   जग वेगाने बदलत आहे यावर भर देतानाच त्यांनी निरंतर अद्ययावत राहण्याची गरज व्यक्त केली  आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात विकसित देशांशी बरोबरी साधण्याच्या शर्यतीत भारताने मागे राहू नये, असे आवाहन केले.

एआयचा अभ्यासक्रमात समावेश झाल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हा शाळा आणि महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग असावा, असे अधोरेखित करून  ते म्हणाले की, एआयची सुरुवातीपासून ओळख झाल्यामुळे विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार, समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि तंत्रज्ञान-आधारित जगासाठी आवश्यक असलेली भविष्यावेधी क्षमता प्राप्त होतील.  शैक्षणिक संस्थांनी वेगाने होणाऱ्या तांत्रिक बदलांशी जुळवून घेण्यासाठी सतत विकसित झाले पाहिजे आणि उत्कृष्टतेची व नवोन्मेषाची  केंद्रे म्हणून उदयास आले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. 

स्वावलंबी, सर्वसमावेशक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम अशा 'आत्मनिर्भर आणि विकसित भारत @2047' च्या दिशेने देशाच्या प्रवासात कृत्रिम बुद्धिमत्तेची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. 

जबाबदार आणि नैतिक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या महत्त्वावर भर देताना उपराष्ट्रपती म्हणाले की, कोणत्याही वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवतेला हानी पोहोचू नये आणि तंत्रज्ञानाने लोकांना अधिक आनंदी, समृद्ध आणि सन्मानजनक जीवन जगण्यास मदत केली पाहिजे.  कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान  मानवी बुद्धिमत्तेला पूरक असायला हवे  आणि सामाजिक कल्याण व सार्वजनिक हितासाठीच्या नैतिक तत्त्वांनी ते मार्गदर्शित असायला हवे, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. 

भारत आपली प्रतिभा, दूरदृष्टी आणि मूल्यांसह कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने स्वीकार करण्यासोबतच  तिचे भविष्य घडवण्यासाठी जगाला मार्गदर्शनही करेल, असा विश्वास उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणाच्या समारोपात व्यक्त केला. 

 

* * *

निलिमा चितळे/सोनाली काकडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2207837) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Malayalam