राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हैदराबाद येथे ‘भारताचे कालातीत ज्ञान: शांतता आणि प्रगतीचे मार्ग’ यावरील परिषदेला केले संबोधित
प्रविष्टि तिथि:
20 DEC 2025 5:57PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (20 डिसेंबर 2025) हैदराबाद येथे ब्रह्मकुमारी शांती सरोवराच्या 21 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘भारताचे कालातीत ज्ञान: शांतता आणि प्रगतीचे मार्ग’ यावरील परिषदेला संबोधित केले.

जागतिक समुदाय अनेक परिवर्तनातून जात आहे, असे राष्ट्रपती याप्रसंगी बोलताना म्हणाल्या. या बदलांसोबतच, आपल्याला मानसिक आरोग्याच्या समस्या, सामाजिक संघर्ष, पर्यावरणीय असंतुलन आणि मानवी मूल्यांची घसरण यांसारख्या अनेक गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागत आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. या पार्श्वभूमीवर या परिषदेची संकल्पना अत्यंत समर्पक असल्याचे त्यांनी सांगितले. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की केवळ भौतिक विकासामुळे सुख आणि शांती मिळत नाही. त्यासाठी आंतरिक स्थिरता, भावनिक बुद्धिमत्ता आणि मूल्यांवर आधारित दृष्टिकोन आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

भारताच्या प्राचीन ऋषी परंपरेने आपल्याला सत्य, अहिंसा आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाचा संदेश दिला आहे. आपल्या आध्यात्मिक वारशात जगाच्या मानसिक, नैतिक आणि पर्यावरणीय समस्यांवर उपाय आहेत, असे राष्ट्रपतींनी नमूद केले. आधुनिकता आणि अध्यात्म यांचा संगम ही आपल्या संस्कृतीची सर्वात मोठी ताकद आहे. 'वसुधैव कुटुंबकम्' ही संकल्पना – संपूर्ण जगाला एक कुटुंब मानण्याची संकल्पना – आज जागतिक शांततेसाठी सर्वाधिक आवश्यक आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.

अध्यात्म ही सामाजिक एकता आणि राष्ट्रीय प्रगतीची भक्कम पायाभरणी करते. जेव्हा एखादी व्यक्ती मानसिक स्थिरता, नैतिक मूल्ये आणि स्वतःवर नियंत्रण विकसित करते, तेव्हा तिचे वर्तन समाजात शिस्त, सहिष्णुता आणि सहकार्य वाढवते, असे राष्ट्रपती म्हणाल्या. आध्यात्मिक चेतनेने प्रेरित लोक आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवतात आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्ती राष्ट्र उभारणीतही सक्रिय योगदान देतात, असेही त्या म्हणाल्या.

राष्ट्रपतींनी याबद्दल आनंद व्यक्त केला की, ब्रह्म कुमारी संस्था अनेक दशकांपासून विविध देशांमध्ये सार्वत्रिक भारतीय मूल्यांचा प्रसार करत आहे. ही संस्था लोकांमध्ये शांती आणि सकारात्मकता वाढवून समाजाची नैतिक आणि भावनिक वीण मजबूत करत आहे. अशा प्रकारे, ही संस्था राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा-
***
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2207110)
आगंतुक पटल : 8