आयुष मंत्रालय
जागतिक आरोग्य हस्तक्षेप मानकांमध्ये आयुष प्रणाली एकीकृत करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालय यांची नवी दिल्लीत झाली महत्त्वाची तांत्रिक बैठक
प्रविष्टि तिथि:
22 DEC 2025 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2025
परंपरागत आरोग्यसेवेच्या जागतिक एकात्मतेकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, जागतिक आरोग्य संघटनेने पारंपरिक औषधोपचार हस्तक्षेप मानकांच्या विकासासाठी 20–21 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथील हॉटेल इम्पिरियल, येथे दोन दिवसांची तांत्रिक प्रकल्प बैठक आयोजित केली. हा उपक्रम मूलतः आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यात 24 मे 2025 रोजी स्वाक्षरी झालेला महत्त्वपूर्ण सामंजस्य करार आणि देणगीदार कराराच्या अनुषंगाने हाती घेण्यात आला. जागतिक आरोग्य हस्तक्षेपांच्या वर्गीकरण या जागतिक मानकामध्ये पारंपरिक औषध प्रणालीसाठी एक समर्पित मॉड्यूल विकसित करण्यासाठी हा करार एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल. भारताच्या आर्थिक आणि तांत्रिक सहाय्यामुळे आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी या प्रणालींना जागतिक आरोग्यसेवेच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक अशी रूपरेषा तयार केली जात आहे.

आयुष उपचार प्रणालीचा प्रसार जगभरातील जास्तीतजास्त लोकांपर्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने केला जावा यावर विशेष भर देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांशी हा उपक्रम सुसंगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात याविषयाचा उल्लेख करुन सांगितले होते की या प्रमाणित चौकटीमुळे आयुष प्रणालीला जागतिक मान्यता आणि शास्त्रीय विश्वासार्हता मिळण्यास लाभ होईल. आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी यापूर्वी नमूद केले होते की आंतरराष्ट्रीय आरोग्य हस्तक्षेप वर्गीकरणासाठी स्वतंत्र मॉड्यूल तयार झाल्यास आयुष प्रणालींना जागतिक मान्यता मिळण्यास मदत होईल तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या समावेशक, सुरक्षित आणि तथ्य आधारित आरोग्यसेवा उभारण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल.

या बैठकीला जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व सहा क्षेत्रांचा उत्तम प्रतिसाद लाभला. संघटनेच्या जिनिव्हा येथील मुख्यालयातील रॉबर्ट जेकब, नेनाद कोस्तांजेक, स्टेफान एस्पिनोसा आणि डॉ. प्रदीप दुआ यांसारख्या प्रमुख प्रतिनिधींनी वर्गीकरण विषयक चर्चांचे नेतृत्व केले. भारत, भूतान, ब्राझील, इराण, मलेशिया, नेपाळ, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, फिलीपिन्स, ब्रिटन आणि अमेरिका यांसारख्या सदस्य राष्ट्रांनी सहभाग घेतला, यामध्ये आपापल्या देशाच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यावर आणि हस्तक्षेपांचे वर्णन सुसंगत करण्यावर भर देण्यात आला.

पारंपरिक औषध प्रणालीचा समावेश आंतरराष्ट्रीय आरोग्य हस्तक्षेप वर्गीकरणात करणे अतिशय महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे हस्तक्षेप कोडिंग विविध देशांतील आणि वेगवेगळ्या वैद्यकीय प्रणालींमधील आरोग्य प्रक्रियांसाठी एक समान भाषा उपलब्ध करून देते. या कोडिंग प्रक्रियेचे प्रमाणीकरण केल्यामुळे आरोग्यसेवा प्रदाते उत्तम दस्तऐवज, अहवाल आणि पारंपरिक औषधोपचार पद्धतीची वारंवारता आणि परिणामकारकता अधिक उत्तम पद्धतीने करु शकतील. जागतिक आरोग्य संघटना हा प्रकल्प वेळेची काटेकोर मर्यादा पाळून आणि शास्त्रशुद्ध दृष्टिकोन अंगीकारून हाती घेणार आहे. यामुळे क्लिनिकल संशोधन आणि धोरणात्मक समर्थनासाठी तर मदत होणारच आहे शिवाय जागतिक स्तरावर राष्ट्रीय आरोग्य माहिती प्रणालींमध्ये पारंपरिक औषधपद्धतीचा विस्तार करण्याचा मार्गही प्रशस्त होईल.
* * *
निलिमा चितळे/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2207508)
आगंतुक पटल : 11