पंतप्रधान कार्यालय
पारंपारिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित
पंतप्रधानांच्या हस्ते होणार माय आयुष इंटिग्रेटेड सर्व्हिसेस पोर्टलचा प्रारंभ
आयुष उत्पादने आणि सेवांच्या गुणवत्तेसाठी जागतिक मानके आयुष मार्कचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार अनावरण
योगाभ्यासाच्या प्रचार आणि विकासातील उत्कृष्ट योगदानासाठी 2021-2025 या वर्षाच्या पुरस्कार विजेत्यांचा पंतप्रधानाच्या हस्ते होणार सन्मान
जागतिक आरोग्य संघटनेच्या दिल्ली इथल्या आग्नेय आशिया प्रादेशिक कार्यालयाच्या संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन
संतुलनाची पुनर्स्थापना : आरोग्य आणि कल्याण विषयक विज्ञान आणि सराव ही या शिखर परिषदेची संकल्पना
प्रविष्टि तिथि:
18 DEC 2025 7:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025
नवी दिल्लीत भारत मंडपम इथे सुरू असलेल्या पारंपारिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभात, पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4:30 वाजता सहभागी होणार आहेत. या समारोप समारंभादरम्यान पंतप्रधान उपस्थितांना संबोधित देखील करतील. हा कार्यक्रमातून जागतिक, विज्ञान-आधारित आणि लोक-केंद्रित पारंपारिक औषध व्यवस्थेसाठीची कार्यक्रमपत्रिका तयार करण्यात भारताचे वाढते नेतृत्व आणि आघाडीचे उपक्रम अधोरेखीत झाले आहेत.
संशोधन, मानकीकरण आणि जागतिक सहकार्याच्या माध्यमातून पारंपारिक औषधोपचार आणि भारतीय ज्ञान व्यवस्थेला मुख्य प्रवाहात आणण्यावर पंतप्रधानांनी सातत्याने भर दिला आहे. याच दृष्टीकोनाला अनुसरून, या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान आयुष क्षेत्रासाठीचे माय आयुष इंटिग्रेटेड सर्व्हिसेस पोर्टल (एमएआयएसपी) या मुख्य डिजिटल पोर्टलसह अनेक महत्त्वाच्या आयुष उपक्रमांचा प्रारंभही करणार आहेत. यावेळी ते आयुष मार्कचे अनावरण देखील करतील. आयुष उत्पादने आणि सेवांच्या गुणवत्तेसाठी जागतिक मानके म्हणून याचा उपयोग केला जाणार आहे.
यावेळी, पंतप्रधान योगाभ्यास प्रशिक्षणावरील जागतिक आरोग्य संघटनेचा तांत्रिक अहवाल आणि From Roots to Global Reach: 11 Years of Transformation in Ayush या पुस्तकाचे प्रकाशनही करतील. भारताच्या पारंपारिक औषध वारशाच्या जागतिक प्रतिबिंबाचे प्रतिक म्हणून अश्वगंधावरील स्मारक टपाल तिकीट देखील यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशित केले जाईल.
यावेळी पंतप्रधान जागतिक आरोग्य संघटनेच्या दिल्ली इथल्या आग्नेय आशिया प्रादेशिक कार्यालयाच्या संकुलाचे उद्घाटनही करतील. या संकुलात जागतिक आरोग्य संघटनेचे भारत विभागीय कार्यालय देखील असेल. जागतिक आरोग्य संघटनेसोबतच्या भारताच्या भागीदारीअंतर्गतचा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
यावेळी पंतप्रधान, योगाभ्यासाच्या प्रचार आणि विकासात दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल 2021-2025 या वर्षासाठीच्या पंतप्रधान पुरस्कार विजेत्यांची, योगाभ्यासाप्रती दृढ समर्पण आणि जागतिक प्रचारासाठी दिलेल्या योगदानाची दखल म्हणून, त्यांचा सन्मान करतील. या पुरस्कारांतून संतुलन, कल्याण आणि सुसंवादासाठी योगाभ्यास हा एक शाश्वत मार्ग असल्याची बाब, तसेच आरोग्यदायी आणि सुदृढ अशा नव्या भारताच्या जडणघडणीत योगाभ्यास देत असलेले योगदान पुन्हा एकदा अधोरेखीत केले जाईल.
यावेळी पंतप्रधान या प्रदर्शनाच्या ठिकाणी आयोजित ट्रेडिशनल मेडिसिन डिस्कव्हरी स्पेस अर्थात पारंपरिक औषध संशोधन परिसर या प्रदर्शनालाही भेट देतील. या प्रदर्शनातून भारतासह जगभरातील पारंपारिक औषध ज्ञान व्यवस्थेतील विविधता, सखोलता आणि समकालीन प्रासंगिकतेची प्रचिती येते.
जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्रीय आयुष मंत्रालयाने संयुक्तपणे नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथे या शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. 17 डिसेंबर 2025 ला या परिषदेला सुरुवात झाली असून, ती 19 डिसेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. संतुलनाची पुनर्स्थापना : आरोग्य आणि कल्याण विषयक विज्ञान आणि सराव ही या परिषदेची संकल्पना आहे. या शिखर परिषदेतेच्या निमित्ताने आलेले जागतिक नेते, धोरणकर्ते, शास्त्रज्ञ, अभ्यासक, प्राचीन ज्ञानातील विद्वान आणि नागरी संस्थांच्या प्रतिनिधींनी समन्यायी, शाश्वत आणि तथ्यांवर आधारित आरोग्य व्यवस्था विकसित करण्याच्या मुद्यावर सखोल चर्चा केली.
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2206192)
आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam