पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप शिखर परिषद 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित


“2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल सर्व सीमा ओलांडतील”

“स्वातंत्र्याच्या काळात आलेल्या लाटेने जनतेमध्ये उत्साह आणि एकतेची भावना निर्माण केली आणि अनेक अडथळे दूर केले”

“चांद्रयान 3 च्या यशामुळे प्रत्येक नागरिकात अभिमान आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली असून प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली”

“आज, प्रत्येक भारतीय आत्मविश्वासाने ओतप्रोत आहे”

“जन धन बँक खाती गरिबांमधील मानसिक अडथळे दूर करण्याचे तसेच त्यांचा सन्मान आणि स्वाभिमान पुन्हा जागृत करण्याचे माध्यम बनले”

“सरकारने केवळ जीवनात परिवर्तन घडवले नाही तर गरिबांना दारिद्र्यावर मात करण्यासाठी मदत केली”

“आज सामान्य नागरिकांना सक्षम आणि प्रेरित वाटते”

“आजच्या भारताच्या विकासाचा वेग आणि प्रमाण हे त्याच्या यशाचे लक्षण आहे”

“जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्याने प्रगती आणि शांतीचा मार्ग मोकळा झाला”

“भारताने घोटाळ्यांच्या विक्रमांपासून निर्यातीच्या विक्रमांपर्यंत वाटचाल केली आहे”

“स्टार्टअप, क्रीडा, अंतराळ व तंत्रज्ञान, भारताच्या विकास प्रवासात मध्यमवर्ग वेगाने पुढे जात आहे”

“नव-मध्यमवर्ग देशाच्या उपभोग वाढीला गती देत आहे”

“आज, गरिबांमधील सर्वात गरीबांपासून ते जगातील सर्वात श्रीमंतांपर्यंत, प्रत्येक जण असा विश्वास करू लागले आहेत की हा भारताचा काळ आहे”

प्रविष्टि तिथि: 04 NOV 2023 10:47PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप शिखर परिषद 2023 ला संबोधित केले.

सभेला संबोधित करताना, पंतप्रधानांनी हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप शिखर परिषद 2023 मध्ये आमंत्रित केल्याबद्दल एचटी समुहाचे आभार मानले. एचटी समुह नेहमीच भारताच्या प्रगतीला प्रतिबिंबित करणाऱ्या विषयांची निवड करत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. 2014 मध्ये सध्याचे सरकार सत्तेत आले तेव्हा या शिखर परिषदेचा विषय, ‘रिशेपिंग इंडियाअसल्याची आठवण पंतप्रधानांनी केली. या समुहाला या गोष्टीचा अंदाज होता की मागेपुढे मोठे बदल होणार आहेत आणि भारताचा आकार बदलणार आहे. 2019 मध्ये जेव्हा सध्याचे सरकार अधिक मोठ्या बहुमताने जिंकून पुन्हा सत्तेवर आले तेव्हा 'उज्ज्वल उद्यासाठी संवाद' ही संकल्पना निवडण्यात आली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली. आता 2023 मध्ये जेव्हा सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या आहेत, तेव्हा पंतप्रधानांनी शिखर परिषदेची संकल्पना 'अडथळे ओलांडणे' आणि त्यातील अंतर्निहित संदेश अधोरेखित करताना सांगितले की सध्याचे सरकार सर्व विक्रम मोडेल आणि येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी होईल. "2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल बंधनांच्या पलीकडे जाणारे असतील", असे पंतप्रधानांनी नमूद केले.

'भारताचे पुन:र्निर्माण' ते 'अडथळ्यांच्या पलीकडे' या भारताच्या प्रवासाने देशाच्या आगामी उज्ज्वल भविष्याचा पाया रचला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. याच पायावर एक विकसित, भव्य आणि समृद्ध भारत उभारला जाईल, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी दीर्घकाळापासून भारताला भेडसावणाऱ्या अनेक अडथळ्यांचा उल्लेख केला. गुलामगिरी आणि परकीय आक्रमणांनी देशाला दिर्घ काळासाठी अनेक बंधनात जखडून ठेवले होते, असे ते म्हणाले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की, त्या काळात निर्माण झालेल्या उर्मीने, जनतेतील एकतेची भावना आणि उत्कटतेने अशी अनेक बंधने तोडली. स्वातंत्र्यानंतरही अशीच गती कायम राहील अशी अपेक्षा होती. मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आपल्या देशाला त्याच्या क्षमतेनुसार विकास साधता आली नाही." असे ते म्हणाले. मानसिक अडथळे ही अनेक समस्यांपैकी एक होती, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. स्वतंत्र भारतासमोरील काही समस्या वास्तविक होत्या, तर काही समस्या काल्पनिक होत्या आणि उर्वरित अतिशयोक्तीपूर्ण होत्या, असे ते म्हणाले.

2014 नंतर, भारत हे अडथळे पार करण्यासाठी सतत कठोर परिश्रम करत आहे, याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. आपण अनेक अडथळे पार केले आहेत आणि आता तर आपण अडथळ्यांच्या पलीकडे जाण्याबद्दल बोलत आहोत, असे ते म्हणाले. आज, भारत चंद्राच्या अशा भागात पोहोचला आहे जिथे यापूर्वी कोणीही पोहोचले नव्हते. आज, भारत सर्व अडथळे पार करून डिजिटल व्यवहारांमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आहे. देश मोबाईल उत्पादनात आघाडीवर आहे, स्टार्टअप्समध्ये जगातील पहिल्या 3 देशांमध्ये समाविष्ट आहे आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यातही पुढे आहे”, अशी माहिती त्यांनी दिली. आज भारत जी 20 शिखर परिषदेसारख्या जागतिक कार्यक्रमांमध्ये आपला झेंडा उंच फडकवत आहे आणि प्रत्येक अडथळा पार करत आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी लेखक आणि राजकारणी अल्लामा इक्बाल यांच्या गझल मधील 'सीतारों के आगे जहाँ और भी हैं' ही एक ओळ वाचली आणि सांगितले की भारत आता थांबणार नाही.

पंतप्रधानांनी असे निदर्शनास आणून दिले की आपली विचारसरणी आणि मानसिकता याच देशातील सर्वात मोठे अडथळे होते ज्यामुळे भूतकाळातील सरकारांच्या अनौपचारिक दृष्टिकोनावर टीका केली जात होती, त्यांचा उपहास केला जात होता. वेळेचे भान नसणे, भ्रष्टाचार आणि हीन दर्जाच्या सरकारी प्रयत्नांना अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी सांगितले की काही घटना संपूर्ण देशाला मानसिक अडथळे ओलांडून पुढे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या दांडी यात्रेने देशाला प्रेरणा दिली आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची ज्योत पेटवली याचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. चांद्रयान 3 च्या यशामुळे प्रत्येक नागरिकामध्ये स्वाभिमान आणि आत्मविश्वास दाखवला आहे आणि प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा भारतीयांना मिळते आहे यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला. "आज प्रत्येक भारतीय आत्मविश्वासाने ओतप्रोत आहे", असे पंतप्रधानांनी नमूद केले. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आपण स्वतः लाल किल्ल्यावरून बोलताना स्वच्छता, शौचालये आणि स्वच्छताविषयक मुद्दे उपस्थित केले होते याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली आणि त्यामुळे मानसिकतेत बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. "स्वच्छता आता एक सार्वजनिक चळवळ बनली आहे", असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या 10 वर्षांत खादीची विक्री तिप्पट झाली आहे असे त्यांनी नमूद केले.

जनधन बँक खाती गरिबांमधील मानसिक अडथळे दूर करण्यासाठी तसेच त्यांचा गौरव आणि स्वाभिमान पुन्हा जागृत करण्यासाठी एक माध्यम बनली आहेत, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी त्या नकारात्मक मानसिकतेकडे लक्ष वेधले जिथे बँक खाती फक्त श्रीमंतांसाठीच असल्याचे मानले जात होते. जनधन योजनेने बँकांना गरिबांच्या दाराशी नेत बॅंकांचे व्यवहार अधिक सुलभ बनवले याबाबत पंतप्रधानांनी माहिती दिली. गरिबांसाठी सक्षमीकरणाचा स्रोत बनणाऱ्या रुपे कार्डचा व्यापक वापर यावरही त्यांनी भाष्य केले. "जे लोक वातानुकूलित दालनात बसतात, आकड्यांनी आणि कथांनी प्रेरित होतात ते गरिबांचे मानसिक सक्षमीकरण कधीच समजू शकत नाहीत", असे पंतप्रधानांनी नमूद केले. भारताच्या सर्व कक्षा ओलांडून झालेल्या मानसिकतेतील बदलावर प्रकाश टाकताना, पंतप्रधानांनी दहशतवादी कृत्यांमध्ये स्वतःचे रक्षण करण्याची भारताची वाढती क्षमता, हवामान कृती ठरावांचे नेतृत्व करणे आणि अंतिम मुदतीपूर्वी इच्छित परिणाम साध्य करणे यांचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी क्रीडा क्षेत्रातील भारताच्या उत्कृष्ट कामगिरीवरही प्रकाश टाकला आणि या यशाचे श्रेय मानसिकतेतील बदलाला दिले.

"भारतात क्षमता आणि संसाधनांची कमतरता नाही," असे पंतप्रधान म्हणाले. गरिबी हाच खरा अडथळा असल्याचे अधोरेखित करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, गरीबीचा सामना घोषणाबाजीने करता येत नाही तर उपाययोजना, धोरणे आणि ठाम हेतू यांचा वापर करुनच गरीबीला हलवता येते. पंतप्रधानांनी भूतकाळातील सरकारांच्या विचारसरणीबद्दल दुःख व्यक्त करुन सांगितले की या सरकारांनी गरिबांना सामाजिक किंवा आर्थिकदृष्ट्या प्रगती करण्यास सक्षम बनवले नाही. गरीबांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास ते गरिबीवर मात करण्यास सक्षम ठरतात हे अधोरेखित करून, पंतप्रधान म्हणाले की गरिबांना सक्षम करणे ही केंद्र सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. "सरकारने केवळ जीवन बदलले नाही तर गरिबांना गरिबीवर मात करण्यास मदत केली आहे", असे ते म्हणाले. गेल्या 5 वर्षात 13 कोटींहून अधिक लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. 13 कोटी लोकांनी गरिबीची सीमा यशस्वीपणे ओलांडून ते देशातील नव-मध्यमवर्गाचा भाग बनले आहेत, असे त्यांनी सांगितले.

घराणेशाहीच्या अडथळ्याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी यांनी निदर्शनास आणून दिले की सामान्य लोकांना खेळ, विज्ञान, राजकारण किंवा पद्म पुरस्कार - कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होणे हे केवळ विशिष्ट वर्तुळातील व्यक्ती असल्यासच शक्य होते. त्यांनी अधोरेखित केले की सामान्य नागरिक आज सक्षम आणि प्रेरित वाटत आहेत, याचे श्रेय सरकारच्या दृष्टिकोनातील परिवर्तनाला जाते, असे ते म्हणाले. कालचे अज्ञात नायक आज देशाचे नायक आहेत”, असेही  त्यांनी सांगितले.

देशातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या अडथळ्यांना तोंड देण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांकडे लक्ष वेधून घेताना पंतप्रधानांनी जगातील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधा मोहिमेवर प्रकाश टाकला. पायाभूत सुविधांच्या विकासाच्या बाबतीत भारताचा वेग आणि व्याप्ती अधोरेखित करण्यासाठी, पंतप्रधान मोदी यांनी पुढील आकडेवारी मांडली - महामार्ग बांधकामात 2013-14 मध्ये प्रतिदिन 12 किमी बांधकाम होते, ते 2022-23 मध्ये 30 किमीपर्यंत वाढले, 2014 मध्ये 5 शहरांत असलेल्या मेट्रो संपर्क प्रणालीचा 2023 मध्ये 20 शहरांपर्यंत विस्तार, विमानतळांची संख्या जी 2014 मध्ये 70 होती ती आज जवळपास 150 च्या वर पोहोचली, 2014 मध्ये देशात 380 वैद्यकीय महाविद्यालये होती आज ती संख्या 700 पेक्षा अधिक झाली, ऑप्टिकल फायबरचा विस्तार 2023 मध्ये 350 किमीवरून 6 लाख किमीपर्यंत झाला, 2014 मध्ये 55 टक्के गावांना जोडणारे रस्ते आज पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधलेल्या 4 लाख किलोमीटर रस्त्यांमुळे 99 टक्के गावांना संपर्क सुविधा देत आहेत, स्वातंत्र्यानंतर केवळ 20,000 किमी रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले होते, तर गेल्या 10 वर्षांत जवळपास 40,000 किमी रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले आहे. हे आजच्या भारताच्या विकासाची गती आणि प्रमाण आहे. हे भारताच्या यशाचे लक्षण आहे”, असे ते म्हणाले.

गेल्या काही वर्षांत भारताने अनेक कथित अडथळ्यांमधून बाहेर पाऊल टाकले आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले. आपले धोरणकर्ते आणि राजकीय तज्ञांचे असे मत होते की चांगली अर्थनीति ही चांगले राजकारण असू शकत नाही. अनेक सरकारांनीही हीच गोष्ट खरी मानून स्वीकारली होती, त्यामुळे आपल्या देशाला राजकीय आणि आर्थिक या दोन्ही आघाड्यांवर समस्यांना तोंड द्यावे लागले, यांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. परंतु, आम्ही चांगली अर्थनीति आणि चांगले राजकारण एकत्र आणले, असे ते म्हणाले. भारताच्या आर्थिक धोरणांमुळे देशात प्रगतीचे नवे मार्ग उघडले, हे त्यांनी अधोरेखित केले. बँकिंग संकट सोडवणे, वस्तू आणि सेवा कर अंमलबजावणी आणि कोविड साथीचे निराकरण करण्यासाठी उपायांची आवश्यकता असताना जनतेला दीर्घकालीन फायदे देणारी धोरणे निवडण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी अलिकडेच मंजूर झालेल्या नारी शक्ती वंदन अधिनियमचा उल्लेख या कथित अडथळ्याचे आणखी एक उदाहरण म्हणून केला. हे विधेयक दशकांनुदशके प्रलंबित ठेवले होते आणि ते कधीही मंजूर होणार नाही असे वाटत होते, परंतु हे विधेयक आता वास्तवात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

मागील सरकारांनी राजकीय फायद्यासाठी अनेक समस्यांची अतिशयोक्तीपूर्ण मांडणी केली होती, असे पंतप्रधान म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हे असेच एक उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी, असा मानसिक दबाव निर्माण करण्यात आला होता की हे कलम कधीच रद्द करता येणार नाही, असे ते म्हणाले. मात्र हे कलम रद्द केल्याने विकास आणि शांतीचा मार्ग मोकळा झाला आहे, यावर त्यांनी भर दिला. "लाल चौकातील दृश्यांवरून जम्मू आणि काश्मीर कसे बदलत आहे हे दाखवले आहे. आज, केंद्रशासित प्रदेशात दहशतवाद समाप्तीच्या मार्गावर आहे आणि पर्यटन सतत वाढत आहे. जम्मू आणि काश्मीरला नवीन उंचीवर नेण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत", असेही ते म्हणाले.

प्रसारमाध्यम क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लक्षात घेत, पंतप्रधानांनी 2014 नंतर ब्रेकिंग न्यूजच्या संकल्पनेत झालेला बदल आणि त्यात झालेले परिवर्तन यावर प्रकाश टाकला. विविध रेटिंग एजन्सींनी 2013 मध्ये भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन वृद्धी दरात संबंधित अंदाज घसरणारे असल्याचे वर्तवले होते, याची आठवण करून देत पंतप्रधानांनी सांगितले की आज त्या उलट घडत असून भारताच्या विकासाच्या अंदाजाचा आलेख वरच्या दिशेने जाणारा आणि सुधारणा दर्शवणारा आहे. पूर्वीच्या परिस्थितीशी तुलना करताना, पंतप्रधानांनी 2013 मध्ये बँकांची नाजूक स्थिती आणि 2023 मध्ये भारतीय बँकांनी कमावलेला, तसेच 2013 मध्ये हेलिकॉप्टर घोटाळ्यापासून, 2013-14 नंतर भारताच्या संरक्षण निर्यातीत विक्रमी वीस पट वाढ झाल्याचा उल्लेख केला. "भारताने विक्रमी घोटाळ्यांपासून विक्रमी निर्यातीपर्यंतचा प्रवास केला आहे", असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी 2013 मध्ये मध्यमवर्गावर होणाऱ्या कठोर आर्थिक प्रभावाबद्दल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नकारात्मक मथळ्यांचा उल्लेख केला. परंतु आज, भारताच्या विकास यात्रेत मध्यमवर्ग जलद गतीने पुढे जात आहे - मग ते स्टार्टअप असोत, क्रीडा क्षेत्र, अंतराळ किंवा तंत्रज्ञान. मध्यमवर्गीयांचे उत्पन्न वाढले असून 2023 मध्ये 7.5 कोटींहून अधिक लोकांनी प्राप्तिकर भरला आहे, जो 2013-14 मधील कर दात्यांच्या संख्येपेक्षा 4 कोटीने अधिक आहे. करविषयक माहितीशी संबंधित एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की 2014 मध्ये 4.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेले सरासरी उत्पन्न 2023 मध्ये 13 लाख रुपयांपर्यंत वाढले आहे आणि परिणामी, लाखो लोक कमी उत्पन्न गटातून उच्च उत्पन्न गटात जात आहेत, असे त्यांनी सांगितले. एका राष्ट्रीय दैनिकात प्रकाशित झालेल्या आर्थिक अहवालातील एक मनोरंजक तथ्य उद्धृत करताना पंतप्रधानांनी माहिती दिली की जर 5.5 लाख ते 25 लाख रुपये उत्पन्न असलेल्या वेतनदार लोकांचे एकूण उत्पन्न जोडले तर 2011-12 मध्ये हा आकडा सुमारे 3.25 लाख कोटी रुपये होता परंतु 2021 पर्यंत तो वाढून 14.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला म्हणजे ही तब्बल 5 पट वाढ आहे. हे आकडे केवळ वेतनावर आधारित असून इतर कोणत्याही उत्पन्नाचे आकडे त्यात समाविष्ट नसल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांनी वाढता मध्यमवर्ग आणि घटती गरिबी ही देशाच्या मोठ्या आर्थिक चक्रातील दोन प्रमुख आधारस्तंभ असल्याचे सांगितले. गरिबीतून बाहेर आलेला नव-मध्यमवर्ग देशातील उपभोग वाढीला वेग देत आहे. मध्यमवर्ग ही मागणी पूर्ण करण्याची जबाबदारी घेऊन आपले उत्पन्न वाढवत आहे, म्हणजेच गरिबीचा दर कमी होत असल्याने मध्यमवर्गालाही फायदा होत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. याच लोकांच्या आकांक्षा आणि पुढे जाण्याच्या तयारीमुळे आपल्या देशाच्या विकासाला बळ मिळत आहे. त्यांच्या ताकदीने आज भारत जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था बनला आहे, असे ते म्हणाले. भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी असे प्रतिपादन केले की अमृत काळातील भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी काम करत आहे. भारत प्रत्येक अडथळ्यावर यशस्वीरित्या मात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "आज, गरिबातील गरीबापासून ते जगातील सर्वात श्रीमंतांपर्यंत, प्रत्येक जण हे मान्य करतो की हा भारताचा काळ आहे", असे पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक भारतीयाची सर्वात मोठी ताकद म्हणजे आत्मविश्वास, असे ते म्हणाले. "या आत्मविश्वासाच्या बळावर आपण कोणताही अडथळा लीलया पार करू शकतो", असे ते म्हणाले. 2047 मध्ये होणाऱ्या हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप शिखर परिषदेची संकल्पना - विकसित राष्ट्र, पुढे काय? अशी असेल, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी आपल्या संबोधनाचा समारोप केला.

***

आशिष सांगळे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2202798) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam